‘हॅपी न्यू इयर’

0
127
  •  अनुराधा गानू
    आल्त सांताक्रूझ-बांबोळी

या सगळ्या गोष्टींचं प्रमाण येणार्‍या प्रत्येक नवीन वर्षात वाढतंच आहे.
तरीही आपण दरवर्षी एकमेकाला ‘हॅपी न्यू इयर’ म्हणणारच आहोत… पुढचं वर्ष तरी हॅपी असेल या आशेवर! शेवटी माणूस हा आशेवरच तर जगतोय.

प्रत्येक नवीन वर्ष येतं आणि जातं. येतानाही वाजत गाजत येतं आणि जातानाही वाजत गाजत जातं. हिंदूंचं नवीन वर्ष चैत्र पाडव्यापासून सुरू होतं. पण त्याचं स्वरूप खूप सात्विक आणि साधं असतं, एक जानेवारीसारखं नसतं. पाडव्यापासून सुरू होणार्‍या वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारून, तिची पूजा करून सुरू होतं. गुढीची पूजा झाली की देवळात जाऊन यायचं. गोडाधोडाचं जेवण, देवाला नैवेद्य, पुढील वर्षासाठी काहीतरी संकल्प करायचा आणि नंतर मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तइष्ट सगळ्यांना भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या. इतकी साधी, सोपी, पवित्र सुरुवात नवीन वर्षाची!

व्यवहारात आपण मानतो ते ब्रिटिश गणनेनुसार असलेले वर्ष. सरकारी कॅलेंडरही तसंच असतं. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर. त्यामुळे ३१ डिसेंबरला वर्षाचा शेवटचा दिवस. सरत्या वर्षाचा निरोप समारंभ वाजत गाजत होतो आणि दुसर्‍या दिवसापासून म्हणजे १ जाने.पासून सुरू होण्यार्‍या वर्षाचं स्वागत आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन करतो. पण अलीकडच्या काळात येणारं नवीन वर्ष हे आनंदी, हॅपी ठरल्याचं मला तरी आठवत नाही. बहुतेक वेळेस जुन्या वर्षाला निरोप देण्याचे प्रकार इतके ओंगळवाणे असतात की अनेक कुटुंबातून नवीन वर्षाची सुरुवातच दुःखद घटनेने होते.
३१ डिसेंबर म्हटलं की वेगवेगळ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. आणि पार्ट्या म्हणजे तरी कसल्या? बर्‍याच ठिकाणी, क्लब्जमधून या पार्ट्या आयोजित केल्या जातात. केक कापून पार्टी सुरू होते. मग मांसाहारी जेवण आणि वेगवेगळ्या प्रकारची मद्य आणि संगीताच्या तालावर तोकडे कपडे घालून नाच. अशा पार्ट्या जाणार्‍या वर्षाला निरोप आणि येणार्‍या नवीन वर्षाचं स्वागत यासाठी असतात. ३१ डिंसे.च्या रात्रीच्या पार्टीत आजची तरुणाई इतकी धुंद झालेली असते की १ जाने.च्या पहाटे पहाटे हे तरूण धुंदीतच गाड्या चालवतात आणि हमखास अपघाताचे बळी ठरतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वर्तमानपत्रांची पाने अपघात आणि त्यात झालेले मृत्यू यांच्या बातम्यांनी भरून जातात. मग अशा शेकडो कुटुंबांसाठी नवीन वर्ष हॅपी असेल का? अनेक कुटुंबातला एकुलता एक मुलगा अपघातात सापडतो. मग या कुटुंबासाठी नवे वर्ष हॅपी कसे असेल??
आणि मग पूर्ण वर्षभर वर्तमानपत्र आणि टीव्हीवर झळकणार्‍या बातम्या यामध्ये आनंदी, हॅपी होण्यासारख्या बातम्या कमीच असतात. घरात कोणी नसताना घरं फोडून चोर्‍या होतात आणि मध्येच कोणी आडवं आलं तर त्याला मारून टाकलं जातं. विशेष करून गणेश चतुर्थीच्या दिवसांत, ख्रिसमसच्या दिवसात आणि इतर सणासुदीच्या दिवसात. म्हणजे अशा आनंदाच्या प्रसंगीच हे हल्ले होतात. कारण अशा वेळी घरात कोणी नसण्याची शक्यता जास्त असते. बलात्काराच्या बातम्या रोज असतात. गँग रेपचा अतिशय गलिच्छ प्रकार लोकांनी शोधून काढलाय आणि माणूस किती नीच आणि खालच्या थराकडे चाललाय याचं हे द्योतक आहे.

तीच कथा खुनाबाबतही. संपत्तीसाठी, जमिनीच्या वादावरून अगदी भाऊ-भाऊ काय किंवा बाप-मुलगा काय एकमेकांचे खून करून मोकळे होतात. प्रेम प्रकरणातून खून, आत्महत्या, हुंडाबळी या बातम्या नेहमीच्याच. मोटरबाईकवरून जाता जाता साखळ्या- मंगळसूत्रे ओढणे हे तर अगदी नेहमीचेच. त्याचबरोबर घोटाळ्यांचं तर पेवच फुटलंय. या सगळ्यांच्या जोडीला दहशतवाद, आतंकवाद, ड्रग्ज माफिया आहेतच. हे सगळं मानवनिर्मित! शिवाय…

निसर्गाचा कोप असतोच. वादळं होतात, त्सुनामी येतात, पूर येतात, दुष्काळ पडतो, भूकंप होतात, अग्नितांडव चालू असते, इमारती कोसळतात, अशा कितीतरी घटना घडतात आणि त्यात किती लोकांचे बळी जातात याची काही गणतीच नाही. हे सगळं नेमेचि येतो मग पावसाळा… इतकं नियमित होत असतं. या सगळ्या गोष्टींचं प्रमाण येणार्‍या प्रत्येक नवीन वर्षात वाढतंच आहे.
तरीही आपण दरवर्षी एकमेकाला ‘हॅपी न्यू इयर’ म्हणणारच आहोत… पुढचं वर्ष तरी हॅपी असेल या आशेवर! शेवटी माणूस हा आशेवरच तर जगतोय. आशेची बेडी आपल्या पायातून काढली तर आपण पंगूच होऊन जाऊ. म्हणूनच दर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचं आणि हॅपी न्यू इयर म्हणायचंच!!