हृदयरुग्णांना ग्राम पातळीवर तातडीने सुविधा

0
123

>> खास उपक्रम ‘स्टेमी’खाली राज्यभरात ९ केंद्रे सुरू करणार

राज्यातील हृदयरुग्णांना ग्राम पातळीवर तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्टेमी हा खास उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाखाली राज्यभरात नऊ केंद्र कार्यान्वित केली जाणार असून गरज भासल्यास आणखीन दोन – तीन केंद्राची संख्या वाढविली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात २ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या नऊ केंद्रावर हृदय विकाराचा झटका येणार्‍या रूग्णांसाठी आवश्यक इंजेक्शन उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यात हृदय व इतर प्रकारच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने १०८ रूग्णवाहीकंावर आधुनिक लाईफ सेव्हींग सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्टेमी हा उपक्रम आरोग्य संचालनालय, कार्डीयेक विभाग आणि ईएमआरआय १०८ रूग्णवाहिका सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे.
राज्यातील मेडिकल टूरिझमला मांद्रे मतदारसंघातून प्रारंभ केला जाणार आहे. मांद्रे येथे उभारण्यात येत असलेल्या हॉस्पिटलची पाहणी केली आहे. या हॉस्पिटलच्या कामाला चालना देण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

गोमेकॉमध्ये नवजात मुलांची स्क्रिनिंगची सुविधा लवकरच पुन्हा सुरू केली जाणार आहे. या हॉस्पिटलमध्ये नवजात मुलांच्या स्क्रिनिंगची सुविधा काही वर्षापूर्वी बंद करण्यात आली. ही सुविधा सुरू करण्यासाठी निविदेला मान्यता देण्यात आली असून मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात आली आहे. गोमेकॉमध्ये मधुमेह नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

इंजेक्शनसाठी साडेतीन कोटींची तरतूद
स्टेमी या खास उपक्रमाखाली राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना हृदयरूग्णावर तातडीचे उपचार करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा, उपजिल्हा हॉस्पिटल, प्राथमिक व सामाजिक आरोग्य केंद्रात हृदयरूग्णांसाठी आवश्यक खास इंजेक्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. इंजेक्शन्स उपलब्ध करण्यासाठी साधारण तीन ते साडे तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

५ कार्डिएक रुग्णवाहिकांचा शुभारंभ

सरकारी १०८ रूग्णवाहिका सेवेतील अत्याधुनिक सुविधांनी युक्त पाच कार्डीएक रूग्णवाहिकांचा शुभारंभ आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते काल करण्यात आला. हृदयविकाराच्या तक्रारीवर रूग्णांना तातडीचे उपचार देण्यासाठी रूग्णवाहीकेत खास प्रशिक्षित डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राणे यांनी दिली.

यावेळी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. राजनंदा देसाई, गोवा मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. प्रदीप नाईक, एमआरएफ कंपनीचे अधिकारी जोसेफ, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी, गोमेकॉतील डॉ. गुरूप्रसाद नाईक उपस्थित होते. गोवा राज्य अत्याधुनिक सुविधांनी युक्त कार्डीएक रुग्णवाहिका सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. एमआरएफ कंपनीने उपलब्ध केलेल्या दीड कोटी रूपयांच्या निधीतून कार्डीएक रूग्णवाहीका खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच या रूग्णवाहिकांवरील काही सुविधांसाठी कलरकॉन या कंपनीने सहकार्य केले आहे. पणजी, फोंडा, वास्को-मडगाव, काणकोण व म्हापसा येथे कार्डीएक रूग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. आगामी काळात आणखीन कार्डीएक रूग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

या रूग्णवाहिकांमध्ये हृदयरूग्णावर तातडीच्या उपचारासाठी खास प्रशिक्षित डॉक्टर, प्रशिक्षित ईएमटी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच मॉडन लाईफ सेव्हींग साधन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रूग्णवाहिकेमध्ये व्हेन्टीलेटर, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहे. या पाच पैकी दोन कार्डीएक रूग्णवाहिका त्वरीत रूग्णसेवेत दाखल होतील. तीन रूग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध नसल्याने २३ मार्चनंतर कार्यरत होणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.