हे जगण्याचे कृष्णगान…

0
335

– डॉ. अनुजा जोशी

होकाराला उजेडाचा रंग असतो व नकाराला अंधाराचा. पण कृष्ण हा या दोन्हींमधला मोरपंखी ‘सकार’ आहे. लौकिक जगात जगताना हे अलौकिकाचं मोरपंखी ‘कृष्णगान’ ओठावर असलं की हर एका उजेडाचा दीपोत्सव होतो व हर एका अंधाराची अष्टमीची रात्र….!

कृष्णा संभाळ रे, संभाळ रे
संभाळ अपुल्या गाई|
आम्ही घरासी रे, घरासी रे
घरासी जातो बाई|
तुमची संगत रे
संगत नडली बाई॥

कालचा खरवस रे
बराच गोड केला|
तुम्ही सगळ्यांनी
खूप खूप घेतला|
मी एक भोळा रे
म्हणोनि थोडका दिला|
तू आता म्हणशील
याला कळतच नाही
काही नाही…|
कृष्णा संभाळ रे
संभाळ अपुल्या गायी…॥
कृष्ण गोकुळ सोडून गेल्यानंतर खिन्न, रिकाम्या मनाने पेंद्या रानात फिरतो आहे… कृष्णाच्या डोक्यातलं एक छोटंसं मोरपीस त्याला गवतावर पडलेलं दिसतं. विलक्षण आनंदाने तो ते उचलून घेतो. कपाळाला टेकवतो. छातीशी धरतो. त्याच्या डोळ्यांतून धारा लागतात. यमुनातीरावर रानात खेळताना कृष्णाने काढलेल्या खोड्या, गुरं राखताना केलेली धमाल, गोड खरवसाची वाटणी करताना कृष्णाने केलेली लबाडी, नंतर आलेला कृष्णाचा राग आणि आता गोकुळ सोडून गेल्यावर सगळीकडे भरून उतरलेली एक ‘कृष्णपोकळी!’- असं सगळं पेंद्याला त्या मोरपिसात दिसू लागतं…
वि. स. खांडेकरांनी ‘थमाल अपुल्या गाई’च्या ललितबंधात असा भाबडा-बोबडा पेंद्या रंगवला आहे.
कृष्णाबरोबर रानात गुरं राखणारा हा पेंद्या काय, द्वारकेला मूठभर पोहे घेऊन आलेला सुदामा काय किंवा पाठीवर कुबड असणारी कुब्जा काय- या सामान्य माणसांचं भावविश्‍व कृष्णाने व्यापलं होतं. कृष्ण हे त्यांच्या मनातल्या अपार भक्तीचं चालतं-बोलतं मंदिर होतं. कृष्णचरित्रात वर्णन केलेली व न केलेलीही अशी अनेक अतिसामान्य माणसं कृष्णामुळे असामान्य होऊन गेली. इतिहास बनून गेली! देवाचा अवतार म्हणून माणसांत जन्म घेतलेला कृष्ण असं सामान्याहून सामान्य जीवन जगला, हे या सगळ्याचं कारण!
‘हम अपले भगवान को भी कहते है बासुरीवाला’ हे किती खरंय. आपला भगवान गुरं राखतो. शेतात राबतो. रानात फिरतो. पानांचे टाळे कमरेला आणि डोक्याला फुलंपीसं खोवतो. गोपगडी जमवून त्यांच्याबरोबर दहीकाला करतो. त्यांच्यासोबत हंड्या फोडतो. खातो-पितो. मजा करतो. त्यांच्यावर अतोनात प्रेम करतो आणि त्यांच्याशी मजेपुरती लबाडीही करतो! त्यांच्यातलाच एक होऊन जाणं, त्यांच्याशी तनमनधनपूर्वक एकरूप होणं, अद्वैत साधणं हेच त्याचं ‘देवत्व!’
राम आणि कृष्ण दोघेही अवतारी युगपुरुष. पण दोघांमध्ये बराच फरक आहे. मला असं म्हणावंसं वाटतं की, राम फक्त खूप चांगला आणि चांगलाच वागला. आदर्शच वागला. अगदी शेवटीसुद्धा सीतेला गर्भावस्थेत रानात सोडण्याचा कठोर वाईटपणाही त्याने त्याच स्वतःच्या चांगुलपणासाठी केला. त्याने आयुष्यभर मर्यादा, वचनं सांभाळली. तो मर्यादापुषोत्तम ठरला! पण कृष्णाचे तसे नाही. कृष्ण हा रामासारखा केवळ आदर्शांचा पुतळा नव्हे! तो भलं-बुरं, बरं-वाईट, खरं-खोटं दोन्ही प्रकारचं वागतो. ‘मैया मोरी मैं नहीं माखन खायो|’ असं म्हणत आपण लोणी कसं खाल्लं नाही हे तो यशोदेला पटवून देतो. इतकं छान पटवून देतो की तिलाच कृष्णावर वृथा आरोप केल्याचं दुःख होऊन सद्गदित होऊन ती रडू लागते, तर हा नंदलाला लगेच तिला गळामिठी घालत ‘मैया मोरी मैंने ही माखन खायो’ असं कबूल करून टाकतो.
बाळकृष्णाचं हे रंग बदलतं रूप मोठेपणीच्या त्याच्या ‘युगंधर कृष्णा’च्या रूपातही टिकून राहिलं. युद्धप्रसंगात त्याने खूप कौशल्याने कौरवांची बाजू दुबळी बनवली. जेवढ्या कनवाळूपणे व प्रेमाने पांडवांना त्याने साथ दिली, तेवढ्याच कठोरपणे पण गोड गोड बोलून त्याने कौरवांचा काटा काढला. ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्’ या न्यायाने तो हितकारक तेवढंच खरं व अहितकर असेल तिथे खोटं बोलला- वागला. विवेकाने त्याने समतोल साधला.
मानवी स्वभावाचा हा खरा आरसा आहे. प्रतिबिंब आहे. कृष्ण माणसाच्या जन्माला आला, तर तो माणूस म्हणूनच जगला, देव म्हणून नव्हे! माणूस म्हणून असणार्‍या सर्व वृत्ती-प्रवृत्तींना त्याने आपल्यात चांगल्याप्रकारे सामावून घेतले.
खूप चांगलं असणारं ‘देवपण’ हे एक टोक, तर खूप वाईट असणारं ‘राक्षसपण’ हे दुसरं टोक आहे. ‘माणूसपण’ या दोहोंमध्ये असतं. कृष्णाने मोठ्या विवेकाने व कौशल्याने आपल्या माणूसपणामध्ये ही दोन्ही टोकं सांधून घेतली. दोहोंचा समन्वय केला.
देवाचं अवतरण व मानवाचं उन्नयन एकाचवेळी एका व्यक्तीमध्ये होणं म्हणजे देवाचा ‘अवतार’ असं म्हटलं जातं. देवाचं पृथ्वीवर अवतरण होणं म्हणजे पृथ्वीवर उतरणं. म्हणजेच देवपण खाली खाली येत जाणं- डिसेंडन्स ऑफ गॉड! आणि माणूस म्हणून उन्नयन होत जाणं म्हणजे माणुसकीच्या धर्माला जागणं. डिसेंडन्स ऑफ हुमन! कृष्णचरित्राचं हेच अंतःसूत्र आहे. कृष्णाने बरोब्बर हेच साध्य केलं. कृष्ण देव नव्हता, सामान्य माणूस होता. सामान्य माणूस म्हणून जगताना त्याचं ‘देवपण’ लोप पावत गेलं आणि ‘माणूसपण’ वाढत गेलं. आपण खूप चांगला, आदर्श, देव असल्याच्या थाटात तो वावरला नाही, म्हणून साध्या माणसांकडून तो ‘देवत्वा’ला पोचला!
गोवर्धन पर्वतासारखी मोठी जबाबदारी सगळ्यानी मिळून एकजुटीने पार पाडली व शेवटचं आधाराचं एक बोट तेवढं कृष्णानं लावलं. सगळ्यांनी म्हटलं की, आमच्या काठ्या नाममात्र, कृष्णाच्या एका बोटानेच पर्वत उचलला गेला. आणि कृष्णाने म्हटलं की, मी नाममात्र, मी फक्त माझ्या करंगळीएवढाच भार उचलला. सगळा भार लोकांनीच उचलला. श्रद्धेला विश्‍वासाचा आधार मिळाला की पर्वतप्राय कामगिरीही सहजसाध्य होते. कृष्णाने आपल्या कार्याचे श्रेय लोकांना बहाल केले व तो त्यांचा ‘देव’ बनत गेला… इथे तो लोकांसाठी साक्षात इंद्रदेवाशी लढला व पुढे लोकांसाठीच त्याने जरासंध, कंस, शिशुपाल, नरकासुर यांच्या अधर्मालाही संपवले. बालपणी यशोदेला मुखामध्ये ब्रह्मांडदर्शन करवणार्‍या अजाण कृष्णाने पुढे अर्जुनाला भगवद्गीता सांगून विश्‍वदर्शनही घडवलं.
अभिरुची व कलासंपन्नता ही माणुसकीची सौंदर्यस्थळं. सच्चा माणूस म्हणून जीवनाचा आनंद व आस्वाद घेत जगणार्‍या कृष्णाच्या डोक्यावरचं मोरपीस व ओठावरची बासरी ही त्याची अस्सल कलावंत असल्याची खूण! आणि-
त्या तिथे अनंग रंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंदिरात वाजला…
अशी रंगलेली रासक्रीडा हा तर कृष्णाचा परमोच्च कलाविष्कार!
टिपूर चांदण्यारात्री हा विलक्षण प्रतिभावंत कलाकार अशी काही जादू घडवतो की तिथे नाचणार्‍या प्रत्येकाला कृष्ण आपल्याबरोबरच नाचत असल्याचा भास होतो. गायक, वादक, नर्तक, वक्ता, तत्त्वज्ञ, विचारवंत, राज्यकर्ता या त्याच्या कलेच्या व ज्ञानाच्या वाटा युगनायक पदाकडे पोचतात, हे त्याचे अद्वितीयत्व!
माणूस म्हणून जगताना त्याच्यातला कलावंत विकारांच्या आधीन झाला नाही, हे खूप महत्त्वाचं… हे निर्विकारी जगणं तो सामान्यांना नाट्यमयरीत्या दाखवून देतो-
हात जोडीता बंधन तुटले
आता जीवाला मी पण मुकले
आत्म्याने जणू परमात्म्याला
अर्पण केली कुडी
दे रे कान्हा चोळी लुगडी….
असं म्हणून कान्हाने पळवलेल्या वस्त्रांसाठी याचना करणार्‍या गोपिकांना आपल्या ‘मी’पणाचा- देहभावाचा विसर पडतो आणि त्यातून कृष्ण प्रेम व वासना यातलं अंतर सिद्ध करून देतो. लौकिक देहाने तो अलौकिक प्रेमालाच आलिंगन देतो.
कान्हाच्या या अलौकिक प्रेमाची कहाणी बनलेली ‘राधा’ हा कृष्णचरित्राचा दिव्य कलाशाध्यायच म्हणावा लागेल. प्रेमिकांनी राधेला कृष्णाची प्रेयसी ठरवलं. प्रापंचिकांनी तिला दिवानी ठरवलं. संत-महात्म्यांनी देवी ठरवलं. व्यावहारिकांनी वेडी ठरवलं. पंडितांनी शहाणी ठरवलं. आध्यात्मिकांनी राधेच्या प्रेमाला अशारिरी अलौकिक मधुराभक्ती असं म्हटलं.
शरश्चंद्रिका मूक हुंकार देते
वनी राधिका गीतगोपाल गाते|
जिथे बैसुनी लाडक्या माधवाने
जिवां जिंकिले धुंद वेणूरवाने
तिथे शोधिते ती मनःशांततेते॥

जगा विस्मरे गोपिका कृष्णवेडी
स्मृतींनी सख्याचे चरिच्चित्र काढी
सुगंधापरी वाहती भावगीते॥
ग. दि. माडगूळकरांची ही विरहिणी राधिका कृष्ण सोडून गेल्यानंतर वनामध्ये ‘गीतगोपाल’ गात राहते. कृष्ण गेल्यानंतरचा एक लखलखीत अंधार बनून राहते.
परंतु राधा-कृष्णाची लौकिकार्थाने अर्धवट उरलेली प्रेमकहाणी इतकी अलौकिक की ती युगानुयुगे पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेत राहते. मग आपल्याला पानाफुलांवर, झाडापेडांवर पशुपक्ष्यांत, नदी-समुद्रात, भरलेल्या आभाळात, श्रावणसरींत, दिवसा-उजेडी आणि प्रत्येक अंधार्‍या रात्रीतही राधाकृष्ण दिसत राहतात.
अगदी तेव्हासारखंच कृष्ण आपलं भावजीवन व्यापून राहतो. आपल्या सुख-दुःखात तो तेव्हासारखाच सहभागी होतो. मुलामाणसांमध्ये भरून राहतो. गोकुळाष्टमीला निघणार्‍या हसर्‍या- रडक्या- शेंबड्या- बोबड्या बाळगोपाळांच्या मिरवणुकीत तो आजही नाचतो. दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांबरोबर तो आजही धमाल करतो. आणि-
मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटची रिकामे पडती घरी
असं म्हणत पैलतीरी नेत्र लागलेल्या पिकल्या पानांच्या जीवनश्रद्धेची काठीही बनून राहतो… बाल्य-तारुण्य-वार्धक्य असं समग्र जीवनच तो व्यापून राहतो.
आशा-निराशा, सुख-दुःख, अपेक्षा-हताशा, प्रेम-वियोग, होकार-नकार असे दोन्ही किनारे तो सांधून घेतो. त्याच्या उजेडालाही अर्थ असतो व अंधारालाही. त्यामुळे-
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळें ही काळी वो माय
बुंथ काळी, बिलवर काळी
गळां मोतीं एकावळ काळी वो माय
अशी ‘कृष्ण कृष्ण’ जपाची काळी एकावळ गळ्यात घातली की अवघं विश्‍वच कृष्णमय होऊन गेलेलं दिसतं.
होकाराला उजेडाचा रंग असतो व नकाराला अंधाराचा. पण कृष्ण हा या दोन्हींमधला मोरपंखी ‘सकार’ आहे. लौकिक जगात जगताना हे अलौकिकाचं मोरपंखी ‘कृष्णगान’ ओठावर असलं की हर एका उजेडाचा दीपोत्सव होतो व हर एका अंधाराची अष्टमीची रात्र….!