स्वैराचाराने व्यक्ती आणि समाजाचेही नुकसान

0
354

आपल्या आचार-विचारांवर नियंत्रण राखण्यासाठी धर्माने अनेक नीतीमूल्यांची योजना केली आहे. विविध धर्मांतील अनेक अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा सुधारणेच्या प्रवाहात नष्ट झाल्या. त्याला पुढे कायद्याचे स्वरुप आले. मात्र आज अंमली पदार्थाचे सेवन, जुगार, अनैतिक संबंध, भ्रष्टाचार, महिलांशी दुर्व्यवहार करून आधुनिकतेच्या नावाखाली स्वैराचाराला प्रोत्साहन देत नीतीमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पती-पत्नीचे नाते हे पवित्र मानले जाते. हे नाते टिकते, वृद्धिंगत होते ते भावनिक गुंतवणुकीबरोबर, एकमेकांच्या दृढ विश्‍वासावर. यातील जोडीदाराने आपल्या संसारात स्वैराचाराला थारा दिला तर नात्यामध्ये निश्‍चितच दुरावा निर्माण होतो. विवाहबाह्य संबंध हा पती-पत्नीमधील पवित्र नात्याचे थडगे उभारण्यास कारणीभूत ठरणारा मोठा स्वैराचार आहे. शासनाने स्वैराचार रोखण्यासाठी अनेक कडक कायदे केले, परंतु आज समाज स्वैराचाराच्या अधीन होत आहे. अशा वेळी आपल्या धर्मातील नीतीमूल्ये आपल्याला समाजाप्रती कर्तव्याची जाणीव करून देतात. नीतीमूल्ये कधीही कालबाह्य होत नाहीत. त्यामुळे केवळ घटनेला धर्मग्रंथ माना, हे म्हणणे एकवार सोपे असले तरी नीतीमूल्यांअभावी मनुष्याचे जीवन पशुतुल्य आहे. घटनेने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. जुने ते सगळेच वाईट आणि नवे ते सगळेच चांगले म्हणण्याला काहीच अर्थ नाही. सार्वजनिक ठिकाणी धर्मग्रंथांच्या नावाने कंठशोष करून पुरोगामी म्हणून मिरवणे सोपे असले तरी वैयक्तिक आयुष्यात पुरोगामित्वाचे श्राद्धच घातले जाते, कारण त्यावेळी त्यांची कौटुंबिक कर्तव्ये आड येतात. अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर, आगरकर, हमीद दलवाई यांनी धर्मग्रंथांची चिकित्सा करून काळानुसार त्यातील शास्त्र गैरलागू असल्याचे परखड मत मांडले आणि खाजगी आयुष्यातही त्यांनी तितक्याच हिंमतीने पाळले.
भारतीय समाजाला स्वैराचार मुळीच मान्य नाही. कारण त्याचे दुष्परिणाम हे भयानक असतात. अनैतिक संबंधातून समाजावर आजवर अनेकांचे खून पडले आहेत. त्यात कोवळ्या मुलांचाही हकनाक बळी जातो. अनैतिक संबंधातून पतीने प्रेयसीच्या साथीने पत्नीचा तर पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा काटा काढल्याच्या घटना घडत असतात. जर पतीने अथवा पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेवले आणि याला कंटाळून जोडीदाराने आत्महत्या केली तर तेव्हा उत्तरदायी ठरवून त्या पतीला अथवा पत्नीला शिक्षा होऊ शकते. एरव्ही या विवाहबाह्य संबंधाला घटस्फोट देऊन तिलांजली देता येते. एकाने आत्महत्या आणि दुसर्‍याला शिक्षा अशा घटनांमध्ये त्यांची मुले आईबापाविना पोरकी होऊन परिणामी संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. विदेशात अनेक विवाह होतात, घटस्फोट होतात मुले मातापित्यापासून वेगळी होतात. यातून तिथे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे.
आपल्याकडे सिने कलाकार, खेळाडू यांचे अनुकरण करण्याचे मोठे फॅड आले आहे. हे लोक कपडे बदलतात तसे जोडीदार बदलतात. एलिझाबेथ टेलर या हॉलिवुड अभिनेत्रीने आठ विवाह करून या बाबतीत एक महान आदर्श ठेवला होता. आता तर विवाह एक काटेरी बंधन आहे अशा समजुतीने लग्न न करता एकत्रित राहणे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या गोंडस नावाखाली हा प्रकार चालू आहे. ज्यांना संसारात तडजोड नको, बंधने नकोत, एकत्रित कुटुंबाचा वारसा नको, मन रमेल तोपर्यंत एकत्रित रहायचे यातील अनेक जोड्यांमधील जोडीदार नाते तुटल्यानंतर वैफल्यग्रस्त होऊन मानसिक रुग्ण बनतात, तर मुलांचे भवितव्य दिशाहीन बनते.
विवाहसंस्थेच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्थेला एक सातत्य आणि बळकटी प्राप्त झाली आहे. विवाहसंस्था ही निसर्गनिर्मित नसली तरी सुसंस्कारित पिढी घडविण्याबरोबरच समाजस्वास्थ्य वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून श्‍वेतकेशू या ऋषिंनी पहिल्यांदा अंमलात आणली. विवाह संस्कार हा आपल्या सोळा संस्कारांतील महत्त्वाचा संस्कार आहे. तो मनुष्याला परिपूर्ण बनण्याचा संस्कार मानला जातो. विवाह संस्कारात व्यक्तिगत आणि सामाजिक असे दोन्ही पैलू महत्त्वाचे असतात. त्यासाठी पती-पत्नीमध्ये सामंजस्याचे अलिखित नियम असतात. पती-पत्नीने वैयक्तिक हिताबरोबर परस्पर सहकार्याने एकमेकांच्या आणि कुटुंबाच्या सुखदुःखांना धैर्याने सामोरे जाणे, प्रत्येकाच्या गरजा, सगळ्यांना मिळणारे फायदे, अनेकांनी प्रामाणिकपणे स्वीकारलेले एकमेकांचे उत्तरदायित्त्व, सुखदुःख वाटून घेणे हे कुटुंबपद्धतीचे मोठे योगदान आहे. कुठलेही आव्हान, ताण, धक्के यांना सामोरे जाण्यासाठी एका व्यक्तीपेक्षा एका कुटुंबाची क्षमता असते. विवाहसंस्था असूनही वेश्याव्यवसायाला लगाम बसला नाही असा एक सूर नेहमी ऐकू येतो, मात्र एका गोष्टीचे दोष काढायचे झाले तर त्यातील गुण बाजूला राहतात. विवाहसंस्थेचे अनेक लाभ डोळ्यांआड करता येत नाहीत. विवाहसंस्थेची कल्पनाच मुळी स्वैराचाराला लगाम घालण्यासाठी आहे. विवाह म्हणजे मैत्र, साहचर्यातून सुरक्षितता, त्यातून विश्‍वास हा स्त्री-पुरुषांना आवश्यक असतो. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके असतात असे म्हणतात, कारण त्याशिवाय ही गाडी पुढे रेटू शकणार नाही. कुटुंबसंस्थेची निकोप वाढ व्हावी, समाजाचे अस्तित्व टिकणे, त्यातून सुप्रजा निर्माण व्हावी यासाठी विवाहसंस्था आवश्यक आहे. समाजात जसे कडक कायदे आवश्यक आहेत तसे ते पारदर्शकपणे अंमलात आणण्यासाठी व्यक्तीमध्ये तशी प्रामाणिक वृत्ती हवी. स्त्रियांवरचे अत्याचार रोखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले. त्यात वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा घडवून आणल्या गेल्या. मात्र अत्याचार थांबले नाहीत. गुन्हे सर्वस्वी कायद्याने कमी होत नाहीत. त्यात मानवी वृत्ती आड येते. विवाह म्हणजे स्त्रीने पुरुषाची गुलाम बनणे आणि कुटुंबासाठी आपल्या स्वातंत्र्याची कबर बांधणे, मंगळसूत्र हे विवाहित स्त्रियांना बंधनात अडकवणारे गुलामीचे प्रतीक असल्याचे द्योतक समजून ‘मंगळसूत्र हटाव’ सारख्या मोहिमा उभारल्या जातात. विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व समजून न घेता विवाहसंस्थेला विरोध ही बाब आता स्त्री-मुक्तीवाल्याचे प्रखर हत्यार बनले आहे. त्यामुळेच नव्या पिढीत आता विवाहाला पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन म्हणजेच ‘लीव्ह इन रिलेशनशीप’ ही गोंडस संकल्पना अस्तित्वात आली. कुटुंबव्यवस्थेला दोष देऊन महिलांचे प्रश्‍न सुटणारे नाहीत. आज जे ताणतणाव समाजात दिसतात ते कुटुंबव्यवस्थेचे दुष्परिणाम निश्‍चितच नाहीत. आज कुटुंबव्यवस्था खिळखिळ झाली आहे. घरातल्या माणसांमध्ये मेळ राहिलेला नाही. हा परिणाम आहे कुटुंबव्यवस्था नावाचा भला मोठा आधारवड तुटून जाण्याचा. स्त्री-पुरुषांनी या संस्काराच्या तारेवरून चालताना तोल राखून चालत राहणे आवश्यक असते. दोघांचीही एकमेकांवर नुस्ती कुरघोडी, ही कुठल्याही मुक्तीची चळवळ यशस्वी करण्यासाठीची धोंड ठरते. आजच्या आधुनिक युगात महिलांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. स्त्री विरुद्ध पुरुष या मानसिकतेने समाजाचे गाडे पुढे ढकलू शकत नाही, तर स्त्री आणि पुरूष मिळूनच समाजातील अनेक समस्यांचे निवारण होऊन समाजस्वास्थ्य टिकून राहील. स्वैराचार हे स्वातंत्र्याचे द्योतक नसून त्याचा परिणाम अखेर मनुष्याला अधोगतीकडेच नेतो.