स्वीडनची २४ वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत धडक

0
108

>> स्वित्झर्लंडवर १-० अशी मात

एमिल फोर्सबर्गने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर रोमहर्षक झालेल्या लढतीत स्वीडनने स्वित्झर्लंडचा १-० असा पराभव करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची २४ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली. ते १९९४नंतर प्रथम अंतिम आठ संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झाले.

दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर दिला होता. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पहिल्या सत्रात त्यांना गोलकोंडी सोडविता आली नव्हती. त्यातच दोघांचीही बचाफळी भक्कम असल्याने पहिल्या सत्रात काही चांगल्या संधी मिळूनही त्यांना गोलफलक कोराच राहिला होता. दोन्ही संघ विश्वचषक किंवा युरो कपसारख्या मोठ्या स्पर्धांत पहिल्यांदाच समोरासमोर ठाकले होते.

दुसर्‍या सत्रात ६६व्या मिनिटाला एमिल फोर्सबर्गने नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर स्वीडनने उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला. टोईवोनेनकडून मिळालेल्या पासवर फोर्सबर्गने डाव्या विंगेतून मुसंडी मारत उजव्या पायाच्या घेतलेल्या फटक्यावरील चेंडू स्वित्झर्लंडच्या अकांजीच्या पायाला लागून थेट चेंडू जाळीत जाऊन विसावला. गोलरक्षक जाळीत जाणार्‍या चेंडूकडे पाहाण्यापलिकडे काहीच करू शकला नाही.

१९५८ साली उपविजेता राहिलेल्या स्वीडनला १९९४मध्ये तृतीय स्थान प्राप्त झाले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांना अंतिम सोळाचा अडथळा पार करता आला नव्हता. कालचा सामना हा त्यांचा विश्वचषकातील ५०वा सामना ठरला. हा टप्पा गाठणारा तो ११वा संघ ठरला. तर स्वित्झर्लंडला अजून बाद फेरीत विजय मिळविता आलेला नाही.