हात कशासाठी?

0
915
  • अनुराधा गानू

ते हात किती नशीबवान जे देवापुढे जोडले जातात, ज्यांनी सुंदर फुलं वेचली जातात, त्यांची माळ गुंफली जाते आणि ती देवाच्या गळ्यात घातली जाते. ईश्वराचे गुणगान करण्यासाठी टाळ, मृदंग, वीणा पेटी वाजण्यासाठी हे हात तासन् तास रमतात.

खरं म्हणजे आपले पूर्वज माकड. ते चार पायांवर चालायचे. हळूहळू माकडाचा माणूस होता होता माणसाने दोन पायांवर चालायला सुरुवात केली. आपण दुसरे पाय, हात म्हणून वापरायला सुरुवात केली आणि मग त्याला हाताचे अनेक उपयोग सापडले. पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे मात्र ज्याचे त्याने ठरवायचे.

माझ्या मते ज्याने आपल्याला हे हात दिलेत त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्या पुढे नतमस्तक होऊन, त्याच्या पुढे हात जोडणे हा हातांचा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उपयोग मानला पाहिजे. आपल्याला हात नसते तर आपण निष्क्रियच झालो असतो. हाताने आपण जेवतो खातो. काही जण जेवणाखाण्यासाठी चमच्यांचा उपयोग करतात, पण चमचा धरायला तरी हाताचाच उपयोग करावा लागतो ना. ते हात किती नशीबवान जे देवापुढे जोडले जातात, ज्यांनी सुंदर फुलं वेचली जातात, त्यांची माळ गुंफली जाते आणि ती देवाच्या गळ्यात घातली जाते. ईश्वराचे गुणगान करण्यासाठी टाळ, मृदंग, वीणा पेटी वाजण्यासाठी हे हात तासन् तास रमून जातात तेव्हा हात थकत नाही, दमत नाहीत, दुखत नाहीत. जीव जगवण्यासाठी माणसाला अन्न लागतं. ते अन्न धान्य पिकवण्यासाठी नांगर धरणारे बळीराजाचे हात किती सुंदर, किती नशीबवान. एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी जे हात एखाद्याच्या डोक्यावर किंवा पाठीवर ठेवले जातात, त्या हाताचं किती अप्रूप वाटतं. एखाद्याला शाबासकी देण्यासाठी ज्या हातांनी पाठीवर थाप दिली जाते तेव्हा माणसाला किती आनंद होतो. दुसर्‍याच्या या आनंदात सहभागी होणारे हे हात किती आनंदी असतील नाही?
आपल्या प्रेमाच्या वयस्कर माणसाचा थरथरणारा हात जेव्हा आपल्या पाठीवरून फिरतो तेव्हा त्या हातातून मिळणारे प्रेम, वात्सल्य आपल्याला खूप काही सांगून जातात. हातांनी आपण कितीतरी लोकांना मदत करू शकतो. दीन दुबळ्यांचे, रंजल्या गांजल्यांचे अश्रू पुसणारे हात धन्य होत. आपल्या बाळाला जोजविताना थोपटणारे हात, त्याच्या डोक्यावर मायेने फिरणारे हात बाळाला किती सुखावून जातात. त्याला ऊब देऊन जातात. बाळाला चिऊ काऊंचा घास हाताने भरवताना आई प्रत्येक घासातून बाळाला आपलं प्रेमच भरवत असते जणू. बाळाला हातानं भरवण्यात जो आपलेपणा आहे तो चमच्याने भरवण्यात नाही. हातामध्ये प्रेम आहे, ओलावा आहे तो त्या निर्जीव चमच्यात कुठून येणार? तुम्हाला माहित्येय का आपण ज्याला व्यासांचे महाभारत म्हणतो ते व्यासांनी फक्त सांगितलंय पण लिहिलंय मात्र गणपतीच्या हातांनीच. लग्न सोहळ्यात एकमेकांच्या गळ्यात माळ घालणारे हात किती हृद्य असतात. हातात हात धरून सात फेरे घालताना हे हात जणू जन्मोजन्मी, सात जन्मी एकमेकांच्या साथीनं राहण्याचं वचनच देत असतात. एखाद्याचा प्राण वाचविण्यासाठी धडपडणारे डॉक्टरांचे हात जणू त्या माणसाला सांगत असतात घाबरू नकोस. हे हात किती विश्‍वासू असतात. सदैव सतर्क राहून देशरक्षणासाठी लढणारे जवानांचे हात किती आश्‍वासक असतात. त्यांच्या हातात संपूर्ण देशाची, देशातील जनतेची सुरक्षा असते. तुम्ही निश्‍चिंत रहा. शत्रूशी सामना आम्ही करू पण तुमच्या सुरक्षेला धोका पोहोचू देणार नाही असं आश्‍वासन, असं वचनच जणू ते हात आपल्याला देत असतात. कवीचे कविता लिहिणारे हात आपल्याला स्वप्नांच्या जगात कुठपर्यंत नेऊन पोचवतात, त्या हातांचे वर्णन तरी काय करावे. इतकं सगळं सौंदर्य आपल्या हातात भरलेले असताना काही हात मात्र इतके कुरूप का असतात हेच कळत नाही.

कारण हेच हात जेव्हा दुसर्‍याला मारायला वर उठतात, कधी आपल्या बायकोवर, मुलांवर उठतात. का? पैशासाठी हेच नातवाचे हात आजीचा खून करू शकतात. या घटना पेपरमध्ये वाचायला मिळतात. वडिलोपार्जित संपत्तीसाठी एका भावाचे हात दुसर्‍या भावाचे रक्त सांडू शकतात हे ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो. गळा दाबून एखाद्याला मारून टाकण्यासाठी सरसावलेले हात आणि तोच जीव वाचविण्यासाठी सरसावलेले एखाद्या डॉक्टरचे हात यांची तुलना तरी कशी करावी! स्वतःच्या जिवंत आईला सरणावर चढवणारे एखाद्या उच्च माणसाचे हात किती नीच असतात पण त्याच सरणावरून तिला उचलून आपल्याजवळ सांभाळणारे स्मशानातल्या एखाद्या माणसाचे हात किती उच्च आहेत कल्पना करा. या अपवित्र आणि पवित्र हातांची तुलना न केलेलीच चांगली. एखादा उच्च विभूषित माणूस स्वतःच्या आईला अनाथाश्रमात टाकताना आपली आई अनाथ आहे असं लिहून देण्यासाठी सरसावलेले हात किती दुर्दैवी असतील. एखाद्याचे आपल्या बाळाला अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडून येणारे हात किती अपवित्र असतील. कल्पनाही करवत नाही.

शेवटी काय, हात पवित्र असू देत, अपवित्र असू देत, सुंदर अथवा कुरूप असू देत. हे हातच माणसाचं भविष्य घडवत असतात. हातांवरच्या रेषांनीच माणसाचं भविष्य लिहिलेलं असतं, खरंय ना?