हळूच या हो हळूच या!

0
1055
–  डॉ. सचिन कांदोळकर
इवलीशी अन् कोमल त्यांची हृदयं. पण त्यांच्यामध्ये गंधाच्या किती राशी दडलेल्या आहेत! त्याचं सेवन करण्यासाठी कवितेतली फुलं भोवतालच्या फुलपाखरांना नव्हे तर आपल्यालाच बोलावीत आहेत, असं सारखं वाटू लागतं.
शाळेत असताना कुसुमाग्रजांच्या ‘अनामिकास’ व ‘सहानुभूती’ या कविता अभ्यासलेल्या होत्या. पण त्याआधी त्यांची आणखी एक कविता येऊन गेली होती. दुसरीच्या ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकातली ‘हळूच या हो हळूच या’ ही कविता कुसुमाग्रजांची होती, हे उशिरा कळलं. आपण वाचतो ती कविता कुणी लिहिली, हे जाणून घ्यायचं ते वय नव्हतं. त्या वयात कवितेचा विषय नि तिची चाल या दोनच गोष्टी आम्हाला या साहित्यप्रकाराकडे ओढून नेत होत्या.
इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात आमची आजी, आमचे घर, गावची फुलबाग, लबाड कोल्हा, वाघोबाची फजिती यांसारखे धडे होते. दुसरीत गेलो अन् पाहातो तो काय, ‘बालभारती’मधला पहिलाच धडा होता- ‘ऊठ मुला!’ वाचत गेलो- ‘ऊठ मुला, ऊठ मुला/ बघ हा अरुणोदय झाला!/ किलबिलती, बागडती/ झाडांवरती पक्षि किती/ फुलांवरी, फळांवरी/ पतंग मोदे मजा करी!’ हा गद्य पाठ नव्हता. ही तर बालकवींची कविता होती. कवितेच्या पानावर असलेलं अरुणोदयाचं ते सुंदर चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं. या पाठ्यपुस्तकात बालकवी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, संजीवनी मराठे इत्यादींच्या छान छान कविता होत्या. बालकवी आपल्या कवितेतून मुलाला उठवीत आहेत- ‘ऊठ मुला, अरुणोदय झाला आहे. आळस हरवण्यासाठी शीतल वारा येतो आहे.’ मग त्या कवितेतल्या मुलाप्रमाणे आपणही मरगळ झटकून भोवतालचं सौंदर्य पाहू लागतो. इथंच कुसुमाग्रजांच्या त्या कवितेची भेट होते- ‘हळूच या हो हळूच या!’ या कवितेत फुलं कुणाला तरी बोलावीत आहेत. पण हे निमंत्रण आमच्यासाठीच आहे, असं त्याकाळी आम्हाला वाटत होतं-
हळूच या हो हळूच या!
गोड सकाळी ऊन पडे
दवबिंदूंचे पडति सडे
कुसुमाग्रजांच्या या ओळी वाचताना बालकवींची ‘ऊठ मुला’ हीच कविता पुढे चालू आहे, असं सारखं वाटत होतं. एका गोड सकाळी ऊन पडलेलं आहे, दवबिंदूंचे सडे पडलेले आहेत अन् सारखं वाटत होतं की आपल्याला हळूच कुणीतरी बोलवीत आहे. तेव्हाच्या या अनुभवाचं आज नेमक्या शब्दांत वर्णन करता येत नाही. बालकवींच्या शब्दांत सांगायचं तर पाठ्यपुस्तकातल्या कुसुमाग्रजांच्या आणि इतर कवींच्या कवितांमधून त्याकाळी आम्ही सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबून घेत होतो अन् चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडत होतो!
कुसुमाग्रजांच्या या ओळी कुठंतरी वाचलेल्या होत्या- ‘कोकिळाबाई, शाळेत या ना/ कवितेचा तास तुम्हीच घ्या ना.’ पण आमच्या बालपणी आम्ही कधी कोकिळाबाईंना शाळेत बोलावलं नाही. कारण पाठ्यपुस्तकातल्या कविता अशा होत्या की, त्याच आम्हाला निसर्गाकडे घेऊन जात होत्या. ‘हळूच या हो’मधली फुलं सांगतात ः
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललो जगती
हृदये अमुची इवलीशी
परि गंधाच्या मधि राशी
हासुन डोलुन
देतो उधळुन
सुगंध या तो सेवाया;
हळूच या; पण हळूच या!
इतक्या सुंदर ओळी वाचताना वा ऐकताना शाळेच्या बाहेर निसर्गात कवितेचा तास चालू आहे, असं सारखं वाटत होतं. हिरव्या पानांतून वर येऊन फुलं फुललेली आहेत. इवलीशी अन् कोमल त्यांची हृदयं. पण त्यांच्यामध्ये गंधाच्या किती राशी दडलेल्या आहेत! त्या गंधाची मुक्त उधळण आता चालू आहे. त्याचं सेवन करण्यासाठी कवितेतली फुलं भोवतालच्या फुलपाखरांना नव्हे तर आपल्यालाच बोलावीत आहेत, असं सारखं वाटू लागतं. इतक्या सुंदर ओळी बालकवीच लिहू शकतील!
पुढे कुसुमाग्रजांच्या अनेक कविता अभ्यासल्या. ‘हळूच या हो’चा मात्र विसर पडलेला नव्हता. या एका कवितेमुळे त्यांच्या इतर बालकवितांकडे वळलो. त्यांची ‘उठा उठा चिऊताई’ ही कविता गंमत म्हणून मी पुटपुटत असतो. ‘उठा उठा चिऊताई/ सारीकडे उजाडले/ डोळे तरी मिटलेले/ अजूनही!’ या ओळींमधलं ‘अजूनही’ उच्चारायला मला आवडतं. अजूनऽऽही! बालकवींच्या श्रावणाइतकाच कुसुमाग्रजांचा ‘लपतछपत/ हिरव्या रानात/ केशर शिंपीत’ येणारा श्रावणदेखील मला तितकाच आवडतो. ‘हळूच या हो हळूच या’मधल्या या ओळी कुठल्या मुलाला आवडणार नव्हत्या?-
कधि पानांच्या आड दडू
कधि आणू लटकेच रडू
कधि वार्‍याच्या झोताने
डोलत बसतो गमतीने
ज्या वयातल्या मुलांसाठी ही कविता होती, त्याच मुलांच्या भाषेत कुसुमाग्रजांची बालकविता अवतरलेली होती. त्यामुळे मुलांना ती आपलीशी वाटत होती. पुढे त्यांनीच कुठंतरी लिहिलेलं वाचनात आलं-
‘मुलांच्या दृष्टीनं पाटाचा उपयोग शेतीपेक्षा गुडघाभर पाण्यात उभं राहून आत खेळण्यासाठीच अधिक असण्याचा संभव असतो. ही विशिष्ट भूमिका घेऊन लिहिलेली गीतंच त्यांना समजू शकतात.’ तर ‘हळूच या’ ही कविता म्हणजे ‘फुलांचे गाणे’ आहे. आपल्या अंगावर तर्‍हेतर्‍हेचे रंग असलेली ही फुलं फुलपाखरांना आर्जव करीत आहेत- फुलांची भाषा मुलांना समजते. म्हणून,
निर्मल सुंदर
अमुचे अंतर
या आम्हाला भेटाया;
हळूच या; पण हळूच या!
अशा शब्दांत फुलं आपल्या भोवतालच्या फुलपाखरांना बोलावतात खरी, पण फुलपाखरांसारखीच मुलंदेखील त्यांना भेटायला जातात, हळूच!
आज कळतं, शालेय जीवनात कुसुमाग्रजांसारखे कवी आपल्या कवितांमधून आमचं मन संवेदनक्षम बनवीत होते अन् त्याचबरोबर आमच्यामध्ये रसास्वादाची पात्रतादेखील निर्माण करीत होते. पण हळूच!!