हा तर पराभव

0
90

अत्याधुनिक कलाश्‍निकोव्हच्या सुसाटत आलेल्या गोळ्यांपुढे अखेर ‘शार्ली एब्दो’ च्या व्यंगचित्रकारांचे बोचरे कुंचले निष्प्रभ ठरले. त्या फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिकाचा संपादक स्टीफन चार्बोनियर आणि जीन काबू, जॉर्ज वोलिन्स्की आणि टिग्नौस ऊर्फ बर्नार्ड वेल्हॅक या तीन आघाडीच्या व्यंगचित्रकारांसह बारा जणांचा या हल्ल्यात बळी गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा आजवरचा जगातला एक सर्वांत भीषण घाला आहे. ‘शार्ली एब्दो’ हे साप्ताहिक सातत्याने प्रेषित महंमदाची खिल्ली उडवणारी आणि अश्लीलतेच्या सीमारेषेवरील व्यंगचित्रे प्रसिद्ध करीत आले होते हे जरी खरेे असले, तरी या बोचर्‍या टीकेचा सूड व्यंगचित्रकारांचा जीव घेऊन उगवण्याचे हे कृत्य अमानुष आणि निव्वळ रानटीपणाचे आहे. अर्थात, जिहादी दहशतवाद्यांच्या रक्तातच हा रानटीपणा भिनलेला आहे. त्यामुळेच ते पेशावरच्या निष्पाप छोट्या मुलांवर गोळ्या चालवू शकतात, एखाद्या निरपराध व्यक्तीचा गळा चिरू शकतात आणि आपण ठार मारलेल्याच्या मृतदेहांवरही थयथया नाचू शकतात. इस्लामच्या शिकवणीचा एवढा विपर्यास दुसर्‍या कोणी केला नसेल, जेवढे हे माथेफिरू जिहादी करीत आहेत. ‘शार्ली एब्दो’ मधून केवळ प्रेषित महंमदावरील व्यंगचित्रे प्रकाशित होत होती असे नव्हे. अगदी पोपपासून येशू ख्रिस्तापर्यंतचे विषय या कडव्या साम्यवादी विचारसरणीच्या व्यंगचित्रकारांनी हाताळले होते. त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी मुळात या नियतकालिकाची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. ‘शार्ली एब्दो’च्या आधी ‘एब्दो हाराकिरी’ नावाचे एक व्यंगचित्र साप्ताहिक निघत असे. फ्रेंच भाषेत ‘एब्दो’ म्हणजे साप्ताहिक. या ‘एब्दो हाराकिरी’ मध्ये तत्कालीन जनरल चार्ल्स डी गॉलवरच व्यंगचित्रातून प्रहार केले जात असत. गॉलचा मृत्यू झाला त्याच दिवशी एका डिस्कोथेकमध्ये १०० लोक मृत्यू पावले होते. त्याचा संदर्भ घेऊन गॉलच्या मृत्यूची बातमी या साप्ताहिकाने ‘कोलंबेत (गॉलचे घर) दुर्दैवी नृत्य ः १ ठार’ अशी उपरोधिक रूपात प्रसिद्ध केली होती. सरकारने त्या नियतकालिकावर त्यामुळे बंदी घातली, त्यानंतर ‘शार्ली एब्दो’ चा जन्म झाला. कडव्या साम्यवादी विचारसरणीच्या या नियतकालिकाने धर्म हा विषय आपले लक्ष्य बनवला. इस्लामी कट्टरवादावर त्यांचे कुंचले कडाडणे स्वाभाविक होते. जिलँडस् पोस्टन या डॅनिश नियतकालिकातील प्रेषित महंमदाच्या व्यंगचित्रावरून जेव्हा गदारोळ माजला तेव्हा ते व्यंगचित्र ‘शार्ली एब्दो’ ने आवर्जून पुनर्मुद्रित केले. त्यानंतर प्रेषित महंमदावर अनेक व्यंगचित्रे ‘शार्ली एब्दो’त प्रसिद्ध झाली. एके वर्षी आपल्या विशेषांकाचा संपादक प्रेषित महंमद आहे असे कल्पून मुखपृष्ठावर ‘‘हसला नाहीत तर शंभर फटके देईन’’ असे सांगणार्‍या प्रेषिताचे व्यंगचित्र त्यांनी छापले, तेव्हा या साप्ताहिकावर बॉम्बहल्ला झाला. त्यांचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले. संपादकाला जिवानिशी मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, खटले भरले गेले, पण एवढे होऊनही ही बोचरी टीका सुरूच राहिली. दोन वर्षांपूर्वी नग्नावस्थेतील प्रेषिताच्या पार्श्वभागातून तारा प्रकटत असल्याचे बिभत्सतेच्या सीमारेषेवरील व्यंगचित्र या साप्ताहिकाने प्रकाशित केले. इनटचेबल्स या फ्रेंच चित्रपटाचा संदर्भ घेऊन इनटचेबल्स २ या व्यंगचित्रातही प्रेषिताला पांगळे दाखवण्यात आले. सगळे संभाव्य परिणाम जाणूनही हे करण्याचे धाडस ‘शार्ली एब्दो’ ने दाखवले. ‘‘प्रत्येक अंकातल्या प्रत्येक व्यंगचित्राच्या परिणामांची चिंता केली असती, तर एव्हाना साप्ताहिक बंद करावे लागले असते’’ असे संपादक स्टीफन चार्बोनियर उद्गारला होता. प्रेषित महंमदावरील शार्ली एब्दोची ही सारी व्यंगचित्रे आपल्या भारतीय मानसिकतेमुळे आपल्याला अश्लीलतेकडे झुकणारी वा अभिरूचीहीन वाटत असली, तरी जागतिक व्यंगचित्रकलेतील फ्रेंच व्यंगचित्र परंपरेचे स्थान आणि राजकीय व्यंगचित्रांची तेथील परंपरा लक्षात घेतली, तर अशी बोचरी टीका तेथे वावगी मानली जात नाही. १८३० साली राजा लुई फिलीपचे व्यंगचित्र काढल्याने एका व्यंगचित्रकाराला तुरुंगवासही भोगावा लागला होता. मुक्त विचारांचे पॅरीस हे तर जागतिक केंद्र मानले जाते. जगातील प्रत्येक नव्या फॅशनचा जन्म तेथे होतो. अशा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जागतिक राजधानीमध्ये व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यांना रोखण्यासाठी बंदुका हाती घ्याव्या लागल्या हा खरे तर जिहादी हल्लेखोरांचा पराभवच मानावा लागेल.