हर्बल गार्डन

0
193

कुटज/कुडा

ह्याचे वर्षायू पाने असणारा ९-१२ मीटर उंच वृक्ष असतो. बुंध्याकडील साल पांढरी धुरकट रंगाची व कोरडी असते. पाने ९-१२ सेंमी लांब व ४-८ सेंमी रूंद व कदंबाच्या पानांप्रमाणे असतात. फुले पांढरी व मंद सुवासयुक्त असतात व मंजीरीस्वरूप असतात. फळ शेंगाच्या आकाराचे २०-४०सेंमी लांब व ०.५- १ सेंमी व्यासाचे असते. एका देठाला २-२ शेंगा येतात. या शेंगांवर. पांढरे डाग असतात, बी धुरकट रंगाचे व सातूच्या आकाराचे १ सेंमी लांब असते व एका शेंगेत २५-३० बिया असतात. ह्या बियांवर कापूस असतो. ह्यांना इंद्रयव म्हणतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व बिया. कुडा चवीला तिखट, तुरट व कडू असतो. हा थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो. हा कफ पित्तनाशक व वातकर असतो तर त्याच्या बिया त्रिदोष नाशक आहेत.
चला आता आपण कुड्याचे उपयोग पाहुयात :
१) गळवांवर कुड्याच्या सालीचा लेप करावा त्याच्या तुरट चवीमुळे ओढा बसतो.
२) भुक वाढविणारा व स्तंभक असल्याने अतिसार व ग्रहण ह्यात हा उपयोगी आहे. ह्यात कुड्याचे बी चुर्ण करून पाण्यात शिजवून मधासोबत देतात.
३) मुळव्याधीमध्ये रक्त पडत असल्यास कुटज सालीचा काढा देतात.
४) कृमीमध्ये कुड्याचे साल वावडींग चुर्णा सह देतात.
५) लघ्वीच्या त्रासात कुड्याची साल गाईच्या दुधात उगाळून देतात.

कुष्ठ
ह्याचा २-२.२५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते. काण्ड खाली बोटाएवढे जाड बळकट व आतून धागे असलेले सुत्रमय असते. पाने मुलीय पत्रवृन्तासह ०.५-१ मीटर लांब, त्रिकोण पत्रवृन्त लांब काण्डीयपत्र १५-३० सेंमी लांब व आखूड देठाचे किंवा अवृन्त पुष्प निळसर वांगी रंगाचे गोलाकार असून बीज लहान व वेडे वाकडे असते. मुळ जाड व बहुवर्षायू असते. ताजेमुळ ८-१५ सेंमी लांब व १.५-४ सेंमी रूंद गाजराच्या आकाराचे सुगंधी व तांबूस गुलाबी असते. तोडल्यावर आत पांढरे दिसते व बाह्य भागावर उभ्या रेषा असतात.
ह्याचे उपयुक्तांग मुळ असून कुष्ठ चवीला कडू, तिखट, गोड व उष्ण गुणाचे असून हल्के तीक्ष्ण व स्निग्ध असते.हे कफ व वात नाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात :
१) तीक्ष्ण, सुगंधी, दुर्गंध नाशक, जंतुघ्न असल्याने जुनाट व्रणात कुष्ठ उपयोगी आहे.
२) तीक्ष्ण, उष्ण असल्याने दीपन व तिखट कडू असल्याने पाचन म्हणून भुकन लागणे व अजीर्ण ह्यात उपयोगी आहे.
३) तीक्ष्ण, उष्ण असल्याने कफ पातळ करून स्निग्ध गुणाने तो शरीराबाहेर काढते म्हणून खोकला, दमा ह्यात उपयुक्त आहे.
४) डोकेदुखीवर कुष्ठ व एरंडमूळ एकत्र वाटून लेप करतात.
५) कुष्ठ गर्भाशयोत्तेजक व आर्तवजनन असल्याने मासिक पाळीच्या तक्रारीत उपयोगी आहे.

मदनफळ

ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो. ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात. पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात. ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल, पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते. मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात.
ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड, कडू, तुरट, तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व रूक्ष असून प्रभावाने उल्टी करवते. हे अल्प मात्रेत वापरल्यास गोड चव सोडल्यास इतर गुणांनी कफनाशक आहे व उष्ण असल्याने वातनाशक आहे.पण जास्त मात्रा वापरल्यास कफपित्त शोधन करते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात :
१) मदनफळ साल वेदना व सूज कमी करते म्हणून वातव्याधीमध्ये अभ्यंगास ह्याचे तेल वापरतात.
२) कफप्रधान विकारात उल्टी करविण्यास मदनफळ उपयुक्त.
३) अल्पमात्रेत वापरल्यास कफनिस्सारक आहे म्हणून सर्दी, दमा, खोकला ह्यात मदनफळ उपयुक्त आहे.
४) मदनफळ तीक्ष्ण, उष्ण, कडू, तिखट, तुरट असून
त्वचा रोगात क्लेद व दुष्ट कफाचा नाश करते.

गंभारी/ काश्मरी
ह्याचा २० मीटर उंच वृक्ष असतो, बुंध्याची साल पांढरी व काण्ड त्वचा धुरकट असते. जुनी झाल्यावर साल फिकट रंगीत तुकड्यानी सुटते. पाने १०-२५ सेंमी लांब, ८-२० सेंमी रूंद असून पर्ण वृन्त ५-१५ सेंमी लांब असतो. त्याच्या टोकाशी गाठी असतात. त्याची पाने देठा जवळ हृदयाकृती तर शेंड्या जवळ पातळ व टोकदार असतात. फुल तांबूस पिवळे एक फुट लांबीच्या मंजिरी स्वरूपात असते. ती अडुळशाच्या फुलांप्रमाणे दिसतात. फळ बकुळीच्या फळा सारखे अंडाकृती व पिवळ्या रंगाचे व गोड तुरट वासाचे असते. फळात १-२ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व फळ. ह्याचे मुळचवीला कडू, तुरट, गोड असून उष्ण गुणाचे व जड असते. तर फळ चवीला गोड असून थंड गुणाचे व जड आणी स्निग्ध असते. ह्याचे मुळ वात कफ नाशक तर फळ वातपित्त नाशक असते.
चला आता गंभारीचे औषधी गुणधर्म पाहुयात:
१) गंभारीची पाने स्निग्ध व थंड असल्याने तापा मध्ये व डोके दुखीत त्यांचा लेप डोक्यावर करतात.
२) शरीरात पित्तवाढून तहान लागली असल्यास व शोष लागत असल्यास चंदन, वाळा व साखरे सह गंभारीच्या फळाचा फांट देतात.
३) गंभारीचे पिकलेले फळ थंड गुणाचे असल्याने रक्त व पित्तशामक असून रक्तपित्तात उपयुक्त आहे.
४) गंभारीचे फळ हे गर्भाशयास बल देते व गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५) लघ्वीच्या त्रासामध्ये गंभारीच्या पानांचा रस गाईच्या दुध व साखरे सह देतात.