हिंदू जीवनपद्धतीचे मनोज्ञ दर्शन

0
227

एडिटर्स चॉइस

  •  परेश प्रभू

हिंदू धर्म हाच असा धर्म आहे जो आजच्या एकविसाव्या शतकातील जीवनमूल्यांशी अत्यंत सुसंगत आहे असे थरूर यांना ठामपणे वाटते. त्याची कारणे सांगताना ते म्हणतात, हिंदू धर्म जीवनाचा अर्थ शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो, आपला देव निवडण्याचे, पूजनपद्धतीचे स्वातंत्र्य देतो, त्यामध्ये मनावर भर आहे, त्याच्या तत्त्वज्ञानाची विपुल ग्रंथसंपदा असली तरी कशाचा स्वीकार करायचा त्याचे स्वातंत्र्यही तो देतो, खुलेपणाला महत्त्व असलेल्या आपल्या वर्तमानकाळाशी सुसंगत असा हा धर्म आहे असे थरूर साभिमान नमूद करतात.

शशी थरूर यांच्या खासगी आयुष्यासंदर्भात कितीही वाद असो, ते एक विचारवंत लेखक आहेत. थरूर यांचे ताजे पुस्तक अलेफ बुक कंपनीने नुकतेच बाजारात उतरवले आहे, ते आहे ‘द हिंदू वे.’ गेल्या बारा सप्टेंबरला त्याचे दिल्लीत तीन मूर्ती भवनात प्रकाशन झाले, तेव्हा त्यानिमित्ताने एक खूप चांगला परिसंवाद झाला होता. डॉ. करणसिंग, पवन वर्मा, बिबेक देवरॉय, राजीव मेहरोत्रा व शेषाद्री च्यारी या वेगवेगळ्या विचारधारांच्या वक्त्यांनी त्यातून फार चांगल्याप्रकारे विचार मांडले होते व एनडीटीव्हीने तो कार्यक्रम प्रक्षेपित केला होता. आता हे पुस्तक हाती आले आहे.
हिंदू धर्माची त्याच्या मूळ रूपामध्ये जगाला ओळख घडवू पाहणारे हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. थरूर यांनी या आधीही हिंदू धर्माविषयी एक पुस्तक लिहिले होते, ज्याचे नाव होते ‘व्हाय आय ऍम अ हिंदू.’ त्या पुस्तकाला प्रतिसाद जरूर मिळाला, परंतु त्यामध्ये त्यांनी मांडलेल्या राजकीय मतांशी सहमत नसलेल्या वाचकांनी त्यांना आग्रह केला की राजकारण टाळून हिंदू धर्माची ओळख घडवा. त्या सूचनेला अनुसरून थरूर यांनी हे दुसरे पुस्तक लिहिले आहे.

हिंदू धर्माच्या मूलतत्त्वांचा सहज सुंदर शैलीत परिचय घडवणारे हे सचित्र पुस्तक आहे. बिगर हिंदू, नास्तिक, विदेशी नागरिक, तरुण पिढी यांना हिंदू धर्माची ओळख घडवण्यासाठी आपण या लेखनास प्रवृत्त झाल्याचे थरूर यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे.

हिंदू धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन, सहिष्णु, समावेशक, व्यापक असा धर्म आहे. ऐंशीच्या दशकानंतर मात्र धर्माच्या नावे हिंसक हिंदुत्व लादण्यास प्रारंभ झाला. धर्मनिरपेक्ष लोक आणि हिंदुत्ववादी हे दोन्ही गट या धर्माला आपापल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करू लागले, असे थरूर म्हणतात. जगातील इतर धर्मांना त्यांनी आखून दिलेली एक चौकट आहे, परंतु हिंदू धर्म हा एकच धर्म असा आहे जो आपल्या अनुयायांवर कोणतीही बंधने लादत नाही. अगदी देवाचेही नाही. ज्याला जो वाटेल त्याचे त्याने भजन पूजन करण्यास आपला धर्म उदारपणे अनुमती देतो ही हिंदू धर्माची विशेषतः थरूर सांगतात. म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचे तर हिंदू धर्म हा जगातील सर्वांत ‘लिबरल’ धर्म आहे असे थरूर ठासून सांगतात. परम सत्याचा शोध घेण्याचे वेगवेगळे मार्ग स्वीकारण्यास हिंदू धर्माने कधीच कोणाला अटकाव केला नाही. त्यामुळे हिंदू हा आस्तिकही असू शकतो वा नास्तिकही असू शकतो. वेदप्रामाण्य मानणारा असू शकतो वा वेद नाकारणाराही असू शकतो, आत्मा आणि परमात्मा यांचे द्वैत मानणारा असू शकतो वा अद्वैतीही असू शकतो. तो धर्मातील एक वा अनेक गोष्टी नाकारू शकतो, षड्‌दर्शनांतील कोणत्याही विचारधारेचा अंगिकार तो करू शकतो, तरीही तो हिंदू असतो ही व्यापकता व उदारता हे या धर्माचे ठळक वैशिष्ट्य असल्याचे थरूर म्हणतात. स्वर्ग नाही, मोक्ष नाही, आत्मा नाही म्हणणारा चार्वाक देखील हिंदू तत्त्वज्ञानाचाच भाग असल्याचे थरूर सांगतात. हिंदू धर्मात धर्मच्छळ असू शकत नाही. एकच तत्त्वज्ञान सर्वांनी स्वीकारले पाहिजे असा आग्रह तो धरत नाही. ईश्वरी शक्तीची अमर्याद प्रतिबिंबे स्वीकारण्याची तो मुभा देतो. कोणी त्याला सगुण साकार रूपात भजते, तर कोणी त्याचे निर्गुण निराकार रूप खरे मानते. परंतु असे असूनही ते सगळे हिंदू धर्मातच बसते. हिंदू धर्म हा जगातील सर्वांत मोठा असा धर्म आहे की जो आपलेच खरे आहे असे कधीच म्हणत नाही. सर्व जीवनपद्धती तितक्याच खर्‍या आहेत अशी उदारता तो दाखवतो, इतर धर्मांचा सन्मान राखू शकतो, त्यांच्यामुळे आपल्या धर्माचा अनादर होत नाही, ही त्याची विशेषता थरूर यांनी सांगितली आहे.

आपल्या प्रतिपादनाच्या ओघात थरूर यांनी दिलेली अनेक उदाहरणे विचार करण्याजोगी आहेत. गणेशाचे वाहन उंदीर का याची संगती लावताना ते म्हणतात की हत्तीसारखा सर्वांत मोठा व उंदीर म्हणजे सर्वांत छोटा प्राणी या दोन्हींचे महत्त्व त्यातून सूचित होते. ब्रह्मा विष्णू महेश हे वेगवेगळे देव नसून एका उत्तम पुरुषाचीच ती लक्षणे आहेत असे त्यांना वाटते. हिंदू धर्म उपखंडात ज्या ज्या भागांत विस्तारला तेथील लोकसंस्कृतीतील देवांच्या प्रतिमांचा स्वीकार तो करीत गेला. पुरीचा जगन्नाथ हा आदिवासींचा देव, परंतु त्याला कृष्णावताराच्या रूपात पाहिले जाते याकडे त्यांनी उदाहरणादाखल निर्देश केला आहे.

हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाच्या परंपरेचे धावते, परंतु वेधक दर्शन थरूर यांनी या पुस्तकात घडवले आहे. महाभारतात उल्लेख असलेल्या प्राचीन सांख्य तत्त्वज्ञानापासून आदि शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानापर्यंत, प्रत्येकात मांडला गेलेला विचार, त्याची वैशिष्ट्ये यांचा उलगडा थरूर करीत जातात.
एकंदरीत, हिंदू धर्म हा खरे तर हिंदू जीवनानुभव आहे व तो काय आहे याचे दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. हिंदू धर्मातील जातिभेद, कर्मकांडे, वाईट रूढी, कुप्रथा, अंधश्रद्धा यांचा समाचार घेताना ‘अनुयायांच्या चुकीच्या वागण्याला धर्माला जबाबदार धरायचे का?’ असा रास्त सवाल ते करतात. हे कलंक पुसण्याची आवश्यकताही ते व्यक्त करतात.
स्वामी विवेकानंद, आदि शंकराचार्य, रामानुज व भक्ती चळवळ, स्वामी दयानंद सरस्वती, रमणमहर्षी, योगी अरविंद, महात्मा गांधी अशा नानाविध व्यक्तींनी हिंदू धर्माचा कसा अन्वयार्थ लावला आहे त्याचाही वेध थरूर यांनी विविध प्रकरणांतून घेतलेला आहे.

हिंदू धर्माने कधी आपले तत्त्वज्ञान जगात पसरवण्याची आकांक्षा बाळगली नाही, परंतु त्याचा विचार आणि मूल्ये मात्र वैश्विक असल्याचे प्रतिपादन थरूर करतात. आजच्या एकविसाव्या शतकाचा आणि वर्तमान परिस्थितीचा विचार करता हिंदू धर्म हाच असा धर्म आहे जो आजच्या जीवनमूल्यांशी अत्यंत सुसंगत आहे असे थरूर यांना ठामपणे वाटते. त्याची कारणे सांगताना ते म्हणतात, हिंदू धर्म जीवनाचा अर्थ शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो, आपला देव निवडण्याचे, पूजनपद्धतीचे स्वातंत्र्य देतो, त्यामध्ये मनावर भर आहे, त्याच्या तत्त्वज्ञानाची विपुल ग्रंथसंपदा असली तरी कशाचा स्वीकार करायचा त्याचे स्वातंत्र्यही तो देतो, खुलेपणाला महत्त्व असलेल्या आपल्या वर्तमानकाळाशी सुसंगत असा हा धर्म आहे असे थरूर साभिमान नमूद करतात.

एकीकडे थरूर यांचे हे पुस्तक प्रकाशित झाले असतानाच दुसरे एक पुस्तक पुनःप्रकाशित झाले आहे, ज्याचे नाव आहे ‘द हिंदू ः ऍन आल्टर्नेटीव्ह हिस्टरी’
वेंडी डॉनिजर यांचे हे पुस्तक खरे तर यापूर्वी एका वेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केले होते. त्यावर खटले भरले गेले. त्यानंतर ते मागे घेतले गेले होते. आता पुन्हा एकदा स्पीकिंग टायगर या प्रकाशनसंस्थेने ते पुनःप्रकाशित केले आहे. हिंदू धर्माचा पर्यायी इतिहास असल्याचा दावा करीत वेंडी यांचे पुस्तक आपल्या धर्मग्रंथांतून मांडल्या गेलेल्या विचारांना पर्यायी विचारधारांचा आलेख मांडते. लेखिका स्वतः एक विदेशी असल्याने जरी त्या संस्कृत व हिंदू धर्माच्या विद्वान अभ्यासक असल्या, तरीही हिंदू धर्म समजून घेण्यात त्यांना मोठी मर्यादा आली आहे जिचे प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथात लख्खपणे पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर आलेले थरूर यांचे वरील पुस्तक मात्र हिंदू धर्माचा, त्याच्या उदार, सहिष्णु स्वरूपाचा, आजच्या वर्तमानातील जीवनमूल्यांशी सुसंगततेचा जोरदार पुरस्कार आणि जयजयकार करते.