हत्तीरोग

0
1007

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

हत्तीरोग झाल्यावर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय आधुनिक शास्त्रात नाही म्हणून यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्यक ठरते. इ.स.१९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो.

लठ्ठ माणसाला बघितल्यावर किंवा भेटल्यावर पहिला विचार मनात येतो तो म्हणजे काय हे हत्तीसारखे शरीर किंबहुना बरेचजण हा शेरा मारूनही मोकळे होतात व ही लठ्ठ माणसे इतरांच्या हसण्याचेही कारण बनतात. असाच हत्तीसारखे पाय दिसणारा अजून एक व्याधी आहे आणि तो म्हणजे ‘श्लीपद किंवा हत्तीरोग’. हा रोग फक्त लठ्ठ माणसांनाच होतो असे मात्र अजिबात नाही.
‘शिलावत् पदं श्लीपदम्‌|’ आयुर्वेद शास्त्राप्रमाणे हळूहळू अतिकठीण, घन अशा स्वरूपाची सूज पायांवर येते. पाय दगडाप्रमाणे कठीण होतो. हा पाय शिळेप्रमाणे जड होतो म्हणून या व्याधीस ‘श्लीपद’ असे म्हणतात व व्यावहारिक भाषेत ‘हत्तीरोग’ असे म्हणतात.
हत्तीरोगाची कारणे –
* पावसाचे पाणी निचरा न होता पुष्कळ दिवसपर्यंत मोठ्या प्रमाणात साठून राहिल्यामुळे ज्या प्रदेशात दलदल असते अशा प्रदेशात राहणार्‍या लोकांना हत्तीरोग अधिक प्रमाणात होतो.
* जेथे सर्वच ऋतूत थंडीचे प्रमाण अधिक असते अशा ठिकाणी राहणार्‍या लोकांना अधिक प्रमाणात होतो.
* कफप्रकृती व कफकर आहार-विहार हेही हत्तीरोगाच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरतात. स्निग्ध-गुरु-शीत व मेद वाढविणार्‍या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन. दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ अतिप्रमाणात खाणे.
* अतिमात्रेत, अकाली आणि अहितकर असे भोजन करणे.
* भूक नसतानाही जिभेच्या चोचल्यासाठी आहाराचे सेवन करणे.
* आहारात पोषणांश योग्य प्रकारे नसणे.
* आहार पचलेला नसतानाही परत भोजन सेवन करणे.
* फळांचा दुधाबरोबर संयोग करून वारंवार खाणे – उदा. फ्रूटसॅलाड, केळाचे शिकरण, विविध मिल्कशेक इ.
* व्यायाम न करणे.
* दिवसा झोपणे, जेवल्यावर लगेच झोपणे.
कफकर आहार-विहाराने कफप्रधान दोष प्रकूपित होऊन रसवाहिन्यातून अधोगामी होतात आणि वंक्षण, उरू, जानू, जंघा, पिंडिका यामध्ये क्रमाक्रमाने संचित होत जातात. वंक्षणापासून उत्पन्न होऊन क्रमशः अधोभागी पायाकडे पसरत जाणार्‍या या रोगात रक्तदुष्टी असते. मांस व मेदाच्या आश्रयाने सूज उत्पन्न होते. ही सूज घन, निबिड, स्थिर असून सुरुवातीला ताप हे लक्षणही आढळते. हा ताप थंडी वाजून व विसर्गी आणि रात्रीबली असतो.
कफाधिक्याशिवाय हत्तीरोगाची उत्पत्तीच होऊ शकत नाही कारण गौरव, स्थिरत्व व वृद्धी ही लक्षणे कफाशिवाय उत्पन्नच होऊ शकत नाही.
हत्तीरोगाची लक्षणे –
हत्तीरोग हा तीन प्रकारचा असतो- वातज, पित्तज, कफज.
* वातज ः यामध्ये सूज ही कृष्णवर्णी, रूक्ष, स्फुरीत, तीव्र वेदनायुक्त व अकारण पीडा त्यात असते. यामध्ये प्राथमिकतः ताप हे लक्षण मिळते.
* पित्तज ः सूज पीतवर्णी, दाहज्वरयुक्त व स्पर्शाला पाय काहीसे मृदू.
* कफज ः स्निग्ध, श्‍वेतवर्णी किंवा पांडुवर्णी, गुरू आणि स्थिर असतो.
सामान्य चिकित्सा व उपचार –
हत्तीरोगामध्ये लंघन, कटू-तीक्ष्ण द्रव्यांनी लेपन, स्वेदन, विरेचन, रक्तमोक्षण व अन्य कफघ्न – उष्ण गुणात्मक उपचार करावे. सिरादुष्टी व कफप्रधानता लक्षात घेऊन हे सर्व उपचार योग्य ठरतात. स्रोतस शोधन व स्वेदन ही व्याधीप्रत्यनिक म्हणून ओळखली जाणारी चिकित्सा आहे.
लंघन – औषधोपचारामध्ये लंघन म्हणजे उपवास करणे. मर्यादित आहार, पचण्यास हलका असा आहार सेवन करणे. नुसत्या लाह्या किंवा मुगाचे कढण किंवा सूप व गरम पाणी सेवन करून काही दिवस राहिल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
कटू-तीक्ष्ण द्रव्यांनी लेपन – लेपनासाठी जे विविध कल्प वापरले जातात त्यात जितसाया व कुक्कुटनखी यांचा लेप करणे अधिक लाभदायी ठरते. कुक्कुटनखीचा आभ्यंतर उपयोगही चांगला होतो. कुक्कुटनखी उगाळून तयार होणारे गंध १ चमचा. अगर कुक्कुटनखी गुग्गुळ ५०० मि.ग्रॅ. ३ वेळा दिवसातून देणे आवश्यक असते. शेवगा, एरंड व पुनर्नवा यांचा लेपही उपयुक्त ठरतो.
स्वेदन – स्वेदनामध्ये उपनाह व तापस्वेद हे प्रामुख्याने वापरले जाते. एरंड, रुई, पुनर्नवा, वरुण यासारख्या वनस्पतींच्या पानांनी शेक दिल्यास सूज कमी होते.
विरेचन – वारंवार विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध या व्याधीत उपयुक्त ठरते. यामध्ये एरंडेल, गंधर्व हरीतकी, अभयारिष्ट, आरग्वध, कपिला वटी, अभयादि मोदक यासारख्या औषधांनी विरेचन घ्यावं. गोमूत्र एरंड तेलाबरोबर घेतल्यास विशेष फायदा होतो.
रक्तमोक्षण – यामध्ये रक्तमोक्षणाचा खूप चांगला फायदा होतो. शक्यतो लिरावेध पद्धतीने कुशल वैद्याकडून रक्तमोक्षण करून घ्यावे. वातज श्लीपदामध्ये गुल्फप्रदेशाच्या वर ४ अंगुले येथून सिराव्यध करून रक्तमोक्षण करावे व पित्तज मध्ये गुल्फाच्या खाली असणार्‍या सिरेतून रक्तमोक्षण करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. रक्तमोक्षणासाठी जळवांचा वापरही करता येतो. जळवा वारंवार लावाव्या लागतात. रक्तमोक्षणाने सूज कमी होते. अनेक रुग्णांमध्ये औषधोपचाराबरोबर विरेचन व रक्तमोक्षण केल्याने हत्तीरोग बरा होतो.
औषधी द्रव्ये – औषधी द्रव्यांमध्ये शिलाजतु, गुग्गुळ, गोमूत्र, हरीतकी, गुडूची, कण्हेर, करंज, दारुहरिद्र, एरंड, शिग्रु, वरुण, पुनर्नवा, टेंदू, दशमूल, देवदार, चित्रक, मोहरी, धत्तुर, निर्गुडी, इ.चा वापर केला जातो.
आहारीय द्रव्ये – जुने शालिषष्टीक, यव, हुलगे, पडवळ, लसूण, शेवगा, कारली, पुनर्नवा हे विशेष पथ्यकर पदार्थ आहेत. जांगल मांस स्नेहविरहित वापरावे. कुळिथाचं कढण, मुगाचे कढण, शेवग्याच्या शेंगा अधूनमधून उकडून खाण्यास द्याव्या. पावसाळ्यात पुनर्नवाची भाजी विशेष करून खाण्यास द्यावी. नागरमोथा व सुंठ याने सिद्ध केलेलं पाणी दिवसभर पिण्यास द्यावे. यामुळे सूज कमी होते आणि अधूनमधून येणारा तापही निघून जातो. शरीरास हलकेपणा येण्यास मदत होते.
अपथ्य – पिष्टमय पदार्थ, दूध व दुधाचे पदार्थ, गूळ, मांस, मधुर – अम्ल रसांची द्रव्ये, पिच्छिल-गुरु-अभिष्यांदि पदार्थ, दलदलीच्या प्रदेशात राहणे हे हत्तीरोगामध्ये विशेष अपथ्यकर होय.
आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार –
अर्वाचीन दृष्टीने हत्तीरोगास फायलेरियासिस किंवा एलिफंटासिस असे म्हटले जाते. याचे प्रधान कारण फायलेरिया बॅक्रॉफ्ट्‌स नामक कृमी जे क्युलेक्स फेलिंगन्स नावाच्या डासांद्वारे प्रसारित होतात.
कृमी हे रुग्णाच्या लसवाहिन्यात वास्तव्य करतात. स्त्रीकृमीकडून अनेक वर्षेपर्यंत मायक्रोफायलेरिया उत्पन्न होत राहतात.
या कृमींची एक विशेषता आहे. हे कृमी दिवसा परिसरीय रक्तात असत नाही. सायंकाळी हे परिसरीय रक्तात येण्यास सुरुवात करतात व मध्यरात्रीपर्यंत परिसरीय रक्तातून त्यांचे प्रमाण कमी होऊ लागते. सकाळपर्यंत ते परिसरीय रक्तातून पूर्णपणे नाहीसे होतात. यासाठीच कृमींना निशाचर कृमी असे म्हटले जाते. म्हणूनच या रोगात रात्री ज्वरवेग येतो.
हत्तीरोग झाल्यावर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय आधुनिक शास्त्रात नाही म्हणून यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्यक ठरते.
इ.स. १९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तामिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक इ. राज्यांत आढळतो.
५ ऑगस्ट हा हत्तीरोग दिन म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.