हरितालिका – गवराई

0
219

– पौर्णिमा केरकर

गोव्यातील बर्‍याच भागातील महिषासूर मर्दिनीलाही पार्वतीच्याच रूपात अनुभवता येते. डिचोलीतील कुडणे गावात बदामी चालुक्याच्या काळात सुमारे सातव्या शतकाशी नाते सांगणारी उमासहित शंकराची मूर्ती कुडणेश्‍वराच्या मंदिरात आढळली होती. गोवापुरीलगतच्या आगशीलाही अशा मूर्ती आढळलेल्या होत्या. धरित्री सजीव सृष्टीला धारण करणारी- विश्‍वाची जननी, अधिष्ठात्री त्यामुळे तिची आराधना करणे लोकमनाने आपले कर्तव्यच मानले. शिवाय ‘पार्वती’ कष्टकरी मालनीना सदैव प्रेरणादायीच वाटत आलेली आहे. म्हणूनही व्रतवैकल्ये उपासनेमधून तिचं जागरण त्यांनी चालूच ठेवलं.

‘पार्वती’- पर्वत धारण करणारी – हिमालयाची कन्या – हिमगौरी -उमा अशा कितीतरी नावांनी लोकमानसात प्रचलित आहे. इथल्या कष्टकरी स्त्रीमनाला तर तिच्याविषयी नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. सर्वांगसुंदर, स्वाभिमानी- स्वावलंबी जगण्याचे प्रतीक म्हणून तर ती वंदनीय ठरलेली आहे. तिच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे तेज-चैतन्य कष्टकरी मालनींच्या मनात सूप्तपणे दडून राहिले. सीतेचे सोशिकपण आयुष्यभर त्यांनी सहन केलेच पण मनाने त्यांना पार्वतीचा स्वभाव, वागणंच खुणावत असावं – तिला जे हवं होतं – स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासाठी ते तिने जटाधारी – जोगी शंकराच्या रूपात पाहिले. आपल्या गोर्‍या गोमट्या मुलीचा विवाह दाढी वाढलेल्या, जटाधारी असलेल्या – दर्‍याखोर्‍यांत भणंग होऊन – भस्म लावून फिरणार्‍या जोग्याशी करून द्यायचा हा विचारही त्यांच्या मनाला कसा पटणार? त्यामुळेच नारदाने आणलेले ‘विष्णू’चे पार्वतीसाठीचे स्थळ त्यांना पसंत पडले. लग्नाची तयारीही सुरू झाली. पण पार्वतीने तर मनोमन शंकराला वरलेले होते. आता करायचे काय… आपल्या सखीला सारे वर्तमान कथन करून ती तिच्याबरोबरीने गेली घनघोर अरण्यात- तिथे एका अंधार्‍या गुहेत शिवलिंगाची स्थापना करून कडक तपश्‍चर्या केली – साक्षात शिवाला तिच्यासमोर नतमस्तक व्हावेच लागले. मातापित्यांनाही शिव-पार्वतीच्या विवाहाला मान्यता द्यावी लागली. पार्वतीचा दृढनिश्‍चय, तिची निर्णयक्षमता मालनीना प्रभावित करीत राहिली. अगदी आत्ता या एकविसाव्या शतकातही श्रावण-भाद्रपदातील- मंगळागौरी, हरितालिका व्रत, गौरीपूजनाच्या माध्यमातून तिची उपासना चालूच आहे.
लोकमानसाने आपल्याला जे दैवत आवडते त्याविषयी अनेक कथा दंतकथा रचून ठेवलेल्या आहेत- ‘शिव-पार्वती’ – भूमाता पार्वती समस्त सजीवमात्राचा जगण्याचा आधार. भूमातेची ही पूजा अनंतकाळापासून भारतीय समाजमनात प्रचलित आहे. सिंधूसंस्कृतीत डोक्यावर तीन शिंगे आणि योगमुद्रेत आसनस्थ झालेला पशुपतीनाथ याचे साधर्म्य शिवाशी मानले जाते. खरं तर पर्वतांचा राजा म्हणून शंकराला ‘गिरीश’ हे नाव प्राप्त झालेले असून त्याची भार्या म्हणून पार्वतीला शैवपूजन परंपरेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. गोव्यात काणकोणात मल्लिकार्जून, केपेत चंद्रेश्‍वर, अंत्रुज महालात मंगेश, नागेश, नागनाथ या नावाने परिचित असलेल्या शिवाची पार्वती लोकमानसात वैविध्यपूर्ण नावाने एकरूप झालेली आहे. गोव्यातील बर्‍याच भागातील महिषासूर मर्दिनीलाही पार्वतीच्याच रूपात अनुभवता येते. डिचोलीतील कुडणे गावात बदामी चालुक्याच्या काळात सुमारे सातव्या शतकाशी नाते सांगणारी उमासहित शंकराची मूर्ती कुडणेश्‍वराच्या मंदिरात आढळलेली होती. गोवापुरीलगतच्या आगशीलाही अशा मूर्ती आढळलेल्या होत्या. धरित्री सजीव सृष्टीला धारण करणारी – विश्‍वाची जननी, अधिष्ठात्री त्यामुळे तिची आराधना करणे लोकमनाने आपले कर्तव्यच मानले. शिवाय ‘पार्वती’ कष्टकरी मालनीना सदैव प्रेरणादायीच वाटत आलेली आहे. म्हणूनही व्रतवैकल्ये उपासनेमधून तिचं जागरण त्यांनी चालूच ठेवलं.
श्रावण – भाद्रपद हे दोन पावसाचे महिने – दोन्ही महिन्यातील पाऊस त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहतो. धरित्री हिरव्यागार शालूत नववधूसारखी सजते. वृक्षवेली – वनस्पतीच्या जगण्याला यातून प्रेरणा मिळते. अशावेळी श्रावण महिन्यात ब्राह्मण समाजात मंगळागौर साजरी केली जाते. ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ आणणारा श्रावण सृष्टीदेवतेला चैतन्यसनद प्राप्त करून देतो. नवविवाहिता तर मंगळागौरीच्या व्रतात प्रमुख भूमिका बजावतात. पत्रीपूजनाने निसर्गपूजन केले जाते. पारंपरिक प्रथेनुसार पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून बाळ जन्माला घातला. त्याच्यात प्राण फुंकले. स्वतः ती आंघोळीसाठी गेली असता तिने त्याला आज्ञा केली की कोणालाही आत सोडू नकोस. मातेची आज्ञा बालकाने शिरसावंद्य मानली आणि साक्षात भगवान शंकराला सुद्धा त्याने दरवाजावरच अडवले. कोपिष्ट झालेले शिवशंभो बालकाचे मुंडके छाटून टाकतात. पार्वतीला जेव्हा हे कळते तेव्हा तर ती संतापून उठते. हत्तीचे मुख बालकाच्या मुंडके छाटलेल्या जागेवर लावून त्याला पुनर्जिवीत केले जाते. ही भावना लोकमनात परंपरेने दृढ झालेली. यामागील वास्तव किती हे तपासत न बसता शंकर पार्वती- श्रीगणेश या आपल्या लाडक्या दैवताना सृजनत्वाच्या रूपातच अनुभवलेले दिसते. पर्वताची निर्मिती मातीपासून, झाडेपेडे दगडधोंडे – हे त्याचे अविभाज्य घटक – हेच घटक म्हणजे मानवी अस्तित्व. त्यामुळे सृजनाधार असलेली पार्वती व तिने जन्माला घातलेले गणेश दैवत या मायलेकाविषयीची कृतज्ञता त्यांच्या पूजनातूनच येते. पुत्राची पूजा तर केली जातेच पण त्याचबरोबरीने मातेची पूजा, तिच्यासाठी व्रत राखावे, ते सुद्धा अगोदर असे या मालनींना वाटले. त्यात नवल काहीच नाही. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका म्हणून तिची उपासना केली.
‘मंगळागौर’ श्रावणात प्राण फुंकते- रसरसून समरसून फुगडी, झिम्मा रंगतो. भाद्रपदात ती ‘हरितालिका’, गौरीपूजनातून समाजमनाशी बंध-अनुबंध जुळविते. हरितालिका रुपातील गौरीपूजन गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बर्‍याच ठिकाणी होते. नारळरुपी महादेव, मोठे कासाळ्याचे पान, हळदीचा थाम, विविध तर्‍हेची पत्री अशा रूपात ‘गौरी’ला सजवतात. घरात जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतात त्या प्रत्येकीने पाच-पाच नारळाचे वायन गौरीजवळ ठेवतात. उपवास केला जातो तोसुद्धा तांदळापासून तयार केलेले पदार्थ न खाता! पाच पानांची भाजी- त्यात शेगलाची पाने, दुदी, नावडी, वालीची पाने- आळु वगैरेचा समावेश. गौरीला जो नैवेद्य ठेवायचा तो मीठ न घालता – तिच्यासाठी सारण न घालता पातोळी करायची जिला ‘मोनी पातोळी’ संबोधली जाते. गणपती विसर्जनापूर्वी गौरीची ओटी भरायची. तिला घरात फिरवायची, तुळशीवृंदावनात विसर्जित करायची. सोबतीला प्रतिकात्मक ‘गवर’ गणपतीला विसर्जित करेपर्यंत असतेच. विसर्जनाच्या वेळी एकमेकींना वायन देण्याची परंपरा सुद्धा काही ठिकाणी दिसते. हरितालिकेचे व्रत त्रयेपासून सुरुवात होते. तर काही काही जागांवर महादेवाच्या शेजारी हळदीचा थाम, पत्री पूजनरूपी गौरी पूजली जाते. तिचाही पाहुणचार गणेशमुर्तीचा जेवढे दिवस होतो तेवढेच दिवस केला जातो. विसर्जित करताना मात्र पहिला मान तिचाच असतो.
तिथीनुसार येणारे गौरीपूजन गोव्यात ठिकठिकाणी साजरे केले जाते. या वेळच्या व्रत उपासनेचा उत्साहसुद्धा फार मोठा असतो. काही ठिकाणी पाचव्या दिवशी तर काही ठिकाणी तिथीचा विचार करून हे व्रत केले जाते. गौरीसाठी पाच हळदीची पाने, महादेवासाठी नारळ तांदूळ, देवी आणण्यासाठी म्हणून, सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन महिला बेळांची परडी त्यात तांब्याचा कलश घेऊन विहिरीवर, नदीवर जातात. कलशात पाच किंवा एकविस छोटे छोटे दगड, पाच शिंपल्या, पैसे, काजळ-कुंकुम, पानाचा विडा वगैरे साहित्य ठेवून त्यात पाणी घातले जाते. आंब्याची पाने नारळ-कलशात ओतल्या जाणार्‍या पाण्याचा घोट तोंडात धरून मुक्यानेच देवी घेऊन घरात प्रवेश करायचा. चुन्याने पाच बोटे रेखीत देवीला आसनस्थ करायची. त्यावेळी तोंडातला घोट करवंटीत ठेवून ती प्रवेशद्वाराच्या शेजारीच ठेवण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. यथासांग पूजा केली जाते तेव्हा मालनी गुणगुणतात…
पाऊस लागेता झिरीमिरी, तारु चालेला रत्नागिरी
रत्नागिरीच्या किल्यावरी, जाये फुलले अस्तमतुरी
जायो काडी मी पाटुल्यात, जायो गुंथी मी उभ्या दोर्‍यार
जायो धाडी मी गवरीच्या होवशाक
गवरीचा होवसा गे फुलांनी दमदमला.
तिचा नैवेद्य पाच तर्‍हेच्या भाज्या एकत्रित करून केलेली भाजी अन् नाचणी किंवा तांदळाच्या पिठापासून तयार केलेली भाकरी. ती करताना सुद्धा तीन चिमट्या चुलीतली राख पिठात मिसळायला हवी ही परंपरा – भर यज्ञात जेव्हा तिच्या माहेरी तिचा व तिच्या पतीचा तिच्याच पित्याने केलेला अपमान ती सहन करू शकत नाही. आल्यापावली ती माहेराहून सासरी येते तेव्हा फक्त पित्याच्या घरातील चुलीमधून तीन चमचे राख ती जिभेवर ठेवते असा समज. हरितालिकेच्या व्रतातील ‘मोनी पातोळी’, गौरीपूजनातील भाकरी हे गवरीच्या स्वाभिमानी वृत्तीचेच प्रतीक बनून राहिलेले आहे. हळदीच्या पानावर तिच्यासाठी ‘होवशे’ तयार केले जातात. नववधूला गौरीपूजनाच्या निमित्ताने ‘होवसायले’ जाते. कोनेल, शेगुल, तायकिलो, हुडूडक, कुडूडक, नावूल, कोडशी वगैरेची मिळून केलेली भाजी-भाकरीची छोटी छोटी कुटे प्रसाद म्हणून गौरीविसर्जनाच्या वेळी जेव्हा वाटला जातो तेव्हा त्याची चव जिभेवर रेंगाळणारी ठरते. काही ठिकाणी तर गौरीच्या पूजनापासून ते विसर्जनापर्यंत घरातील महिला आळीपाळीने गौरीची राखण करतात कारण गणपतीला पाया पडण्याच्या निमित्ताने जर एखादी महिला आली आणि कलशात आपला पदर घातला व त्याला गाठ मारून देवीला आपल्या घरी घेऊन गेली तर… ही भीती म्हणून राखण केली जाते असे लोकमानस सांगते.
गौराईला माहेरची असीम ओढ – तशी ती स्त्रीमनाला जात्याच असते.
‘श्री गणेशा महादेवा, काय गवर जाता माहेरा
जाता जाल्या जाऊदे, तिका कपालकुकू लेवू दे
तिका देडा दिसानी येऊ दे
दिडा दिसाच्या पूजेसाठी मी नाय जायची माहेरा.
असे असले तरीही तिच्या आईची आर्त हात तिच्या कानावर पडते. तिला राहावत नाही. तिची पावले आपोआपच माहेराकडे वळतात. दक्ष राजाने आरंभलेल्या यज्ञात सर्व श्रीमंत वैभवशाली राजे-महाराजांना निमंत्रण असतं. फक्त गवराई आणि शंकर मात्र त्याला अपवाद ठरतात. आपलं माहेरच आहे, निमंत्रण कशाला हवे – माता तर आपल्या हृदयीचीच असते. कारण…
हिरव्या रानाचं पिवुळं ठसं
गौराई म्हनं माझं माह्यार दिसं
माह्यार दिसं जाल्या येवन जा गे लेकी
पायातली पैंजण लेवन जा गे लेकी…
म्हणून ती जाते, मात्र अपमानित होते. अन्याय गपगुमान स्विकारणारी ती गौराई, पार्वती कोठली – तिने तेथेही बंड केलेच- लोकमनात मात्र दृढ स्थान निर्माण केले.
गवराई, हरितालिका या इथल्या सृजनशील देवता. लोकमानसाला स्त्रियांना त्या आपल्याच रूपात अनुभवताना – कष्टप्रद जीवनात सुद्धा त्यांना उत्साह वाटला. गौराईची माहेरची ओढ, तिला साडीचोळी, फुले, अहेवलेणी यांची असलेली आवड हेच अधोरेखित करते. ती अल्लड, अवखळ – केळीच्या, आंब्याची, पोफळीच्या बनात वावरणारी, हळदीच्या पानांवर तर तिचा भारी जीव असे समाजमनाला वाटते. तिला पूजायचे ते हळदीच्या रोपात – हळदीचे पान नाजूक – रसरशीत, सौंदर्यपूर्ण तेवढेच औषधी गुणधर्माने युक्त असलेले – त्याची सात्विकता तर सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. तिच्याविषयीचा हा सात्विक, सोज्वळ – निरलस भाव इथल्या लोकमनात हरितालिका, गवराईबद्दलचे धार्मिक – सांस्कृतिक – सामाजिक अनुबंध अतूट राखण्यास कारणीभूत ठरला!