हे असेच चालायचे?

0
160

ट्रकांच्या पाठीमागे ‘हे असेच चालायचे’ असा एक संदेश अनेकदा रंगवलेला दिसतो. गोव्यातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर ‘हे असेच (रामभरोसे) चालायचे’ असेच एकूण चित्र दिसते आहे. काल राज्यात सर्वाधिक विक्रमी ५०६ कोरोनाबाधित सापडले! ही संख्या हादरवून टाकणारी आहे. जुलैमध्ये दर आठवड्याला सरासरी एक हजार रुग्ण पॉझिटिव्ह सापडत होते. या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही सरासरी दोन हजारांवर गेलेली आहे. तरीही सरकार ‘सारे काही आलबेल आहे’ चा पोकळ अभिनिवेश स्वीकारून परिस्थिती आपल्या आटोक्यात असल्याचा आभास निर्माण करण्यात गुंतलेले आहे. काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकार हे करणार, ते करणार हे सांगितले, परंतु प्रत्यक्षातील जमिनीवरील स्थिती अत्यंत विदारक आहे. रुग्णांना कोविड इस्पितळामध्ये खाटा उपलब्ध नाहीत. आता ही आग लागताच फोंड्याचे उपजिल्हा इस्पितळ उत्तर गोव्यासाठी दुसरे कोविड इस्पितळ म्हणून घोषित करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. आहेत ती इस्पितळे कोविड इस्पितळामध्ये रुपांतरित करण्यात काही भूषण नाही. त्यामुळे अर्थातच, अन्य व्याधी असलेल्या रुग्णांपुढे बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. ‘गरज असेल तरच इस्पितळात यावे’ असे आरोग्यमंत्री काल म्हणाले. गरज असल्याविना इस्पितळात जरा फेरी मारून यावे अशा विचाराने कोणी इस्पितळ गाठत नसतो. आपल्या दुर्धर व्याधींपासून दिलासा मिळवण्यासाठीच इस्पितळामध्ये धाव घेतली जाते. सरकारी इस्पितळे हा या रुग्णांना आधार वाटतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत अगदी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या अन्य वॉर्डांमध्येही कोविड संसर्ग बाधा झाल्याचे आढळून आलेले असल्याने इतर रुग्णांच्या जिवाशीही खेळ मांडला गेलेला आहे. खरे तर राज्यातील खासगी इस्पितळे ताब्यात घेऊन त्यांचे रुपांतर कोविड इस्पितळांत करण्याचे अधिकार सरकारपाशी महामारी कायद्याखाली आहेत, परंतु अशा प्रकारचे पाऊल उचलले जाणार नाही, कारण त्यात हितसंबंध आड येतात. उलट अशा खासगी इस्पितळांना २० टक्के खाटा कोविडसाठी राखीव ठेवण्यास सांगून तेथे जाणार्‍या रुग्णांना तेथील खर्च स्वतः उचलण्यास सांगण्यात आलेले आहे. सरकारच्या एकमेव कोविड इस्पितळातील दुःस्थिती पाहिली तर खासगी इस्पितळांचा हा पर्याय लोकांना आकर्षक वाटू शकतो, परंतु अशाने तेथील इतर रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यताही बळावते. त्यामुळे असल्या मुभा देताना सारासार विचार केला गेला पाहिजे.
येणारे साठ दिवस राज्यात महत्त्वाचे असतील असे आरोग्यमंत्री काल म्हणाले. हे त्रैराशिक कोणत्या आकडेवारीच्या आधारे मांडले गेलेले आहे? खरे तर कोरोनाच्या बाबतीत ज्याला इंग्रजीत ‘पीक’ म्हणतात तसे टोक गाठले जाऊन मग रुग्णसंख्या उतरण्याचे गणिती गृहितक निष्फळ ठरलेले आहे. गणितातले हे सिद्धान्त येथे कामी येत नाहीत हे देशभरात सिद्ध झालेले आहे. त्यामुळे साठ दिवस रुग्णसंख्या वाढत जाऊन नंतर आपसूक खाली येईल हे गृहितकच चुकीचे आहे. आज गरज आहे ती सरकारकडून अधिक चांगल्या रुग्ण व्यवस्थापनाची. तपासणीसाठी येणार्‍या लक्षणविरहित रुग्णांची परत पाठवणी, रुग्णांसाठी अपुर्‍या खाटा, तेथील नाममात्र औषधोपचार, जाणार्‍या बळींवर ‘को-मॉर्बिड’चे पांघरूण हे आता बस् झाले. इतर राज्यांचा आदर्श गोव्याने घेण्याची आज जरुरी आहे. प्लाझ्मा उपचारपद्धतीचा अवलंब सरकारने केला आहे आणि आतापावेतो हे उपचार दिलेल्या दहा रुग्णांपैकी सात जणांची प्रकृती सुधारल्याचा सरकारचा दावा आहे. खरे तर कोरोनाचे सर्वसाधारण रुग्ण सात – आठ दिवसांत आपोआप बरे होत असतात. खरी गरज आहे ती सहआजार असलेल्या रुग्णांचे जीव वाचवण्याची. गेल्या आठवड्यात कोरोनाने राज्यात तब्बल २७ मृत्यू झाले. हे मृत्यूसत्र थांबले पाहिजे. एखादा मृत्यू झाला की त्याचे वय कसे अधिक होते वा त्याच्यात इतर आजार कसे होते हे सांगण्याची किंवा रुग्णांची आकडेवारी लपवण्याची जी धडपड चालते ती करण्यापेक्षा हे जीव वाचवण्यासाठी अजून काय करता येईल हे पाहिले तर ते अधिक हितावह ठरेल! सध्याची परिस्थिती पाहून ‘हे असेच चालायचे?’ असा प्रश्न आज जनतेला पडला आहे!