हिराबाई तळावलीकर विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

0
264
  • नितीन कोरगावकर

 

साकोर्डा एज्युकेशन सोसायटीचे हिराबाई तळावलीकर विद्यालय यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५ जानेवारी २०१८ रोजी ‘सूर सांज’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त विद्यालयाच्या यशाचा आलेख आणि कार्यक्रमाविषयी थोडेसे……

१९६७-६८ साली या विद्यालयाची स्थापना झाली. गोवा मुक्त होऊन सहा-सात वर्षांचा काळ लोटला होता. गावात शिक्षणाची काहीच सोय नव्हती. फोंडा किंवा केपेसारख्या ठिकाणी जाऊन साकोर्डा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे केवळ अशक्यप्राय होते. सार्वजनिक वाहतुकीची अशी सोयही नव्हती. अशावेळी दत्ता नाडकर्णी, रघुवीर देसाई, जिवाजी देसाई व मधु साकोर्डेकर हे त्यावेळचे तरुण, ज्यांना गावात शिक्षणाची सोय व्हावी असे वाटत होते… ते एक दिवस प्रकाश
तळावलीकर यांच्या फार्म हाऊसवर गेले व त्यांनी हा विचार त्यांच्यापुढे मांडला.

प्रकाश तळावलीकर हे साकोर्डा भागात आपला खाण व्यवसाय सांभाळण्यासाठी व देखभाल करण्यासाठी साकोर्डा येथेच आपल्या फार्महाऊसवर राहात असत. या चौघांनी आपला मानस त्यांच्याकडे बोलून दाखवला व त्या संदर्भात सर्वोदय विद्यालय-केपे यांच्याशी काय बोलणी झाली हेपण सांगितले. प्रकाश तळावलीकर यांनी साकोर्डा भागात शाळा सुरू करण्याची कल्पना उचलून धरली. कारण एकतर त्या भागात शाळे -अभावी मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत होती आणि दुसरे म्हणजे ज्या भागात आपला खाण व्यवसाय चालतो त्या भागासाठी काहीतरी करायला हवे… हाही विचार प्रकाश तळावलीकर यांच्या मनात दृढ झाला.

त्या चौघांना प्रकाश यांनी सांगितले की इतर संस्थेच्या मार्फत शाळा सुरू करण्यापेक्षा आपणच का करू नये? आणि त्याप्रमाणे लागलीच हालचाल करून शाळा काढण्याचा निर्णय पक्का झाला. प्रकाश तळावलीकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कबुल केले आणि तेथील आपल्या जागेतील दोन खोल्या वर्गासाठी उपलब्धही करून दिल्या. आणि साकोर्डा एज्युकेशन सोसायटी स्थापून त्यामार्फत विद्यालय सुरळीतपणे मार्गी लागले. अशा प्रकारे या विद्यालयाने आज सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.

आज या संस्थेच्या साकोर्डा येथील विद्यालय संकुलात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग कार्यरत आहेत आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे हे विद्यालय अभिमानाने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

या संस्थेने नवे-साकोर्डा येथील विद्यार्थ्यांना या विद्यालयात यायला पावसाळ्यात वगैरे त्रास होत असल्याने नवे-साकोर्डा येथे दुसरे विद्यालय स्थापन केले आहे. त्या विद्यालयालाही आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. साकोर्डा विद्यालयात कोले, मोले, तांबडी सुर्ल, बाराभूमी, धारबांदोडा अशा वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात. चारशेच्या घरात विद्यार्थ्यांची संख्या आहे. १७-१८ वर्षांपूर्वी उच्च माध्यमिक विभाग सुरू केल्याने विद्यार्थ्यांची आणखीनच चांगली सोय झाली आहे.

आज प्रकाश तळावलीकर हयात नाहीत परंतु त्यांचे बंधू प्रसिद्ध रंगकर्मी, ललित लेखक प्रदीप तळावलीकर हे संस्थेचे अध्यक्षपद भूषवित आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५ जानेवारी २०१८ रोजी ‘सूर सांज’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘सूर सांज’ मैफलीचे मानकरी
हिराबाई तळावलीकर विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५ जाने. रोजी सायंकाळी ६.३० वा. होणार्‍या ‘सूर सांज’ मैफलीचे मानकरी आहेत झी मराठी आयडिया सारेगमपमध्ये चमकलेला युवा गायक प्रसन्न प्रभू तेंडुलकर, डॉ. निशा धुरी (महाराष्ट्र) व गोव्याची प्रभावी अष्टपैलू युवा गायिका कु. नम्रता पराडकर.

प्रसन्न प्रभू तेंडुलकर
झी-मराठी सारेगमपच्या सातव्या पर्वात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेला प्रसन्न तेंडुलकर हा आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. अनेक स्पर्धांतून तो चमकला आहे. शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे शिक्षण त्याने गुरुदास मुंडये यांच्याकडून घेतले व पुढील शिक्षण पं. अभिषेकीबुवांचे शिष्य भाई शेवडे यांच्याकडे सुरू आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच नाट्यगीत, अभंग, भावगीत, चित्रपटगीत, गझल, असे विविध प्रकार तो उत्कृष्टपणे सादर करतो. मुंबई, पुणेसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

डॉ. निशा धुरी
डॉक्टरी पेशा सांभाळून सुगम गायनात प्राविण्य मिळविलेल्या डॉ. निशा यांनी राजन माडिये यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विशारद पदविका संपादन केली आहे. तसेच श्याम तेंडुलकर यांच्याकडून सुगम संगीताचे मार्गदर्शन घेतले आहे. ‘गोडी गगन गिरीची’ या अल्बमसाठी त्या गायिल्या आहेत. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे यांच्यासमवेत गाण्याची संधी त्यांना लाभली आहे. भावगीते, भक्तिगीते, सिनेसंगीत अशी विविध गीते गाण्यात त्यांचा हातखंडा आहे.

कु. नम्रता पराडकर
नम्रता यांनी सुरवातीला दहा वर्षे प्रदीप नाईक यांच्याकडे व त्यानंतर गेली अनेक वर्षे शरद मठकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाची त्यांची तालीम सुरू आहे. गांधर्व महाविद्यालय मंडळाची विशारद पदविका त्यांनी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे. शास्त्रीय व नाट्यसंगीताच्या राज्यस्तरीय स्पर्धांतून त्यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकाविली आहेत. अनेक संगीत संमेलनातून त्यांनी शास्त्रीय गायन सादर केले आहे. फार्म्यास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये त्यांनी एम्‌एस्‌सी केले आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम संगीताचे इतर प्रकारही गाण्यात त्यांचा हातखंडा आहे.