हिंसक घटनांनंतर महाराष्ट्र बंद मागे

0
73

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिपा बहुजन महासंघाने विविध संघटनांच्या सहकार्याने पुकारलेला एका दिवसाचा महाराष्ट्र बंद काल मागे घेण्यात आल्याचे महासंघाचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये रास्ता-रेल रोको तसेच जाळपोळीसारख्या घटनांसह राज्यात जनजीवन विस्कळीत बनले असल्याचे वृत्त असले तरी हा बंद शांततापूर्ण झाल्याचा दावा डॉ. आंबेडकर यांनी केला.

दरम्यान बंद मागे घेतल्यानंतरही सावधगिरी म्हणून प्रशासनाने आज दि. ४ रोजी मध्यरात्रीपर्यंत ठाणे भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान नांदेडमध्ये हिंसक आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यानंतर त्यातील एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. राज्याच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ मुंबई शहरात काल दगडफेक, रेल्वे रोखणे, जाळपोळ यासारख्या घटनांची नोंद झाली. मुंबईतील प्रवासी बसगाड्यांना यावेळी लक्ष्य करून नुकसान करण्यात आले. कलानगर, वांद्रे, धारावी, कामराजनगर, संतोष नगर, दिंडोशी, हनुमान नगर या भागांमध्ये निदर्शकांनी एकूण १३ प्रवासी बसगाड्यांची तोडफोड केली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.