हर्बल गार्डन

0
343

विडंग/वावडींग

वावडींगाचे मोठे गुल्म असतात. पाने टोकदार व अखंड धारायुक्त असतात. फुले लहान पांढरी किंवा धुरकट असून ३-४ शाखा असलेल्या मंजिरी स्वरूपात असतात. फळ मिर्‍याप्रमाणे लहान व गोलाकार, तांबूस काळे गुच्छात उगवणारे असते. त्यात एक करड्या रंगाचे बी असते व त्यावर पांढरे ठिपके असतात.
ह्याचे उपयुक्तांग फळ आहे. वावडींग चवीला तिखट असून उष्ण गुणाचे व हलके, रूक्ष व तीक्ष्ण असते. हे कफ व वातनाशक असून पित्तकर असते.

औषधी उपयोग :
१) दातदुखी, दातकिडणे ह्यात वावडींग काढ्याच्या गुळण्या करतात.
२) तिखट चवीचे व उष्ण असल्याने हे जठराग्नि प्रदिप्त करते व भुक वाढवते व आमाचे पाचन करते.
३) तिखट चव व उष्ण वीर्याने वावडींग सर्व प्रकारच्या कृमींवर कृमीनाशक कार्य करते.
४) वावडींग त्वचागत दोषांची दुष्टी दूर करून कुष्ठघ्न कार्य करते.
५) खोकला व दमा ह्यात वावडींग चुर्ण मधासह देतात.

सारीवा

ह्याची १.५-३ मीटर उंचीची पातळ आवर्तन वेल असते. पाने अभिमुख, अंतराने उगवणारी, वेगवेगळ्या आकारांची, २.५-१० सेंमी लांब व ०.५-४ सेंमी रूंद असतात. फुले पत्र कोणाय व मंजिरी स्वरूप व गुच्छात उगवतात. बाहेरून हिरवे व आतून वांगी रंगाचे असते. फळ १०-१५ सेंमी लांब शिंगाच्या आकाराचे चपटे आत मऊ कापूस असलेले व चपटे बी असणारे असते. मुळ व काण्ड वरून तांबूस व आत पांढरे असते. ओल्या मुळांना कापरासारखा वास येतो.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ. ह्याची चव गोड, कडू असून ही थंड गुणाची असते व जड व स्निग्ध गुणाची असते. ही त्रिदोषशामक आहे.
औषधी उपयोग :
१) सारीवा दाहशामक व शोथनाशक असल्याने दाह व शोथ ह्यात लेप करतात.
२) तिक्तरसाने रुचिकर, दिपन, पाचन म्हणून अरूचि, भुक न लागणे, ह्यात सारीवा उपयुक्त आहे.
३) सारीवा रसरक्त धातूवर कार्य करते म्हणून दाहशामक, ज्वरनाशक व शरीरात थंडपणा आणते.
४) सारीवा त्रिदोषप्रकोपातून रक्तादी धातू दुष्टी होऊन उत्पन्न होणार्‍या कुष्ठात उपयुक्त आहे.
५) सारिवा मधुर, स्निग्ध व गुरू असल्याने रसधातू व स्तन्याचे पोषण करते व शोधन ही करते.

त्रिवृत्त/निशोत्तर

ह्याचा मोठा वर्षायू वेल असतो. ह्याचे काण्ड सरळ वाढणारे, रोमश, त्रिकोणी किंवा चतुष्कोणी असून तोंडल्यावर दुधासारखा चीक निघतो. ह्याची पाने वेगवेगळ्या आकारांची ५-१० सेंमी लांब असून पत्रवृन्त २.५ सेंमी लांब असतो. ह्याचे फुल घंटाकार असून पांढर्‍या रंगाचे असते. फळ सुमारे गोल असून ५ सेंमी लांबीच्या ४ काळ्या बिया त्यात असतात. मुळ तांबूस किंवा काळे असून मोठे व शाखायुक्त असते. मुळ तोडल्यास पांढरा दुधासारखा स्त्राव येतो.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळत्वचा. त्रिवृत्त चवीला तिखट, तुरट, गोड व कडू असून हे उष्ण गुणाचे असते. तसेच हे हलके, रूक्ष व तीक्ष्ण असते. हे वात वाढविणारे, पित्त व कफनाशक आहे.
औषधी उपयोग :
१) सुजेवर त्रिवृत्ताचा लेप गोमुत्रात वाटून लावतात.
२) पोटफुगी, संडासला साफ न होणे, मुळव्याध, यकृत विकार ह्यात निशोत्तर विरेचक म्हणून वापरतात.
३) तापामध्ये देखील विरेचनासाठी निशोत्तर काढा देतात.

कंटकारी/रिंगणी

कंटकारी हे जमीनीवर पसरणारं बहुवर्षायू काटेरी क्षुप आहे. ही चमकदार हिरव्या रंगाची वनस्पती आहे. ह्याची पाने १०-१२.५ सेंमी लांब व ५-७.५ सेंमी रूंद व कडा खंडीत असलेली असते. पानांवर ०.७५ सेमी लांब लहान काटे असतात. फुल निळे मंजिरी स्वरूप असते. फळ गोल कच्चे असताना पांढर्‍या रेषा असलेले व हिरवे तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचे असते. ह्याचे बीज लहान असते व चमकदार असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे पंचांग, फळ व मुळ. कंटकारी चवीला कडू, तिखट असते व उष्ण गुणाची व हलकी, रूक्ष व सर गुणाची असते. ही कफ व वात नाशक आहे.
औषधी उपयोग :
१) वेदनाशामक असल्याने फळांचा उपयोग दांतदुखीमध्ये धुपनार्थ करतात.
२) तिखट व उष्ण असल्याने कण्ठातील कफ पातळ करून कंटकारी कण्ठ्य कार्य करते.
३) उचकी, दमा व खोकला ह्यात कण्टकारी अवलेह उपयोगी आहे.
४) तापात रिंगणीमुळे, काडेचिराईत व सुंठीचा काढा देतात.
५) कंटकारी उष्ण असल्याने वृक्काला चालना देते व मुत्रल कार्य करते. म्हणून लघवीच्या त्रासात कंटकारी स्वरस मधासह देतात.

पटोल/कडू पडवळ

ह्याच्या बहुवर्षायू, मुळ स्तंभापासून निघणार्‍या मोठ्या आरोहिणी वेली असतात. ह्याची पाने हृदयाकृती व खरखरीत रोमयुक्त असतात. ती ८-१० सेंमी लांब व ५ सेंमी रूंद असतात. फुले पांढरी व एकलिंगी असतात. फळ लंबगोल व १५-२० सेंमी लांब व दोन्ही बाजुस निमुळते असते. कच्च्या फळावर हिरव्या व पिकल्यावर लाल रेषा असतात. कच्चे फळ पांढरट हिरवे व पिकल्यावर तांबूस पिवळे असते.
पटोलाचे उपयुक्तांग आहे पाने, पंचांग व फळ. हे चवीला कडू व उष्ण गुणाचे असून हल्के व स्निग्ध आहे. हे त्रिदोषशामक आहे.
पटोलाचे औषधी उपयोग :
१) जखमेवर पटोल पानांचा लेप लावतात कारण कडू चव व हलके असल्याने पटोल जखम शुद्ध करते व लवकर भरायला मदत करते.
२) कडू चव व उष्ण असल्याने पटोल दिपक, पाचक, अनुलोमक, पित्तसारक व दुष्ट कफनाशक आहे. म्हणूनच भुक न लागणे, अजीर्ण, अम्लपित्त, कृमी, ह्यात पटोल उपयुक्त आहे.
३) पटोल रसगत पित्ताचे व कफाचे शोधन करते व रसशुद्धी करते म्हणून तापामध्ये पटोल उपयुक्त आहे.
४) चाईवर पटोलाच्या पानांचा स्वरस लावतात.
५) बध्द कोष्ठावर पटोल पंचांगाचा काढा देतात.