हिंसाग्रस्त दिल्लीत तणावपूर्ण शांतता

0
134

>> मृतांची संख्या ३८ वर ः तपासासाठी एसआयटी स्थापन

ईशान्य दिल्लीतील जातीय हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या काल ३८ वर गेली. येथील गुरू तेग बहादूर (जीटीबी) इस्पितळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारास रविवारी सुरुवात झाल्यापासून इस्पितळात मृतावस्थेत आणलेल्यांची संख्या २२ एवढी होती. तर इस्पितळात २०० जणांवरील उपचारांदरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दिल्ली पोलीस खात्याचे प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी दिल्लीतील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत ४८ एफआयआर नोंदविण्यात आल्याचे ते म्हणाले.

तपासकामासाठी दोन
एसआयटी स्थापन
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराच्या तपासकामासाठी दोन विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच विभागाखाली ही पथके काम करणार असून या प्रकरणी दाखल करण्यात आलेली सर्व एफआयआर या एसआयटींकडे पाठविण्यात आली आहेत.

संशयित हुसेन यांच्या
इमारतीला सील
ईशान्य दिल्लीच्या खजुरी खास या भागातील आम आदमी पक्षाचे एक नगरसेवक ताहीर हुसेन हे गुप्तचर कर्मचार्‍याच्या मृत्यूप्रकरणात गुंतले असल्याचा आरोप असून त्यांच्या तेथील एका इमारतीत मोठ्या प्रमाणात दगड, विटांचा साठा तसेच पेट्रोल बॉम्ब आदी सापडले आहे. यामुळे हुसेन यांच्या सदर इमारतीला दिल्ली पोलिसांनी सील ठोकले आहे. हिंसाचाराच्या काळात हुसेन यांच्या इमारतीच्या छतावर मोठ्या संख्येने लोक उभे राहून खाली पेट्रोल बॉम्ब फेकत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे ते सध्या संशयाच्या घेर्‍यात आहेत.

निर्दोष असल्याचा हुसेन यांचा दावा
दरम्यान, ताहीर हुसेन यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपण पोलिसांना आपले घर अज्ञातांनी घेरल्याची माहिती आधीच दिली होती असे त्यांनी म्हटले आहे.

दोषी ‘आप’चा असल्यास दुप्पट शिक्षा करा ः केजरीवाल
दिल्लीत हिंसाचार माजवणार्‍या दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. दोषी भाजपचा असो, कॉंग्रेसचा असो, ‘आप’चा असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो कोणाचीही गय करू नये. दोषी ‘आप’चा असल्यास त्याला दुप्पट शिक्षा करावी अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केली.