हर्बल गार्डन

0
313

– डॉ. स्वाती अणवेकर

बाकूची/बावची

ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते. काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात. पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती, एकान्तर असतात. पत्र धारा दन्तुर असतात. फुले पिवळसर, निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात. फळ काळे व गुच्छात येते. बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो.
बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे. हे चवीला गोड, कडू, तिखट असून उष्ण आहे. तसेच हल्के व रूक्ष आहे. बाकुची कफवातनाशक व पित्त प्रकोपक आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात :
१) कृमींवर ५ दिवस बाकुची चुर्ण देऊन मग त्यावर एरंडाचे तेल पोटात देतात संडासला पातळ होऊन कृमी पडून जातात.
२) श्वित्र कुष्ठात व जीर्ण त्वचारोगात बाकुचीचा उपयोग होतो.
३) उष्ण असल्याने बाकुची कामोत्तेजक आहे म्हणून ती क्लैब्यात वाजीकर कार्य करते.
४) खरजेवर बाकुचीबी व कारळे गोमुत्रात वाटून लेप लावतात.
…………………………………………

कपिकच्छू/खाजकुहिली

पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थीवर्गात ह्याच्या शेंगावरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली. जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते.
ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब, त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते. फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते. फुले वांगी निळ्या रंगाची असतात. फळ शेंगेच्या स्वरूपात ५-१० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असते. ह्याच्या कडा वाकड्या असून शेंगेवरील दाट लव असते. प्रत्येक शेंगेत ५-६ धुरकट व चपट्या बिया असतात. बीज मज्जा पांढरी असते.
ह्याचे उपयुक्तांग बीज, मुळ व रोम असून कपिकच्छू चवीला गोड, कडू असून थंड गुणाची व जड व स्निग्ध असते. हे गोड, जड व स्निग्ध असून वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात :
१) फलरोम क्षोभ उत्पन्न करून कृमिनाशक कार्य करतात म्हणून फल रोम हे गुळ, मध व लोण्यासह मिसळून देतात व त्यानंतर रेचक औषध दिले जाते ज्यामुळे कृमी मरून पडतात.
२) कपिकच्छू बीज शुक्रवृद्धि करते म्हणून नपुंसकत्वात हे उपयुक्त आहे.
३) कपिकच्छू मुळ हे आर्तवजनन असल्याने मासिकपाळीच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.
४) कृशता व अशक्तपणा ह्यात कपिकच्छू बीज उपयोगी आहे
५) गोड चव व थंड असल्याने बाळंतीणीमध्ये स्तन्यवृद्धि करण्यास कपिकच्छू बीज उपयुक्त आहे.
……………………………………………………..

दारूहरिद्रा/दारूहळद

ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते. पाने बळकट व भोवर्‍याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात. पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते. फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्याप्रमाणे दिसणारे असते. काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो.
दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड, मुळ, फळ व रसांजन आहे. ह्याची चव कडू, तुरट असून ती उष्ण गुणाची व हल्की व रूक्ष असते. ह्याचे काण्ड मुळ चवीला कडू तुरट असल्याने कफ व पित्तनाशक असून फळ पित्त शामक आहे.
दारूहळदीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात :
१) दारूहळद दीपन, यकृत्तोत्तेजक व पित्तसारक असून मळ बांधून ठेवते म्हणून भुकन लागणे, आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
२) कफनाशक असल्याने दारूहळद खोकल्यात वापरतात.
३) त्वचारोग, खाज, स्त्राव कमी करायला दारूहळद लावायला व पोटात घ्यायला देतात.
४) स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास दारूहळदीचा काढा देतात.