‘हिंदू चेतना संगम’ मागील उद्देश…

0
128
  • दत्ता भि. नाईक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ७ जानेवारी रोजी देशव्यापी ‘हिंदू चेतना संगम’ ह्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. हा उपक्रम नेमका कशासाठी आहे व त्याचे स्वरूप काय आहे, याविषयी लेख –

१९५७ च्या स्वातंत्र्यसमरात भारतीयांचा पराभव झाला, तरी सुद्धा देशातील सुस्तावलेला राष्ट्रवाद हळूहळू जागृत होऊ लागला. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणारे वासुदेव बळवंत फडके, तंट्या भिल्ल, उमाजी नाईक तसेच ईशान्येकडील प्रदेशातील कियांग नांगबाल यांसारख्या अनेक लढवय्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. जागोजागी क्रांतिकारकांचे जाळे पसरलेले होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसद्वारा सनदशीर मार्गाने अधिकाधिक हक्कांच्या मागणीसाठी प्रयत्न होऊ लागले. पुण्यात चाफेकर बंधूंनी, कोलकात्यामध्ये खुदिराम बोस यांनी नव्या युगाची क्रांतिकारक चळवळ सुरू केली.

कॉंग्रेसमध्ये टिळकयुग सुरू झाले आणि सशस्त्र व सनदशीर अशा दोन्ही प्रकारच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. १८८९ साली स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे जागतिक सर्वधर्म संमेलनात हिंदू धर्माचा परिचय करून देणारे भाषण केले व त्यामुळे हिंदूधर्म व भारत देश याकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोनच बदलला. त्याचप्रमाणे देशातील स्वातंत्र्यचळवळीला मोठेच बळही मिळाले. प्रथम जागतिक महायुद्ध समाप्त होण्याच्या मार्गावर असतानाच इंग्रज केव्हातरी हा देश सोडून जाणार असे देशातील जनतेला वाटू लागले. या काळात क्रांतिकारक चळवळीत तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत भाग घेतलेला एक तरुण होता, त्याचे नाव होते डॉ. केशव बळीराम हेडगेवार. ‘जितुका भोळाभाव तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञानेतरी देवाधिदेव पाविजेल कैसा|’ अशा अवस्थेत असलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे या तरुणाने ठरवले. १९२५ साली दसर्‍याच्या मुहूर्तावर नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
सुरुवातीला ब्रह्म एकटेच होते. त्याला बहुत व्हावे असे वाटले, तसेच रा. स्व. संघाच्या बाबतीत घडले. नागपूर येथे सुरू झालेले हे कार्य देशभर पसरले.

जगात सर्वांत असंघटित असल्यामुळे अंतर्गद भेदांना बळी पडलेल्या व धर्मांतरासारख्या बाह्य आक्रमणांनी वेढलेल्या हिंदू समाजाला एकसूत्रात बांधणे हे संघाचे काम. त्यामुळे रा. स्व. संघाने सुरुवातीच्या काळात ‘संघटनेसाठी संघटना’ हे धोरण स्वीकारले. समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे सोयर्‍या – धायर्‍यांची मुले, मीपण बुद्धीची सखोले| तयासी बोलणे, मृदुबोले, करीत जावे| तयाचा संसार समाचार, पुस्त जावा विस्तार| उदंड सांगता तत्पर होऊन ऐकावे| दुःख ऐकता दुःख जाते, त्याचे दुःख हळू होते| मग ते सेवेचि धरि ते, मित्र भावे॥ या वृत्तीच्या आधारावर समाजात वावरत इवलेसे हे रोप आता वाढून त्याचा वेलु गगनावर गेला आहे. इतके असले तरी बरेच काही अजूनही मिळवावयाचे आहे. म्हणून रा. स्व. संघाची सतत धडपड असते.
डॉ. हेडगेवार यांना देवाज्ञा झाल्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजी हे सरसंघचालक झाले. श्रीगुरूजी तेहत्तीस वर्षे सरसंघचालक होते. डॉ. हेडगेवार यांचा काळ हा राजकीय मंथनाचा काळ होता. तर श्रीगुरुजी यांनी सांस्कृतिक राष्ट्रावर सखोल चिंतन केले. त्यांच्यानंतर बाळासाहेब देवरस यांनी सरसंघचालकपदाचा भार सांभाळला. त्यांचा काळ हा सामाजिक समरसतेच्या मंथनाचा काळ होता. त्याच्यानंतर प्रा. राजेंद्रसिंह (रज्जूभैय्या), कुप्प सी. सुदर्शन असे सरसंघचालक झाले. सध्या सरसंघचालकपदाची धुरा डॉ. मोहन भागवत सांभाळतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा देशाच्या हाकेला ओ देत काम केले. जम्मू-काश्मीरचे भारतातील विलिनीकरण श्रीगुरूजींच्या प्रयत्नांमुळेच झाले. देशाच्या विभाजनाच्या वेळेस बर्‍याच ठिकाणांवरून हिंदूंना सुखरुप स्वतंत्र भारताच्या सीमेत आणून सोडण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले. शेवटचा हिंदू सुरक्षितपणे बाहेर पडेपर्यंत पाकिस्तानमधील गावागावांमध्ये थांबलेले संघाचे स्वयंसेवक वाटेतच टिपले गेले. ते परत येऊच शकले नाहीत.
ज्या ज्या वेळी देशावर परकीय आक्रमणे झाली, वा पूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या, त्या त्यावेळेस सेनादलाच्या पाठोपाठ सेवाकार्यात उतरण्याचा विक्रम संघाच्या स्वयंसेवकांनी केलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्ररणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, विश्‍व हिंदू परिषद, कुष्ठ निवारण संघ, वनवासी कल्याण आश्रम या संघटना व संस्था देशातच नव्हेत तर जागतिक पातळीवर अग्रगण्य आहेत. परदेशात स्थायिक झालेल्या हिंदूंना संघटित करण्याकरिता भारतीय स्वयंसेवक संघ व हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने संघाचे काम निरनिरनिराळ्या देशांत सुरू आहे.

देशभरात एक लाख पन्नास हजार भारतीय अशी सेवाकार्ये संघप्रेरणेतून चालत असतात. संघाचे काम दैनंदिन शाखा तसेच साप्ताहिक एकत्रीकरणे या रुपाने आज देशाच्या पन्नास हजार गावांपर्यंत पोचले आहे. आठवड्यातून एकदा प्रार्थनास्थळावर गेले नाही तर बहिष्काराची भीती, अंत्यसंस्काराला जागा दिली जाणार नाही, मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश मिळणार नाही यांसारखी भीती घालून धाकाच्या जोरावर काढलेल्या संघटनेसारखी रा. स्व. संघाची हिंदू संघटनेची कल्पना नाही. म्हणूनच संपर्काच्या माध्यमातून व बंधुतेच्या भावनेतून हिंदूंना संघटित करणे हे संघाचे ध्येय आहे. रा. स्व. संघाने विस्मृतीत गेलेल्या अनेक गोष्टींना स्वबळावर जनजागृतीच्या रुपाने समाजासमोर आणले. संघाचे कार्यकर्ते गोहत्याबंदीच्या मागणीसाठी सह्या गोळा करण्याकरिता देशभर फिरले. प्रतिसाद खूप चांगला मिळाला तरीही खिल्ली उडवणारे खूप होते. आज सर्वजण देशी गाईची महती गाऊ लागलेले आहेत. १ जानेवारी हे आपले नववर्ष नव्हे हे रा. स्व. संघाने समाजाला निक्षून सांगितले. परिणामस्वरुप आता गुढी पाडव्याचे कार्यक्रम सर्वत्र होऊ लागले. १९६३ साली स्वामी विवेकानंदांचे जन्मशताब्दीचे वर्ष होते. रा. स्व. संघाने कन्याकुमारी येथील श्रीपाद शिलेवर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारण्याचे ठरवले. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह एकनाथजी रानडे यांना जबाबदारीतून मुक्त केले गेले. त्यांनी हे कार्य स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या व परिश्रमाच्या बळावर पूर्णत्वास नेले. त्यांनी लोकांकडून एक एक रुपया गोळा केला. हल्लीच्या काळातील रामजन्मभूमी आंदोलन हे एक लक्षात भरण्यासारखे उदाहरण आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक सदस्य हा स्वयंसेवक म्हणून ओळखला जातो. तो स्वतःहून जाणीवपूर्वक संघाचा स्वयंसेवक झालेला असतो. देशाचे संरक्षण व संस्कृतीचे संवर्धन करण्याची प्रत्येक स्वयंसेवक प्रतिज्ञा घेतो व ती आजन्म पाळणार असल्याचे वचन देतो.

संघटित हिंदू समाज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्ष्य आहे. १९२५ साली स्थापन झालेल्या या संघटनेस यंदाच्या मावळत्या वर्षी ९२ वर्षे पूर्ण झाली. प्रभाव वाढलेला असला तरी तो अपुराच आहे. देशातील सज्जनशक्ती असंघटित असल्यामुळे आपला प्रभाव पाडू शकत नाही. या सज्जनशक्तीला एकत्र आणण्यासाठी व तिचा प्रभाव उत्पन्न करण्यासाठी ७ जानेवारी रोजी आयोजित ‘हिंदू चेतना संगम’चे घोषवाक्य आहे ‘सज्जनशक्ती सर्वत्र.’ या हिंदू चेतना संगमाच्या कार्याची दिशाही ठरलेली आहे. यापुढे प्रत्येक मंडल व वस्तीवर जाणे हा कार्यक्रम असेल.

मी हिंदू आहे या भावनेने भारलेला व हिंदू समाजाच्या सुखदुःखात आपुलकीने वावरणारा हिंदू घडवणे यासाठी संघ प्रयत्नशील आहे. यासाठी संघाची ध्येयधोरणे व कार्यपद्धती ज्यांना माहित नाही त्यांनी ती समजून घ्यावी यासाठी प्रयत्न चालू राहतील. सर्व हिंदू हे एका भारतमातेचे पुत्र आहेत. सर्वजण सहोदर आहेत ही भावना रुजवण्यासाठी प्रयत्नशील स्वयंसेवकांनी हिंदू चेतना संगमाच्या निमित्ताने समाजापुढे जावयाचे ठरवलेले आहे. ठाण्यापासून गोव्यापर्यंत रा. स्व. संघाचा कोकण प्रांत आहेत. सरकारी तालुक्यांच्या व्यतिरिक्त काही विशेष तालुक्यांची रचना संघाने केलेली या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी हिंदू चेतना संगमाचे आयोजन ७ जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने सज्जन शक्तीला सुसंघटित होऊन कार्यरत राहण्याचे आवाहन केले जाईल.