हे असे का कोणी सांगेल का?

0
139

– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा
सध्या सर्वत्र विविध संवेदनशील विषयांवरून चर्वण चालू असते. सांस्कृतिक, सांगीतिक, शैक्षणिक, धार्मिक वगैरे विषय जाहीर चर्चासत्रातून चघळले जातात. सध्या मानव नामक प्राण्याने स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवताना या वर उल्लेखित सर्व क्षेत्रांत अगदी सुखेनैवपणे मुक्त संचार आरंभला आहे. मग त्यात नीतीमूल्ये पायदळी तुडवली जातात, यावर ना कोणाला खंत, ना खेद. आता तर मानवाने आपण बसलेल्या झाडाच्या फांदीवरच कुर्‍हाड चालवण्यास घेतली असून त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचारच केलेला नाही. अनिर्बंध, बेकायदा खाणउद्योगामुळे आपल्या भूमातेच्या उदरात वसलेल्या खनिज संपत्तीचा आपल्या क्षणिक फायद्यासाठी र्‍हासच चालवला आहे. या सर्वांमुळे अगणित असा वृक्षसंहार, जंगलतोड आदी गोष्टी घडत असून त्यामुळे या पृथ्वीतलाचा समतोल पूर्णपणे बिघडण्याची भीती समोर ठाकली आहे. नैसर्गिक झरे लुप्त पावले असून उरलेले जलाशय प्रदूषित झाले आहेत. यावर कळस म्हणजे विकासाच्या नावाखाली विविध नैसर्गिक जलप्रवाहांवर आपापल्या राज्यांत धरणे बांधून दुसर्‍या राज्याच्या जनतेवर पाण्याअभावी निर्वासित होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गोव्याच्या शेजारी राज्यांनी (कर्नाटक व महाराष्ट्र) तर या धरणांद्वारे गोव्याच्या तोंडचे पाणीच पळवण्याचा चंगच बांधला आहे. या सर्वांवर काही प्रमाणात अंकुश ठेवण्याचे काम काही पर्यावरणप्रेमी संघटना नेटाने पुढे रेटीत आहेत, पण हे काम करताना या पर्यावरणवाद्यांनीसुद्धा काही गोष्टी ध्यानात ठेवून त्याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे बनले आहे.
पुढील काही उदाहरणे माझ्या या लिखाणाचा उद्देश स्पष्ट करू शकतील –
१) कुठल्याही विषयावर चर्चासत्रे घडवून आणताना ती फक्त पंचतारांकित हॉटेलांच्या वातानुकूलीत सभागृहांतच घेण्याचे प्रयोजन काय हे समजत नाही. अगदी पर्यावरणवाद्यांतर्फे सुद्धा ‘ग्लोबल वॉर्मिंग’ या विषयावरची चर्चासत्रे ही अशा वातानुकूलीत सभागृहांतच पार पडतात. थंडगार असा वातावरणात आत बसून या ‘ग्लोबल वॉर्मिंग’वर चिंता व्यक्त करायची, पण आत बसलेल्या प्रतिनिधींना ‘थंड’ करण्यासाठी अनेक वातानुकूलित यंत्रांद्वारे बाहेरचे वातावरण गरम करायचे, याला काय अर्थ आहे? कुठल्याही वातानुकूलित यंत्राच्या बाहेरच्या बाजूला काही क्षण उभे राहिल्यास माझ्या या म्हणण्याचा प्रत्यय येईल. त्यामुळे आपणच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला हातभार लावत नाही काय?
२) अशाच काही अन्य चर्चासत्रांतून ‘प्लास्टीक व त्याचे दुष्परिणाम’ यावर आपले उच्च विचार जनतेसमोर तावातावाने मांडायचे, व त्यावर टाळ्या मिळवायच्या आणि त्यानंतर सभागृहाबाहेर होणार्‍या चहापानाच्या कार्याक्रमात प्लास्टीकच्या कपांतून चहा व पाणी घेऊन आपल्या भाषणाच्या अगदी विरुद्ध वागायचे. चर्चासत्रांत भाग घेताना प्रत्येकाच्या समोर प्लास्टिक बाटलीतून पाणी ठेवले जाते ते वेगळेच. तेव्हा अशा चर्चासत्रातून आपण जगाला नक्की काय संदेश देतो याचा विचार होणे जरूरीचे वाटते.
३) गाड्यांसाठी वापरले जाणारे पेट्रोल, डिझेल अगदी नैसर्गिक पदार्थांचे साठे जतन करून ठेवण्यासाठी, वेळोवेळी जाहीर उपाय सुचवले जातात. आपल्या भावी पिढ्यांसाठी हे साठे उपलब्ध व्हावेत म्हणून त्यांचा नियंत्रित वापर कसा करावा, हे लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी काही उपक्रम राबवले जातात. या सर्व उपक्रमांवरचा कळस म्हणजे आयोजित केली जाणारी एकादी कार रॅली. अनेक गाड्या या ताफ्यांत पेट्रोल व डिझेल वाचवण्याचे संदेश देणारे बॅनर मिरवीत सर्वत्र संचारात असतात. या अशा रॅलीसाठी किती हजार लीटर पेट्रोल व डिझल वाया जाते, याचा कोणीच सारासार विचार करताना दिसत नाही.
४) आपल्या धार्मिक कार्यात तर परंपरेच्या नावाखाली अन्नाची व इतर साहित्याची कशी नासाडी केली जाते, यावर काहीच उहापोह होताना दिसत नाही आणि जर कोणी यावर विचार व्यक्त करण्याचे धाडस केले, तर त्याला प्रचंड जनक्षोभाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. नारळ, तूप, तेल, अन्य धान्ये व झाडे-झुडपे यांची या कार्यात आहूती देऊन आपण नक्की काय साधत आहोत, याचा विचारच करताना कोणी दिसत नाहीत. त्यावर काही उपाययोजना करण्याची गोष्टच सोडा. खरे तर या सर्वांवर आपल्या धर्मगुरूंनी एकत्र येऊन काही सन्माननीय तोडगा काढण्याची गरज आहे.
५) आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे माणूस मेल्यानंतर त्याच्या देहाचे दहन केले जाते. या दहनासाठी कित्येक झाडांची निर्दय कत्तल केली जाते. हळूहळू या नैसर्गिक ठेव्याची चणचण भासू लागल्यानंतर उपाय म्हणून विद्युतवाहिन्यांचा वापर होऊ लागला व लोकांनी पण हे स्वीकारण्यास प्रारंभ केला. जर अशा विद्युतवाहिन्या प्रत्येक जिल्ह्यात उभारल्या गेल्यास ही वृक्षतोड काही प्रमाणात काबूत येऊन पर्यावरण जतनास मदत होईल.
या संदर्भात मनात आलेला एक स्वैर विचार- आज आपण घरबसल्या दूरचित्रवाणीवरून असंख्य अशा वाहिन्या बघू शकतो. या विविध वाहिन्यांवरून मालिकांचा अक्षरशः रतीब घातला जातो. यातील पुष्कळ मालिका या सत्य घटनांवर आधारित असल्यामुळे यात खून, मारामार्‍या वगैरे गोष्टी दाखवण्यात येतात. त्यामुळे अशा मालिकांच्या जवळजवळ प्रत्येक भागात एखाद्या अंत्यविधीचे साग्रसंगीत चित्रण हमखास दाखवले जाते. सफेद कपडे घालून वावरणारी माणसे स्मशानात उपस्थित राहून समोर जळणार्‍या शवाविना चितेचे दर्शन घेण्यात मग्न असतात. वास्तवतेच्या नावाखाली चालणार्‍या अशा प्रसंगांना कायदेशीर कात्री लावण्याचे धाडस कोणी दाखवील काय?