‘हीटमॅन’ रोहितचे शतक; भारताने टी-२० मालिका जिंकली

0
116

>> तिसर्‍या लढतीत इंग्लंडवर ७ गड्यांनी मात

सलामीवीर रोहित शर्माच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने तिसर्‍या व निर्णायक लढतीत इंग्लंडवर ७ गडी राखून मात करीत ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्माची सामनावीर व मालिकावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

दोन्ही संघ या मालिकेत १-१ असे बरोबरीत होते. त्यामुळे आजच्या सामन्यात मालिका विजयासाठी भारताला विजय अत्यावश्यक होता. इंग्लंडकडून मिळालेल्या १९९ धावाचे विजयी लक्ष्य भारताने १८.४ षट्‌कांत २०१ धावा करीत पार केले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना डावखुरा सलामीवीर शिखर धवन केवळ ५ धावा जोडून तंबूत परतल्याने भारतीय संघाला प्रारंभीच जोरदार झटका बसला. धवन डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर जेक बॉलकडे झेल देऊन परतला. परंतु त्यानंतर ‘हीटमॅन’ रोहित शर्माने संघाचा डाव सावरतानाच धडाकेबाज शतकी खेळी करीत टीम इंडियाला मालिका विजय मिळवून दिला. रोहितने दुसर्‍या विकेटसाठी लोकेश राहुलच्या साथीत ४१ धावा जोडल्या. जेक बॉलने राहुलला (१९) ख्रिस जॉर्डन करवी झेलबाद करीत इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर रोहितने आपला धडकाबेज खेळ चालूच ठेवताना कर्णधार विराट कोहलीच्या साथीत तिसर्‍या विकेटसाठी ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ख्रिस जॉर्डनला उचलून मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली झेल बाद झाला. जॉर्डनेच स्वतःच्या गोलंदाजीवर कोहलीचा झेल पकडला.

त्यानंतर आणखी गडी बाद होऊ न देता कोहली बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमावर बढती मिळालेल्या हार्दिक पंड्याच्या साथीत अविभक्त खेळी करीत रोहितने भारताला आकर्षक विजय मिळवून दिला. रोहित ११ चौकार व ५ षट्‌कारांसह ५६ चेंडूत १०० तर हार्दिक पंड्या ४ चौकार व २ षट्‌कारांनिशी १४ चेंडूत ३३ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडतर्फे डेव्हिड विली, जेक बॉल आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी भारताकडून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण मिळाल्यानंतर इंग्लंडने ९ गडी गमावत १९८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ७.४ चेंडूतच इंग्लंडला ९४ धावांची सलामी दिली. सिद्धार्थ कौलने बटलरला (३४) त्रिफळाचित करीत जमलेली ही जोडी फोडत भारताला पहिले यश मिळवून दिले. लगेच दीपक चहरने धोकादायक बनलेल्या जेसन रॉयला यष्ट्यांमागे धोनीकरवी झेलबाद केले. जेसनने ४ चौकार व ७ षट्‌कारांच्या सहाय्याने ३१ चेंडूत सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्याने झटपट चार बळी मिळवित इंग्लंडला दोनच्या पार जाण्यापासून रोखले. आलेक्स हेल्स (३०), कर्णधार इयॉन मॉर्गेन (६), बेन स्टोक्स (१४) आणि जॉनी बेअरस्टो (२५) हे चार खंदे फलंदाजी हार्दिकच्या गोलंदाजीवर बाद झाले. सिद्धार्थ कौलने २ तर दीपक चहर व उमेश यादव यांनी प्रत्येकी ब गडी बाद केला.

धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. महेंद्रसिंह धोनी गो. दीपक चहर ६७, जोस बटलर त्रिफळाचित गो. सिद्धार्थ कौल ३४, आलेक्स हेल्स झे. महेंद्रसिंह धोनी गो. हार्दिक पंड्या ३०, ईयॉन मॉर्गेन झे. महेंद्रसिंह धोनी गो. हार्दिक पंड्या ६, बेन स्टोक्स झे. विराट कोहली गो. हार्दिक पंड्या १४, जॉनी बेअरस्टो झे. महेंद्रसिंह धोनी गो. हार्दिक पंड्या २५, डेव्हिड विली त्रिफळाचित गो. उमेश यादव १, ख्रिस जॉर्डन धावचित (महेंद्रसिंह धोनी) ३, लियाम प्लंकेट झे. महेंद्रसिंह धोनी गो. सिद्धार्थ कौल ९, आदिल रशिद नाबाद ४.

अवांतर ः ५. एकूण २० षट्‌कांत ९ बाद १९८ धावा.
गोलंदाजी ः दीपक चहर ४/०/४३/१, उमेश यादव ४/०/४८/१, सिद्धार्थ कौल ४/०/३५/२, हार्दिप पंड्या ४/०/३८/४, युझवेंद्र चहल ४/०/३०/०.भारत ः रोहित शर्मा नाबाद १००, शिखर धवन झे. जेक बॉल गो. डेव्हिड विली ५, लोकेश राहुल झे. ख्रिस जॉर्डन गो. जेक बॉल १९, विराट कोहली झे. व गो. ख्रिस जॉर्डन ४३, हार्दिक पंड्या नाबाद ३३.अवांतर ः १. एकूण १८.४ षट्‌कांत ३ बाद २०१ धावा.
गोलंदाजी ः डेव्हिड विली ३/०/३७/१, जेक बॉल ३/०/३९/१, ख्रिस जॉर्डन ३.४/०/४०/१, लियाम प्लंकेट ३/०/४२/०, बेन स्टोक्स २/०/११/०, आदिल रशिद ४/०/३२/०.