…हा हन्त हन्त!

0
251

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा श्रीमान विजय सरदेसाई यांना आपण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा आता पश्चात्ताप होऊ लागल्याचे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरून दिसते. फातोर्ड्यात आपल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना नुकतीच त्यांनी ही आपल्या मनात दडलेली खंत व्यक्त केली. ‘पर्रीकर सरकारला पाठिंबा देण्यात आमची चूक झाली का?’, ‘पर्रीकरांच्या मृत्यूनंतर नव्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यातही आमची चूक झाली का?’ असे आत्मचिंतनपर प्रश्न त्यांनी सखेद उपस्थित केलेले दिसतात. या प्रश्नांची उत्तरे गोव्यात नव्हे, तर दिल्लीत दडलेली आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते मोकळे झाले की कदाचित ते याची उत्तरे देऊ शकतील असे विजय यांचे म्हणणे आहे. सरदेसाई यांचे हे एकूण पश्‍चात्तापदग्ध वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला एका प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताचे स्मरण झाले. ‘‘रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् | भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्री ॥ इति विचारयति कोषगते द्विरेफे | हा हंत हंत नलिनी गज उज्जहार ॥ उद्या उजाडेल तेव्हा कमळ आपल्या पाकळ्या उघडेल आणि मग आपण त्यातला रस आकंठ प्राशन करू या आशेने एक आशाळभूत भुंगा कमळामध्येच जाऊन बसला. पण दुसरा दिवस उजाडण्याच्या आधीच एक हत्ती आला आणि त्याने ते कमळच खुडून टाकले! सरदेसाई यांचे असेच झाले. सत्तेचे मनमुराद आकंठ रसपान करायची त्यांची स्वप्ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या एका तडाख्यात भंगून गेली. परिणामी तेलही गेले, तूपही गेले अशी गोवा फॉरवर्डची स्थिती झाली, कारण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आकाशपाताळ एक करून निवडणूक लढले होते. निकालांमध्ये अत्यंत अनपेक्षित घवघवीत यश मिळताच आपल्याच पक्ष पदाधिकार्‍यांनाही न जुमानता स्वतःच फार मोठा वैचारिक ‘यू टर्न’ घेत रातोरात भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत सामीलही झाले. त्यासाठी मतदारांचा तीव्र रोषही पत्करला. परंतु सत्ता उपभोगत असताना अधूनमधून भाजपलाच बेटकुळ्या दाखवण्याचा चाललेला प्रयत्न नूतन मुख्यमंत्र्यांना जाचक ठरू लागताच त्यांनी एका फटक्यात सर्जिकल स्ट्राइक करून मंत्रिपदांसह सरकारमधून समूळ गच्छंती केली! त्यामुळे ना कमळाची सोबत, ना कमळविरोधी मतदारांची अशा पेचात गोवा फॉरवर्ड सापडला. या परिस्थितीतून पुढचा मार्ग कसा काढायचा या चिंतेत हा पक्ष सध्या आहे. त्यामुळे सरदेसाई यांना झालेली उपरती आणि त्यांच्या मुखी एकाएकी प्रकटलेले तत्त्वज्ञान ही याच चिंतेची परिणती आहे. भाजपाने सत्तेतून हाकलल्याबद्दल गळा काढून तरी मतदारांची सहानुभूती मिळते का हे पाहण्याची ही केविलवाणी धडपड आहे. आपला वैचारिक विरोधक असलेल्या भाजपासोबत सत्ता उपभोगत असताना ज्यांनी आपल्या पदरात मतदान केले तो आपला मतदार दुखावलेला आणि दुरावलेला आहे हे पदोपदी प्रत्ययास येऊ लागल्याने पक्षाने गोंय, गोंयकार, गोंयकारपणच्या नावाखाली जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याची, कोकणी राजभाषेची आणि जनमत कौलाची भुते उकरून भाजपालाच धोबीपछाड देण्याचा पुरेपूर प्रयत्न करून पाहिला. पर्रीकरांची स्वतःच्या सरकारवरील मांड पक्की होती, त्यामुळे त्यांना या प्रकाराची तमा नव्हती, त्यामुळे त्यांनी सांभाळून घेतले. ‘गोवा फॉरवर्ड स्वतःच्या मतपेढीला सांभाळण्यासाठीच हे करतो आहे, त्यांना ते करू द्यात’ असे पर्रीकर तेव्हा सांगायचे. पर्रीकरांच्या अखेरच्या काळात सरदेसाई यांनी अपक्षांना सोबत घेऊन आपला ‘व्ही – ६’ गट बनवला होता. पर्रीकरांची विचारपूस करायला जातानाही ते आपला हा लवाजमा सोबत घेऊनच गेले होते. या आपल्या गटाच्या बळावर पर्रीकरांनंतर सत्तेवर आलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजकीय अननुभवाचा फायदा उठवता येईल या भ्रमात असलेल्या गोवा फॉरवर्डला सावंतांच्या पाठीशी त्यांच्या पक्षाचे नेतृत्व उभे आहे याचे भान राहिले नाही. त्यामुळे सावंतांसोबत राजकीय कुस्ती खेळण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा भाजपाने अचूक मोका साधत असा काही फटका दिला की, एका दिवसात गोवा फॉरवर्डसाठी होत्याचे नव्हते होऊन गेले. आपल्या पारंपरिक मतदारांकडे जायचे तर मागचे दोर कापलेले आणि पुढे जायचा रस्ता भाजपाने रोखलेला या परिस्थितीत सापडलेल्या गोवा फॉरवर्डला म्हणूनच ही उपरती होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. कॉंग्रेस अस्तित्वहीन होत चालल्याने केंद्रातील भाजपश्रेष्ठी आपण दिलेल्या पाठिंब्याची नोंद घेऊन दयाभावनेने काही पदरात पाडतील काय याचीही ही चाचपणी असू शकते. ते जमत नसेल तर पुढील विधानसभा निवडणूक जवळ येईस्तोवर त्यांना आपला नवा मार्ग शोधायचा आहे. आपल्या पारंपरिक मतदारांची सहानुभूती मिळवायची आहे. या नव्या मार्गावरून जायचे असेल तर अर्थातच जुनी ओझी फेकून देणे क्रमप्राप्त आहे. आता मागेही जाऊ न शकणार्‍या आणि पुढचा मार्ग खुंटलेल्या गोवा फॉरवर्डची ही तगमगच सरदेसाईंच्या वक्तव्यांतून व्यक्त झालेली आहे!