हृदयविकार उपचारासाठी गोमेकॉ घेणार मियामी विद्यापीठाची मदत

0
99

>> सामंजस्य करार लवकरच ः आरोग्यमंत्री

राज्यातील हृदयविकाराच्या रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचारासाठी मियामी विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे. यासंबंधी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि मियामी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार लवकरच केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

राज्यात ३५ वर्षे वयाच्या युवकालासुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा रुग्णांवर वेळीच उपचार करण्याची गरज असते. हृदयविकाराचा झटका येणार्‍या रुग्णांवर उपचारासाठी मियामी विद्यापीठाने नवीन संशोधन केले आहे. सामंजस्य कराराच्या माध्यमातून हृदयविकाराच्या नवीन उपचारांबाबत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

गोमेकॉत हृदयविकाराचा झटका येणार्‍या रुग्णांवर उपचारासाठी अत्याधुनिक साधनसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचारासाठी अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीच्या साधनसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यासाठी १५ ते २० कोटी रुपये खर्च करण्याची गरज आहे. सरकारी इस्पितळामध्ये अद्ययावत सेवा उपलब्ध केल्यास सामान्य लोकांना फायदा होणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

डॉ. तेरेझा घेणार
अत्याधुनिक प्रशिक्षण
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. तेरेझा यांना हृदय रुग्णांवरील अत्याधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी क्लीव्हलँड येथे जाण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. डॉ. तेरेझा सदर ठिकाणी जुलै महिन्यात दोन आठवडे राहून नवीन पद्धतीच्या उपचार पद्धतीचा अभ्यास करणार आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

डॉक्टरांना अद्ययावत वैद्यकीय प्रशिक्षणासाठी साहाय्य करण्यासाठी एक नवीन योजना तयार करण्यात आली आहे. सरकारी हॉस्पिटलमधील कुणीही डॉक्टर अद्ययावत वैद्यकीय उपचारांबाबत देशातील कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊ शकतो, असे मंत्री राणे यांनी सांगितले.