हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक

0
124

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी झालेला हिंसाचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याबद्दलच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हिंसाचाराला हिंदू एकता आघाडी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला असून आजच्या बंदला विविध राजकीय पक्षांसह सुमारे २५० संघटनांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बंदच्या काळात लोकांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या संदर्भात मराठा-दलित यांच्यात कोणताही संघर्ष झाल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे.

अनुक्रमे मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखालील हिंदू एकता आघाडी व शिवराज प्रतिष्ठान यांच्यामुळे हा हिंसाचार घडल्याचा आरोप डॉ. आंबेडकर यांनी केला. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ईस्ट इंडिया कंपनी (ब्रिटिश) व पेशवे यांच्या सैन्यांदरम्यानच्या १८१८ च्या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला होता. त्या घटनेची द्विशताब्दी साजरी करण्यासाठी ध्वज स्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.

सोमवारच्या त्या कार्यक्रमावेळी हा हिंसाचार घडविण्यात आला. तत्कालीन युद्धात ब्रिटिश सैन्यात महार समाजातील सैनिक होते. त्यावेळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानले जात होते. आंबेडकर म्हणाले की, शिवराज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गावकर्‍यांना भडकावले व हिंदू एकता आघाडीच्या लोकांनी सोहळ्याच्या ठिकाणी लोकांवर दगडफेक केली. यानंतरच्या हिंसाचारात एक युवक ठार झाला.

…तर सोहळा
झालाच नसता
डॉ. आंबेडकर पुढे म्हणाले की, सोमवारच्या कार्यक्रमाचे आयोजन मराठा संघटना संभाजी ब्रिगेडने केले होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू सभा व पेशव्यांचे वारस यांनी विरोध केला होता. त्यानंतर आम्ही अ. भा. हिंदू सभेच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात आधी तणाव असता तर सदर कार्यक्रम झालाच नसता असे ते म्हणाले.

चौकशी हायकोर्टाच्या
मुख्य न्यायाधीशांमार्फत व्हावी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला असला तरी ही चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान मुख्य न्यायाधीशांमार्फत होण्याची आवश्यकता आंबेडकर यांनी व्यक्त केले.

संभाजी भिडे, एकबोटे
यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोट यांच्याविरुद्ध येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिंसाचारात सापडलेल्या एका महिलेने या दोघांविरुद्ध पोलिसांत फिर्याद केली आहे.

अज्ञात व्यक्तींनी आपल्यासमोर काही लोकांना मारहाण केली. त्याचा फटका आपल्यासह अन्य अनेकांना बसला. महिलांसह काही लोक टेम्पोने जाताना अज्ञातांनी टेम्पो अडवून फोडली व लोकांवर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हिंसाचारामागे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. त्यांच्याविरोधात अत्याचार, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव व ठार मारण्याची धमकी अशा कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

न्यायालयीन चौकशी
करणार ः फडणवीस

भीमा कोरेगावमधील हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत ही चौकशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या अनुषंगाने अफवा पसरविणार्‍यांवर कठोर कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले.

सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद काल मंगळवारी मुंबईतील, गोवंडी, मुलूंड, चेंबूर तसेच पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणीही उमटले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोमवारी भीमा किनारी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी सुमारे तीन लाख लोक जमा झाले होते. यावेळी समाजकंटकांचा दंगल घडवून आणण्याचा इरादा होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवून हा डाव उधळून लावला. ज्या युवकाचा मृत्यू झाला ती घटना हत्या असे मानून सीआयडीमार्फत तपासकाम होईल असे फडणवीस म्हणाले.