हकालपट्टी

0
102

सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्या हकालपट्टीचा ठराव अखेर कॉंग्रेस कार्यकारिणीने संमत केला. बाबूश यांची तडकाफडकी हकालपट्टी केली जाईल असे सांगतानाच, त्यांना पुन्हा कधीही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णयही पक्षाने घेतला आहे. मात्र, गोव्यातील सत्तेच्या संधिसाधू राजकारणामध्ये या दुसर्‍या मुद्द्याला चिकटून राहणे कॉंग्रेसला जमणार आहे का आणि खरे तर परवडणारे आहे का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मोन्सेर्रात यांनी आपल्या पक्षाच्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवाराविरुद्ध उघडउघड भूमिका घेतली होती. आपण सुरेंद्र फुर्तादोंसाठी काम करणार नाही असे त्यांनी जाहीरपणे सुनावले होते. दोन वेळा आपला विश्वासघात केलेल्या फुर्तादोंच्या पाडावासाठी आपण वावरू असे त्यांनी पक्ष निरीक्षक चेल्लाकुमार यांना तोंडावर सुनावले होते. त्यामुळे अशी जाहीर भूमिका घेणारी व्यक्ती आपल्यावर कारवाई होणार हे गृहितच धरील हे उघड आहे. त्यामुळे कॉंग्रेसने कारवाईचा वार करताच आपण आता स्वतंत्र झालो आहोत असे सांगत प्रादेशिक पक्षाचा विचारही बाबूश यांनी बोलून दाखवला आहे. आधीच जर्जर झालेल्या कॉंग्रेसला बाबूश यांचे हे बंड बरेच जड जाऊ शकते, परंतु पक्षात किमान शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करणे आवश्यक ठरले होते. लवकरच दाबोळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांच्यावरही कारवाईचा बडगा पक्षाला अपरिहार्यपणे उगारावा लागणार आहे, कारण गुदिन्होही गेल्या बराच काळापासून स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याप्रमाणेच वागत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी काम केले नव्हते. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आल्यावर जॉन फर्नांडिस यांनी पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांवर कठोर कारवाईचे संकेत देत नोटिसा वगैरे बजावल्या होत्या. परंतु त्यांचे ते प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे अजून पडून आहेत. उलट जॉन यांचीच त्या पदावरून हकालपट्टी झाली. आता लुईझिन फालेरो यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्वतःची पुनर्बांधणी करण्यासाठी धडपडतो आहे. अगदी बुथ पातळीपासून संघटन उभारणे, तेही पक्षाची राज्यात सत्ता नसताना आणि संपूर्ण देशात पक्षाची धूळधाण उडालेली असताना आणि पक्ष जवळजवळ निर्नायकी स्थितीत असताना हे करणे फार अवघड आहे. त्यात पक्षाच्या दहा नेत्यांची तोंडे दहा दिशांना आहेत. दोन आमदार सरळसरळ फुटीर झाले आहेत आणि आणखी काहीजणही मनाने दूर गेले आहेत. या परिस्थितीत बाबूश किंवा मावीन यांच्यावरील कारवाई ही कागदोपत्री आदर्शवत जरी वाटली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर पक्षाला तापदायकच ठरणार आहे. बाबूश यांच्या फारकतीचा पहिला परिणाम दिसेल तो लवकरच होणार्‍या पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत. बाबुश यांच्या पाठिंब्यानिशी सुरेंद्र फुर्तादो गेल्यावेळी महापौर बनले, परंतु बाबुश यांच्याशी त्यांचे बिनसले. फुर्तादो यांनी आतापावेतो भाजपप्रणित गट आणि बाबूशप्रणित गट या दोघांचाही पाठिंबा गमावलेला आहे. भाजप व बाबुश यांच्या दोन्ही गटांपाशी प्रत्येकी चौदा नगरसेवक आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत बाबुश सरळ भाजपच्या महापौराच्या उमेदवारास पाठिंबा देतील असे सध्याच्या राजकारणावरून दिसते. त्यांचे आणि पर्रीकरांचे संधान जगजाहीर आहे आणि महापौरपदाच्या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय येईल. या निवडणुकीचे सोडा, पण या भस्मासुरापासून दूर राहण्यातच भाजपचे खरे हित आहे. कॉंग्रेसला जर आपले पक्षसंघटन पुन्हा बळकट बनवायचे असेल, तर जुनी खोडे बाजूला सारून नव्या दमाच्या नव्या चेहर्‍यांना पुढे आणणे हाच एकमेव उपाय आहे. त्या दिशेने काही पावले टाकली गेली आहेत. ऍड. यतीश नाईक, सुनील कवठणकर, दुर्गादास कामत यांच्यासारख्या तरुणांना पक्षामध्ये अधिक वाव दिला गेला पाहिजे. त्यांच्यामागे कार्यकर्ते आहेत. यतीश, सुनील यांच्यापाशी नेत्याला लागणारे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी तरुणाईला उत्तेजन हाच एकमेव मार्ग आहे. पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना पुन्हा निवडणुका आल्या की जवळ बोलवायचे, दादापुता करून पक्षात घ्यायचे आणि मग ते इमान राखत नाहीत म्हणून गळा काढायचा हा तमाशा आता थांबायला हवा.