हिंदी विरोधाचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे!

0
147
  •  दत्ता भि. नाईक

हिंदी ही किती प्राचीन व किती समृद्ध भाषा आहे यावर चर्चा न करता ती देशातील सर्वजनतेला जोडणारी भाषा आहे हे सर्वांनीच जाणले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाचे निमित्त करून हिंदीविरोधाचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे.

भारत सरकारचा शिक्षणविषयक दस्तावेज अलीकडेच प्रसिद्ध झाला. तो पूर्णपणे वाचून काढणे वा त्यावर चिंतन करणे यासाठी अजून पुरेसा वेळही मिळालेला नाही. यापूर्वी स्व. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना एक शिक्षणविषयक दस्तावेज ‘न्यू एज्युकेशन पॉलिसी’ या नावाखाली प्रसिद्ध झाला होता. व्यावसायिक शिक्षणाला बारावीपर्यंत मान्यता देणे याव्यतिरिक्त या पॉलिसीचा फारसा परिणाम जाणवला नाही. २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आले तेव्हाच नवीन शिक्षणधोरणाची चर्चा सुरू झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत मोदींच्या हाती सत्ता आली नसती तर कदाचित हा दस्तावेज शीतपेटीत पडून राहिला असता. परंतु जनतेने पुनः कौल दिल्यामुळे आता सविस्तर चर्चा होणे क्रमप्राप्त आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवणे, दहावीऐवजी बारावीलाच महत्त्व देणे यांसारख्या विषयांची यात चर्चा आहे. त्यात केलेल्या सर्व सूचना व्यवहार्य असतील असेही सांगता येत नाही; परंतु हिंदी भाषेचा विषय उकरून काढून पुन्हा एकदा अडगळीस पडलेल्या उत्तर विरुद्ध दक्षिण वादाला चालना देण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जाऊ लागलेला आहे.

इंग्रजीचे स्तोम
आपला देश बहुभाषिक आहे. दोन राज्यांतील सीमाभागात राहणार्‍या अशिक्षितांनाही सहजपणे दोन ते तीन भाषा बोलताना आपण पाहतो. सर्व भाषा एका संस्कृतीच्या धाग्याने गुंफलेल्या आहेत व विविधतेमुळे सर्व भाषांचे सौंदर्य खुलून येत असते. आपल्या घटनेतील आठव्या परिशिष्टात अंतर्भाव झालेल्या एकूण बावीस भाषा आहेत. याशिवाय अनेक भाषा लोकांकडून बोलल्या जातात. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाला जोडणारी एक भाषा पाहिजे असे सर्वांनाच वाटते. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात महात्मा गांधीनी खादी, स्वदेशीबरोबरच हिंदी भाषेच्या प्रचारकार्यास प्राधान्य दिले. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा, दक्षिण भारत हिंदी प्रचार समिती यांसारख्या संस्थांनी हिंदी भाषेच्या प्रचाराच्या कामी खूप मोठे योगदान दिलेले आहे. गांधीजींच्या आग्रहावरून कित्येक तरुण तुटपुंज्या वेतनावर हिंदीच्या प्रचारासाठी देशाच्या निरनिराळ्या भागांत गेले होते. सर्वात जास्त हिंदीचा प्रचार तामिळनाडूत म्हणजे त्यावेळच्या मद्रास प्रांतात करण्यात आला होता. चक्रवर्ती राजगोपालाचारी हे राजाजी या नावाने ओळखले जायचे. सुरुवातीला ते हिंदीचे समर्थक होते, परंतु नंतर केवळ कॉंग्रेसला विरोध करावा या कारणास्तव हिंदीचे विरोधक बनले.

भारतीय राज्यघटनेच्या भाग सतरामध्ये कलम ३४३ (१) च्यानुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असेल असे नमूद केलेले असून अंक मात्र आंतरराष्ट्रीय पद्धतीचे भारतीय अंक असतील असेही नोंदवलेले आहे. याच कलमाच्या पोटकलम दोनमध्ये इंग्रजी भाषा ही घटना अस्तित्वात आल्याच्या दिवसापासून पंधरा वर्षे सरकारी कामकाजाकरिता वापरली जाईल असा उल्लेख आहे. एकूण सर्व गोंधळ या पोटकलम दोनमुळे झालेला आहे. इंग्रजी आपल्या देशाच्या व्यवहारातून ताबडतोब जाईल असे कुणीही अपेक्षित धरले नव्हते. तरीही ज्यावेळी केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे तंतोतंत ऐकून घेण्याच्या मनस्थितीत देशातील जनता होती तेव्हा आजपासून हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असेल असे घटनेत लिहिले असते तर कोणीही आक्षेप घेतला नसता. परंतु नेतृत्वाचाच आत्मविश्‍वास कमी पडल्यामुळे घटनेतच इंग्रजीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्यासारखे झाले. जेव्हा ही पंधरा वर्षे संपली तेव्हा स्व. लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते. पं. नेहरूंसमोर मान समोर करून बोलण्याची ज्यांना हिंमत नव्हती ते सर्वजण शास्त्रीजींचे पाणी जोखण्यासाठी सरसावले व देशात अंतर्गत कलह माजवण्यासाठी वावरणार्‍या शक्तींना हिंदीविरोधी पेटवले. देश जणू अराजकाच्या उंबरठ्यावर आणून सोडला.

इंग्रजांचा कुटिल डाव व द्रविड चळवळ
इंग्रजांनी राज्यव्यवस्था हाती घेताच देशाचा इतिहास त्यांना हवा तसा लिहिला. त्यांनी भारतावर केलेल्या कब्जाला पुष्टी देण्याकरिता या देशावर सतत बाहेरून आलेल्या लोकांनी राज्य केलेले आहे असे शिक्षणेच्छूंच्या मनावर बिंबवले. आर्य नावाचा वंश नसूनही त्यांनी आर्य या संज्ञेला वंशाचे स्वरूप दिले व उत्तर व दक्षिण असा संघर्ष पेटवण्यासाठी आर्य- द्रविड या नसलेल्या संघर्षाच्या कपोलकल्पित कथेला जन्म दिला. आपल्या देशामध्ये पंचगौड व पंच द्रविड असे दोन प्रकार ब्राह्मणांमध्ये आढळतात. सामान्य जनतेला याच्याशी काडीचेही देणेघेणे नाही. तरीही दक्षिणेची संस्कृती ही द्रविड संस्कृती असून ती आर्यांपासून वेगळी आहे असा प्रचार तर केलाच, परंतु या कल्पनेवर आधारित पुस्तकांच्या माध्यमातून मुंबई, कलकत्ता व मद्रास विद्यापीठांतून या संकल्पना शिकवल्या जाऊ लागल्या. नंतर पुढे निघालेल्या सर्व विद्यापीठांतून याच रोगीची लागण झालेली दिसून येते.

रामस्वामी नायकर नावाच्या एका व्यक्तीने ‘द्रविड कळघम’ नावाची चळवळ सुरू केली. त्यांनी तामीळ जनता ही हिंदू नसून द्रविड आहे असा प्रचार केला. आमचा देव राम नसून रावण आहे असे त्याचे म्हणणे होते. उत्तरेतून येणार्‍या प्रत्येक गोष्टीला विरोध हा त्याचा कार्यक्रम होता. त्यातूनच ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ हा राजकीय पक्ष निघाला. आमचे राष्ट्रगीत जनगणमन नसून इंत्रुमुझंगू आहे असे द्रमुकचे म्हणणे होते. द्रविडनाडचा वेगळा झेंडाही बनवला होता. हळूहळू द्रमुक राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून घेऊ लागला. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये द्रमुक हा एक दमदार व विश्‍वासू सहकारी पक्ष होता. राजकीय कारणामुळे रामस्वामी नायकर यांचे चित्र असलेले टपाल तिकिटही जारी केले गेले.

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष कामराज यांचा तामीळनाडूतील तिरुनेलवेली मतदारसंघातून पराभव झाला व विधानसभेत द्रमुक पक्षाला बहुमत प्राप्त होऊन अण्णादुराई हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या कार्यकाळात राज्यात हिंदी विषय शिकवण्याची सक्ती रद्द करण्यात आली. इतकेच नव्हे तर एन.सी.सी.च्या आज्ञासुद्धा हिंदीतून दिल्या जाणार नाहीत असा ठराव करण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात हिंदीतील फलकांवर डांबर फासणे यासारखे उपद्व्याप सुरू ठेवले. एका ठिकाणी तर सत्यमेव जयते हे भारत सरकारचे ब्रीदवाक्यही पुसून टाकण्यात आले. हळूहळू हिंदीविरोधाचे लोण अन्य दक्षिणी राज्यांतही पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते.

तमीळ कालमापन स्वीकारले असते तर!
सर्व राज्यांना भाषांचे त्रिसूत्री तत्त्व लागू केले तर हिंदी भाषिक राज्यांना ते द्विभाषा सूत्रच ठरेल म्हणून आम्हाला द्विभाषा सूत्रच पाहिजे हा द्रमुकचा आग्रह होता. याच काळात एक अव्यवहार्य अशी कल्पना जन्माला आली. ती म्हणजे, हिंदी भाषिक लोक दक्षिणेची एकतरी भाषा शिकतील. परंतु या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरिता कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. हिंदी भाषिक व्यक्तीला दक्षिणेची भाषा येत असल्यास सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती देणे यासारखे व्यवहार्य कार्यक्रम राबवता आले असते, परंतु समस्येवर उपाय काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाला एक सौर कालमापन पद्धती पाहिजे याची निकड भासू लागली. सरकारने पंचांगकर्त्यांऐवजी वैज्ञानिकांची समिती यासाठी नेमली. वैज्ञानिकांनी तयार केलेली भारतीय सौर कालगणना कुणालाच आपलीशी वाटत नाही. याउलट तमीळ कालगणना राष्ट्रीय कालगणना म्हणून मान्य केली गेली असती तर बरेच प्रश्‍न सुटले असते. तमीळ पंचांग हे सौरपंचांग असून सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या पंचांगातील चित्रा म्हणजे चैत्र महिना सुरू होतो. उत्तरेची भाषा दक्षिणेची कालमापन पद्धती असे सूत्र अंगीकारले असते तर भाषेवरून काहूर माजवणार्‍यांची तोंडे बंद झाली असती.

भारत देशात प्रादेशिकतेची भावना पेटवत ठेवून अशांतता माजवण्यासाठी तत्पत असलेल्या अनेक शक्ती आहेत. युरोपमध्ये ‘एक भाषा एक देश’ असे सूत्र आहे, त्यामुळे तुमच्या अनेक भाषा आहेत म्हणून तुमचा देश म्हणजे अनेक देशांचा समूह आहे. आम्ही सारखे दिसतो, तुम्ही तर काळे, गोरे, पिवळे म्हणजे धड एक वंश नाही. आम्ही एकाच ठिकाणी प्रार्थनला जमतो, तुमचे तर हजारो पंथोपपंथ आहेत. आमचा एकमेव परमेश्‍वर आहे, तर तुमचे तेहतीस कोटी. आमचा एक ग्रंथ तर तुमचा ना एक ग्रंथ आहे.

यासारखे आरोप आपल्या समाजावर केले जातात व हीच मंडळी स्वतःला वंश, भाषा, धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात. जेव्हा ही तुलना केली जाते तेव्हाच आपला वारसा किती समृद्ध आहे हे लक्षात येते. फुले विविध प्रकारची असली तरी त्यांना गुंफणारा धागा एक आहे व तो धागा संस्कृतीचा आहे. आता पूर्वीसारखा हिंदी विरोध राहिलेला नाही. दक्षिणच काय, जिथे जनतेचे अती पाश्‍चात्तीकरण केले गेले त्या नागालँड व मिझोरामध्ये आज हिंदी विषय शिकण्यासाठी समाज उत्सुक आहे. देशभरातील वनवासी कल्याण आश्रम व विद्या भारतीच्या शाळा-महाविद्यालयांतून हिंदी शिकलेले नागा व मिझो तरुण-तरुणी आता त्यांच्या राज्यात जाऊन त्यांच्याच विद्यार्थ्यांना हिंदी शिकवत आहेत. आतापर्यंत गंगा व ब्रह्मपुत्रेतूनच नव्हे तर कावेरीतूनही बरेच पाणी वाहून गेलेले आहे तरीही हिंदी भाषेच्या विषयावर पुन्हा एकदा देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणून सावध राहिले पाहिजे. हिंदी ही किती प्राचीन व किती समृद्ध भाषा आहे यावर चर्चा न करता ती देशातील सर्वजनतेला जोडणारी भाषा आहे हे सर्वांनीच जाणले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाचे निमित्त करून हिंदीविरोधाचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे.