‘हिटमॅन’ ठरला ‘आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर’

0
116

>> दीपक चहर व कर्णधार कोहलीचीही पुरस्कारांसाठी निवड

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ म्हणून परिचित असलेल्या विस्फोटक फलंदाज रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१९सालचा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू (आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर) म्हणून निवड केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार कर्णधार विराट कोहली आणि युवा नवोदित गोलंदाज दीपक चहरलाही पुरस्कार घोषित झाले आहेत.

रोहित शर्माने विस्फोटक फलंदाजी करताना २०१९ साली वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळेच त्याची आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या ‘सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रोहितने २०१९ विश्वचषकात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका या पाच देशांविरुद्ध तडफदार शतके झळकाविली होती. त्याच वेळी त्याने श्रीलंकेच्या कुमार संघकाराचा एकाचा विश्वचषकात चार शतकांचा विक्रमही मोडीत काढत आपल्या नावे केला होता.

टीम इंडियाचा आक्रमक कर्णधार विराट कोहलीला ‘स्पिरिट ऑफ दी क्रिकेट’ हा आयसीसीचा खिलाडीवृत्तीसाठीचा पुरस्कार घोषित झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराटने खिलाडीवृत्तीचे दर्शन घडविताना प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला टोमणेबाजी न करण्याचे आवाहन करतानाच त्याचे मनोधैर्य वाढविण्याचे आवाहनही केले होते. विराटची ही खिलाडीवृत्ती पाहून स्मितही काही वेळ भारावून गेला होता आणि त्याने विराटच्या पाठीवर थाप मारत आभार व्यक्त केले होते. याच खिलाडीवृत्तीसाठी आयसीसीने विराटची २०१९ वर्षातील ‘स्पिरिट ऑफ दी क्रिकेट’ या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

दरम्यान, भारताचा युवा व नवोदित गोलंदाज दीपक चहरला आयसीसीचा ‘सर्वोत्तम टी-२० परफॉमन्स ऑफ दी ईयर’ पुरस्कार घोषित झाला आहे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसर्‍या आणि निर्णायक लढतीत ३.२ षट्‌कांत केवळ ७ धावा देत ६ बळी मिळवित भारताला मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. याचा सामन्यात त्याने टी-२०मधील हॅट्‌ट्रिक नोंदविण्याची किमया साधली होती. टी-२०मध्ये हॅट्‌ट्रिक नोंदविणारा तो भारताच पहिला गोलंदाज ठरला होता. याच कामगिरीसाठी त्याची ‘सर्वोत्तम टी-२० परफॉमन्स ऑफ दी ईयर’ पुरस्कारसाठी निवड झाली आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स याला आयसीसीचा २०१९मधील सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू (सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी फॉर द वर्ल्ड प्लेयर ऑफ दी ईयर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
स्कॉटलंडच्या कायल कोएत्झर याला आयसीसीच्या संलग्न संघांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा (असोसिएट प्लेयर ऑफ दी ईयर) पुरस्कार घोषित झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा युवा व सध्या बहरात असलेला फलंदाज मार्नस लाबुशेनला वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्रिकेटपटू (मेन्स इमर्जिंग क्रिकेट ऑफ दी ईयर) पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

अन्य घोषित पुरस्कार पुढील प्रमाणे ः पॅट कमिन्स – आयसीसी सर्वोत्कृष्ट कसोटीपटू (टेस्ट क्रिकेटर ऑफ दी ईयर), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) – आयसीसी २०१९चे सर्वोत्कृष्ट पंच (अंपायर ऑफ दी ईयर).