हव्यास नको .. मज व्यास हवा .. ध्यास हवा .. अभ्यास हवा!

0
197
  •  प्रा. रमेश सप्रे (मडगाव)

येत्या व्यासपूजनाच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेला संकल्प करु या की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत व्यासांच्या एका तरी ग्रंथाचा अभ्यास करीन अन् या गोष्टीचा ध्यास घेईन. मग पहा जीवनात क्रांतीचा क्षण येतो किनई! कोणत्याही वयाचे वा अवस्थेत असलो तरी आपल्याला हा हवाहवासा वाटणारा अनुभव येईलच. तो घेतला मात्र पाहिजे.

व्यासांना नुसता नमस्कार करणं, फुलं वाहणं, पूजन करणं अगदी सोपं आहे. पण त्यांच्यापासून कोणती प्रेरणा घ्यायची – कोणती वृत्ती जोपासायची हे पाहायला हवं.

विचारांची विकसत जाण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यास. ‘विव्यास वेदान्’ असं म्हणतात ते याच अर्थानं. वेद म्हणजे मूर्तिमंत प्रकटलेलं ज्ञान आहे, त्याचा विस्तार नि व्यवस्था व्यासांनी केली. हे ज्ञानाच्या दृष्टीनं मानवजातीवरचे उपकार आहेत.

प्रवचनकारांच्या या वाक्यानं पछाडूनच टाकलं. वाक्य तसं खूपच साधं. ‘जिच्यावर आत्ता मी बसलोय ती सामान्य खुर्ची नाही, ते व्यासपीठ आहे व्यासपीठ!’ या उद्गारात जशी कृतज्ञता होती, बांधिलकी होती तशीच जबाबदारीची जाणीवही होती.
महर्षी व्यास चिरंजीव आहेत.. परंपरा चिरंजीव आहेत.. हे ऐकून, वाचून होतो पण ती केवळ गुरु-शिष्य परंपरा नाही तर ज्ञान परंपरा आहे – विचार परंपरा आहे याची जाणीव झाली अन् हेही जाणवलं की आजच्या कालात नुसतं व्यासपूजन किंवा गुरुपौर्णिमा साजरी करणं पुरेसं नाही. आजच्या सर्व क्षेत्रातील हव्यासाच्या जमान्यात (हव्यासपर्व) खरा उतारा किंवा उपाय आहे व्यासांच्या ध्यासाचा नि अभ्यासाचा. असं ‘व्यासपर्व’ प्रत्यक्षात अवतरण्यासाठी तसेच प्रयत्न नि प्रयोग हवेत. वैयक्तिक नि सामूहिक दोन्ही पातळ्यांवर यावर थोडं सहचिंतन, मुक्त चिंतन म्हणा हवं तर, करू या.

दुर्गा भागवतांच्या व्यासपर्वापेक्षा हे व्यासपर्व अर्थातच वेगळं आहे. महाभारताच्या अठरा पर्वांना वेगवेगळी नावं आहेत. काही नावं भीष्म-द्रोण-कर्ण अशा महान् व्यक्तींचीही आहेत. पण व्यासांचं नाव असलेलं पर्व मात्र नाही आहे. व्यासांना आपल्या मनातलं जे काही सांगायचं असेल पण राहून गेलं असेल ते शब्दांकित करण्याचं काम दुर्गाबाईंनी केलंय जे अप्रतिम आहे.

पण आज व्यासांचा संदर्भ नि संबंध आहे ज्ञानाशी. सतत वाढत – विकसत – प्रसरण पावणार्‍या विचारांशी, जी आज काळाची खरी गरज आहे. नुसतं श्‍लोक म्हणून स्तुती करणं सोपं आहे. ते चांगलं असलं तरी पुरेसं नाही. कारण केवळ म्हणण्यात चिंतन घडत नाही म्हणून त्याचं जीवनात उपयोजनही होत नाही.
* नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे … अगदी खरं आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ हे शब्दशः नसलं तरी भावशः नि अर्थशः खरं आहे. याचा भावार्थ आहे व्यासांची प्रतिभा सर्वस्पर्शी आहे. प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असलेले सर्व विषय व्यासवाङ्‌मयात आलेले आहेत. व्यासवाणीनं धन्य झालेले आहेत. व्यासांना नुसता नमस्कार करणं, फुलं वाहणं, पूजन करणं अगदी सोपं आहे. पण त्यांच्यापासून कोणती प्रेरणा घ्यायची – कोणती वृत्ती जोपासायची हे पाहायला हवं.
* फुल्लारविंदायतपत्रनेत्र … कमळपुष्प – कमलदलं – कमलपर्ण (पानं) – हे प्रतीक आहे अलिप्ततेचं तसंच निर्लिप्ततेचं. आजच्या हव्यासाची जोपासना केल्या जाणार्‍या काळात या अलिप्त, अनासक्त वृत्तीची, साक्षीभावाची उपासना केली पाहिजे. पुढे व्यासांचं कर्तृत्व व त्यांच्या आपल्यावरील असीम उपकारांचा उल्लेख आहे.
* येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः ॥
केवढं ऋण आहे व्यासांचं आपल्यावर! सार्‍या मानवजातीवर! महाभारत नावाचा ज्ञानमय महादीप त्यांनी भावी पिढ्यांसाठी पेटवून ठेवलाय. आजही जीवनातल्या सर्व प्रसंगात व्यासांच्या विविध साहित्यसंपदेतून मार्गदर्शन मिळतं.
वेदांचं वर्गीकरण व संघटन, अठरा पुराणं व तेवढीच उपपुराणं, ब्रह्मसूत्र असा अफाट वाङ्‌मयसागर आहे व्यासांचा. त्यांची नावं तरी किती! पण विष्णुसहस्त्रनामात जसं म्हटलंय, ‘यानि गौणानि नामानि|’ म्हणजे हे गुणवाचक नामं (विशेषणं) आहेत त्या दृष्टीनं विष्णुसहस्त्रनामावर चिंतन करणं हा जीवन परिवर्तनाचा राजमार्ग आहे. आद्य शंकराचार्यांनी आपल्या भाष्यातून तो दाखवून दिलाय.
व्यासांची नावंसुद्धा केवळ विशेषनामं नसून ‘विशेषणनामं’ झालीयत. व्यास म्हणजे विस्तार. वर्तुळाचा व्यास (डायामीटर) वाढला की वर्तुळाचा परीघही (विस्तारही) वाढतो. अशी विचारांची विकसत जाण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यास. ‘विव्यास वेदान्’ असं म्हणतात ते याच अर्थानं. वेद म्हणजे मूर्तिमंत प्रकटलेलं ज्ञान आहे, त्याचा विस्तार नि व्यवस्था व्यासांनी केली. हे ज्ञानाच्या दृष्टीनं मानवजातीवरचे उपकार आहेत.

दुसरं एक नाव – कृष्णद्वैपायन. म्हणजे वर्णानं कृष्ण म्हणजे काळे पण तेजस्वी असे व्यास जन्मापासून एका द्वीपावर (बेटावर) वाढवले गेले. कारण ऋषी पराशर नि माता सत्यवती यांचे ते कानीन म्हणजे सत्यवतीचे विवाहपूर्व झालेले पुत्र होते.
महर्षी व्यास म्हणताना त्यांचं महान् ऋषीत्व सिद्ध होतं. तसंच बादरायण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. बदरी म्हणजे बोरीचं झाड. त्यांनी व्यापलेल्या बदरिका आश्रमात व्यासांची व त्यांच्या शिष्यांची ज्ञानसाधना संपन्न झाली. असं बदरीवन ज्याचं अयन म्हणजे निवासस्थान आहे ते बादरायण! अर्थातच ही नावं एकाच व्यक्तीची आहेत की व्यास नावाचं एक कुल आहे ज्यात अनेक व्यास होऊन गेले ज्यांनी एवढं साहित्य निर्माण केलं असं म्हणणार्‍यांचा एक वर्ग आहे. असो.
व्यासांचं कौटुंबिक जीवनही विचार करण्यासारखं आहे. पत्नीचं नाव आहे अरणी. ती गृहकृत्यदक्ष अशी आदर्श गृहिणी – ऋषीपत्नी आहे. पण एक खंत आहे ती संतती नसल्याची. शेवटी तिला गर्भ राहतो पण अनेक वर्षं झाली तरी ती प्रसूतच होत नाही. आपल्या तपःसामर्थ्यानं व्यासांनी त्या गर्भाशी संवाद साधल्यावर तो म्हणाला, ‘मी जन्मलो तर तुमचा-माझा, तसेच इतर अनेकांचा संबंध तयार होईल आणि संबंध म्हणजे बंध किंवा बंधन. मी आता मुक्त आहे. तसाच मला राहू दे. मला जन्म नकोच’.

यावर पत्नी अरणीचे सहमतीनं त्यांनी त्या गर्भाला कोणताही संबंध (माता-पिता इ.) प्रस्थापित न करण्याचं आश्‍वासन दिलं. त्यावर ते अद्भुत बाळ जन्मलं. पूर्ण मुक्त असलेले, विरक्त असलेले शुकमुनी किंवा शुकाचार्य ते हेच! असो.
व्यासांची शिष्यपरंपराही महान आहे. वैशंपायन, जैमिनी, पैल यांच्यासारखे प्रभावी नि मेधावी ऋषी या परंपरेचे पाईक आहेत. वेदांचं अध्ययन करून नवीन ज्ञाननिर्मिती करण्याचं महत्त्वाचं काम या शिष्यमंडळींनी पार पाडलं. याच संदर्भात आजच्या युगात व्यासांचं महत्त्व आहे.

आजचं युग जसं तंत्रज्ञानाचं (त्यातही इलेक्ट्रॉनिक क्रांतीचं) आहे तसंच ते माहितीच्या स्फोटाचंही आहे. अक्षरशः ज्वालामुखी – भूकंप नि त्सुनामी एकत्र यावेत तसा सर्वंकष माहितीचा स्फोट आज होऊन राहिलाय. या माहितीच्या आघाता(इंम्पॅक्ट)मुळे ज्ञानविचार मागे पडू लागलाय आणि विचारवंतांना अगदी अब्दुल कलामांसारख्या वैज्ञानिकांनाही गरज भासू लागलीय ती ज्ञानसमाज (नॉलेज सोसायटी) – निर्मितीची. माहितीच्या गदारोळात ज्ञान हरवलं जातंय मग विवेकाची (विज्डम) गोष्ट तर दूरच. सूज्ञपणे वागला तरच आजचा मानव अखंड आनंदात राहू शकणार आहे. नाहीतर सुखदुःखांच्या लाटांवर हेलकावत – हिंदकळत राहणार आहे. सध्या त्याची स्थिती अशी दोलायमान झालीय. विज्ञान-तंत्रज्ञानानं दिलेल्या अनेकानेक सोयीसुविधांचा उपयोग करूनही तो समाधानी झालेला नाहीये.

व्यासांना याची जाणीव त्या काळीच होऊन ते विमनस्क, उदास झाले होते. त्यावेळी देवर्षी नारदांनी येऊन त्यांना चतुःश्‍लोकी भागवताचा उपदेश करून त्यांचा भक्तीच्या अंगानं विस्तार करण्याची प्रेरणा दिली. त्याचं फलित म्हणजेच अठरा हजार श्‍लोकांचा भागवत हा बृहत् ग्रंथ. महाभारताच्या शेवटी ‘भारतसावित्री’ म्हणून जे श्‍लोक येतात त्यात त्यांच्या मनाचा आक्रोश व्यक्त होतो. व्यास दोन्ही बाहू उभारून सांगताहेत पण कोणीही त्यांचं ऐकत नाहीयेत म्हणून ते विषादग्रस्त झालेयत. त्यांचे उद्गार आहेत –
ऊर्ध्वबाहुर्विरोम्यष न च कश्चित् शृणोति मे |
धर्मात् अर्थश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते ॥
हे अगतिक उद्गार काढताना त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाच्या साक्षीनं झालेली त्याच्याच मुला-नातवांत इतर भावंडात झालेली सर्वनाशी यादवी असेल. पण त्यापासूनही आपण काहीही बोध घेतला नाही. यावर उतारा म्हणून त्यांनी गोपाळकृष्णाचं संपूर्ण लीलाचरित्र वर्णन करणारा भागवत ग्रंथ रचला. त्यातही नुसती भक्ती करण्याचा संदेश त्यांनी दिला नाही. भागवताचा आरंभ अंत ज्या एकाच चरणात केलाय तोही व्यासांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणाराच आहे. – ‘सत्यं परं धीमहि’ हा तो चरण. याच्या संपुटात सारं भागवत सांगितलं गेलंय. इथंही महर्षी व्यास ‘परमसत्याचं ध्यान’ करायला सांगताहेत.

विविध पुराणात यात्रा, व्रतं, तीर्थक्षेत्रं यांचं माहात्म्य सांगतानाही ज्ञानाचं बोट व्यासांनी सोडलेलं नाही. विचार करून, चिंतन करून सारे उपचार-विधी करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. दुर्दैवानं आम्ही त्यांच्या या ज्ञानाच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करून सारी कर्मकांडं निष्प्राण कलेवरांसारखी करून टाकलीयत. तंत्रयंत्रावर भर देऊन त्यातील मंत्राकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करत आहोत. याचा उघड परिणाम आपण भोगत आहोत. डोळस श्रद्धेचा विकास करण्याऐवजी आपण अंधश्रद्धा मात्र पद्धतशीर जोपासत आहोत. याला व्यास तरी काय करणार म्हणा!
म्हणून व्यासांची पूजा केवळ षोडशोपचारांनी न करता त्यांना ज्ञानसाधनेचं – अभ्यास करण्याचं अभिवचन देऊ या. गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषदं (वेदांत) यांचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. कृतसंकल्प होऊ या.
गु. रानडे या विद्वान सत्पुरुषांनी लिहिलेल्या उपनिषदांवरील ग्रंथाचं पद्धतशीर अध्ययन केल्यावर नानी पालखीवालांसारखे प्रामाणिक बुद्धिवंत भारून गेले. भारावून जाऊन त्यांनी अगदी पोटातून (केवळ कंठातून वा ओठातून नव्हे) कळवळून युवावर्गाला ‘उपनिषदांचा अभ्यास आयुष्यात एकदा तरी करा’ असं सांगितलंय. व्यासांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा खरा मार्ग आहे.

भागवताच्या आरतीत शब्द येतात —
अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणा साचा |
मेवा कविवर संतांचा, प्राणचि कीर्तनकारांचा ॥
याच चालीवर व्यासांनी शब्दांकित केलेली गीता, इतर उपनिषदं हे वाङ्‌मय – ‘प्राणचि आहे तरुणांचा | श्‍वासचि हा विद्वानांचा ॥ – असं म्हणता येईल. दैवदुर्विलास हा की आज चंगळवाद, भोगवाद यांचा ऑक्टोपसी विळखा बसून श्‍वास गुदमरला, प्राण कासावीस झाला तरी मोकळ्या श्‍वासासाठी नि प्राणचैतन्यासाठी व्यासांकडे वळायची बुद्धी आपल्याला होत नाहीये. आज ग्रंथालयात जाऊन अभ्यास करणार्‍यांची जमात निर्वंश होत चाललीय. पण त्याचवेळी सतत जवळ असलेल्या मोबाइलमधल्या इंटरनेटवर साधं क्लिक् करून ज्ञानखजीना बोटांजवळ (ऍट् फिंगरटिप्स) असूनही कोणाला त्याची आवश्यकता वाटत नाहीये. कालाय तस्मै नमः | दुसरं काय?
तर येत्या व्यासपूजनाच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेला संकल्प करु या की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत व्यासांच्या एका तरी ग्रंथाचा अभ्यास करीन अन् या गोष्टीचा ध्यास घेईन. मग पहा जीवनात क्रांतीचा क्षण येतो किनई! कोणत्याही वयाचे वा अवस्थेत असलो तरी आपल्याला हा हवाहवासा वाटणारा अनुभव येईलच. तो घेतला मात्र पाहिजे.

आपल्या जनजीवनाचा त्यातील धार्मिक – सांस्कृतिक – आध्यात्मिक पैलूंचा विचार केला तर मनोमन पटतं की आपण राष्ट्रगीतात जयजयकार करतो तो ‘जनगणमनअधिनायक’ कोण आहे? तर व्यासच आहेत. उत्स्फूर्तपणे ओठातून शब्द उमटतात – ‘व्यासमहर्षी, जय हे जय हे जय हे!’