हरमलात ६४ लाखांचे ड्रग्स जप्त

0
99

>> पेडणे पोलिसांच्या कारवाईत दोन जर्मन नागरिकांना अटक

पेडणे पोलिसांनी काल दि. १२ रोजी हरमल येथे दोन जर्मन नागरिकांकडून ६४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. या दोघांवरही पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अटक झालेले जर्मन नागरीक गेल्या १३ नोव्हेंबर रोजी भारतात आले व २१ नोव्हेंबरपासून ते हरमलमध्ये वास्तव्यास होते.

पेडणे पोलिसांनी १२ रोजी रात्रो हरमल येथील ओझिल गेस्ट हाऊस येथे राहणार्‍या सर्जियस मानका (३१) व स्टिनमातर सेबास्तियन (२५) या जर्मन नागरिकांकडून ६४ ग्रॅम एलएसडी ड्रग्स जप्त केले. या पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात ६४ लाख रुपये किंमत होते. ही कारवाई उत्तर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत चालली होती.

पेडणे पोलिस निरिक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले की, मागच्या ४ दिवसांपासून संशयितांकडे मोठ्या किंमतीचा ड्रग्स आहे. अशी माहिती मिळाली होती. मात्र त्या दोघांनी सी फॉर्म भरले नसल्याने ते नेमके कोणत्या गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्याला आहेत याची माहिती मिळत नव्हती. संशयित कोठे राहतात याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक संदेश चोडणकर, उपनिरिक्षक सागर धारकर, प्रसाद तुयेकर, प्रेमनाथ सावळदेसाई, संदीप गावडे, स्वप्नील शिरोडकर, अनिलकुमार पोळे, फोंडू गावस, शैलेश पार्सेकर, योगेश गावकर व ॐप्रकाश पाळणी या टीमने सापळा रचून दोघांनाही मुद्देमालासह पकडले. पोलिसांनी पंचासहीत झडती घेतली असता त्यांच्याकडे ६४ लाखांचा ड्रग्स सापडला. त्याशिवाय रोख रुपये २७५०० व मोबाईल जप्त करण्यात आले.

दरम्यान, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी या ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवून या ड्रग्सच्या विरोधात पेडणे पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
मागच्या २ महिन्यात हरमल किनारी भागात केंद्रीय अंमली विरोधी पथकाने अशीच धाड घालण्याचा प्रयत्न केला असता, त्या अधिकार्‍यांवर हल्ला करण्यात आला होता.
किनारी भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्स व्यवहार चालू असून जर या ड्रग्सच्या विरोधात मोहिम उघडताना स्थानिकांनी पाठिंबा दिला तर ड्रग्स मुक्त किनारा व्हायला मदत होवू शकते. अशी चर्चा आहे.