हार्दिक पंड्याला विश्रांतीङ्ग

0
107

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातून अष्टपैलू हार्दिक पंड्या याचे नाव मागे घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी यासंबंधीची घोषणा केली. हार्दिकवरील वाढता ताण कमी करण्याचे कारण बीसीसीआयने विश्रांतीसाठी पुढे केलेले असले तरी न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यातील शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू टाकताना हार्दिकच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याचे नाव मागे घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

जून महिन्यापासून २४ वर्षीय पंड्या भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्याने खेळला असून आगामी दक्षिण आफ्रिका दौरा नजरेसमोर ठेवून त्याला विश्रांती देण्याचे ठरले असते तर त्याची पहिल्या दोन कसोटींसाठी संघात निवडच करण्यात आली नसती. पंड्याच्या जागी बदली खेळाडूचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकातामधील ईडन गार्डनवर खेळविला जाणार असून दुसरा सामना नागपूरमध्ये होणार आहे. दिल्लीमधील तिसर्‍या व अखेरच्या कसोटीसाठीदेखील हार्दिकला बाहेरच बसावे लागणार आहे.
भारतीय संघ (सुधारित) ः विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार व ईशांत शर्मा.