स्वीकारा मुलांना आहेत तशी!

0
433

– म. कृ. पाटील
मानवाच्या नातेसंबंधात माधुर्य, गोडवा हवा. आपल्या आचार-विचाराने, बोलण्याने दुसरा उद्विग्न बनणार नाही, त्याची मनःस्थिती बिघडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याला प्रेमाची, आपलेपणाची अनुभूती येईल असे आपले दैनंदिन जीवनातील वागणे, बोलणे, मुद्राभिनय आणि देहबोली हवी. आपल्या वागण्यात नम्रता आणणे खूप गरजेचे आहे.
‘मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकूड फोडू नये’, ‘नम्रतेनं नराचा नारायण होतो, नम्रतेनं दानवाचा मानव बनता येतं.’ पण आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक नातेसंबंधात मधुरता, ऐक्यता, ममता, सहृदयता फारच कमी ठिकाणी पाहायला मिळते. मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचे नाते म्हणजे माता, पिता आणि मुलं. परंतु या जिव्हाळ्याच्या नात्यातही निकोपता पाहायला मिळणे दुर्मीळ झाले आहे.
मुले ही अवखळ, खट्याळ, द्वाड असतात. ती बालिश पण हुशार असतात. आईबापाचं सांगणं ऐकणारी, त्यांच्या आज्ञेनुसार वागणारी, आईवडिलांच्या नजरेची भाषा जाणणारी असतात. ती थोडी मोठी झाली की आईवडिलांपाशी आपुलकीने जवळ न येता थोडे अंतर ठेवून, खाली मान घालून उभी राहतात. ती चुकांतून शिकत असतात. कधीकधी घरात, शाळेत, नातेवाइकांकडे अनवधानाने नकळत त्यांच्याकडून चुका होतात. मुलांकडे अनुभवाची आणि कौशल्याची कमतरता असते. ही कमतरताच मुलांनी स्वतःची स्वतः भरायला शिकायचे असते. पण प्रत्यक्षात घडते ते वेगळेच. मुलांकडून चुका झाल्या तर आईवडिलांचा हात वर उठतो. डोळे वटारले जातात. कधी अपशब्दांचा माराही त्यांच्यावर केला जातो. कधीकधी पै-पाहुणे, नातलग, मित्रांसमोरही त्यांना खूप अपमानास्पद बोलणं ऐकून घ्यावं लागतं. आपुलकीचे, माया-ममतेचे चार शब्द ऐकायला मिळतील, चूक झाली तर सांभाळून घेतील, पाणउतारा न करता सांत्वन करतील, अशा अपेक्षेने ती साश्रू नयनांनी पालकांकडे टक लावून पाहतात. ते न मिळाल्याने त्यांचा इतरांसमोर अपेक्षाभंग होतो. मग मातापित्यावर मनातल्या मनात दातओठ खात त्यांच्याकडून अपेक्षाभंगाचा राग व्यक्त केला जातो.
मुलांच्या आणि पालकांच्या आचार-विचारांतून प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात. कधी प्रतिसाद क्रियाही कार्यरत होत असते. तसे पाहिले तर दोन्हीही क्रिया म्हणजे प्रतिउत्तरेच आहेत. घरातील, शाळेतील, समाजातील एखाद्या घटनेची, प्रसंगाची, कारणाची क्षणकालिक कृती आणि थोड्या कालावधीने दर्शविलेली वृत्ती. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे त्वरित रिफ्लॅक्शन. तेथे विचार करायला वाव, संधी अजिबात नाही. आधी सर्वकाही करून मोकळे व्हायचे, मग सारासार विवेकबुद्धीने विचार करावयाचा. प्रतिक्षिप्त क्रिया अनेकदा बचावात्मक पवित्र्यात स्वरक्षणार्थ आपोआप घडते. कधी बचावात्मक पवित्रा, तर कधी आक्रमक हल्ला ही क्रिया निमिषार्धात घडते. घरात मुलांकडून, पालकांकडून, वडीलधार्‍यांकडून अशा क्रिया घडत असतात. जिवाला धोका निर्माण करणार्‍या क्षणामध्ये मानवी शरीरात ज्या क्रिया घडतात त्या प्रतिक्षिप्त क्रिया.
प्रतिसादाचे तंत्र मात्र वेगळे आहे. प्रतिसाद देताना वेळ आणि घटना, प्रसंगाला महत्त्व असते. समोर घडलेल्या कृतीचा, कानांवर पडलेल्या शब्दांचा पूर्णपणे परामर्श घेत, त्यातील गूढार्थ, गर्भितार्थ, मथितार्थ जाणून घेऊन, योजना आखून ठरवून केलेली क्रिया म्हणजे प्रतिसाद. बुद्धिबळातील डावपेच म्हणजेच प्रतिसाद. माणसाला सुखी, समृद्ध आयुष्य जगावयाचे तर प्रतिसाद सक्षम आणि सविचारी असायला हवा. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे प्रतिसाद नव्हे!
दैनंदिन जीवन जगताना तारतम्य आणि ताळतंत्र सुटते तेव्हा प्रत्येक माणसाचे भान हरपते. शब्द चुकीचे वापरले जातात. अपशब्दांचा ओघ लागतो. हात उचलला जातो. सर्वांग थरथरायला लागते. आदळआपटही होते आणि मस्करीची कुस्करीही होते. प्रतिसादामध्ये सकारात्मक गुणवत्ता वाढीस लागली पाहिजे. संयम, सहनशीलताही आवश्यक असते. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करताना थोडा विचार करण्याची गरज आहे. रागाला डोळे नसतात, राग आला तर शंभरपर्यंत अंक मोजा असे वडीलधारी मंडळी म्हणूनच सांगत असते. रागाचा पारा शून्यावर स्थिर झाला की सकारात्मक विचार, विधायक दृष्टिकोन आचरणात आणता येतो. सक्षम विचाराने केलेली कृती ही क्षणैक प्रतिउत्तरापेक्षा अधिक लाभदायी ठरते. प्रत्येक व्यक्तीपाशी तीन व्यक्तिमत्त्वे सुप्तावस्थेत नांदत असतात. नित्य प्रकट होणारे एक रूप, दुसरेत्या व्यक्तीचे खरेखुरे रूप आणि तिसरे त्या व्यक्तीला वाटते ते सत्य रूप. व्यक्ती आपले सत्य रूप घरात, समाजात किंवा कार्यालयात कधीच प्रकट करत नाही हे अढळ सत्य आहे. वातावरण, सोयीसुविधा, सामाजिक दर्जा, आर्थिक स्थिती… यावेळीही व्यक्तीचे सत्य स्वरूप प्रकट होत नाही.
मुलं अनुकरणप्रिय असतात. प्रामाणिक असतात. त्यांना खरं बोलायचं असतं. मुलांच्या संस्कारक्षम कोवळ्या मनावर चटकन परिणाम होतो. मुलं फारच हळवी असतात. पण घरातील वातावरणात वाढत असताना खोटं बोलतोस, फसवतोस, लबाडी करतोस अशी कितीतरी पराकोटीची गुणवैशिष्ट्ये त्यांना संबोधून उच्चारली जातात. आपलं काय चुकलं हेच मुलांना समजत नाही. आपले आईवडील आज असे का वागतात याचा त्यांना उलगडाच होत नाही. प्रतिसाद न देता, भोळाभाबडा चेहरा करून ती पालकांकडे बघतच राहतात. प्रत्येक घरात स्वतःच्या मुलांबद्दल त्याच तक्रारी, तीच गार्‍हाणी, तीच कुरबुर सतत चाललेली असते. भोजनसमयी, अभ्यासाच्या वेळी, खेळायच्या वेळी, बाहेरील व्यवहारी जगात वावरताना याच गोष्टीचा सारखा ऊहापोह होत असतो.
घरातील एखाद्या छोट्या प्रसंगातही कधीतरी मुलांकडून नकळत चूक होते. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असते. मुलं चुका करतच शिकत असतात. अनुभव आणि कौशल्य संपादन स्वतःच स्वतःला शिकवायचं असतं. झालेली चूक भाबडेपणाने ती मान्यही करतात. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र तयार होते. मुलांकडून चुका झाल्यावर पालकांचा (माता-पिता) सरळ हात वर उठतो. काही पालक अर्वाच्य शब्दही उच्चारतात. इतरांसमोर त्यांना अपमानास्पद बोलले जाते. यावेळी मुलांच्या भावभावना कुणीही समजून घेत नाही. मुलं सांगायचा अटोकाट प्रयत्न करतात, पण त्याचं ऐकण्याचं भानच कुणाला नसतं. अभ्यास, खेळ, दूरदर्शन, भोजन आदी गोष्टींवरून त्यांच्यावर सतत नकारात्मक शब्द आणि विचारांचा मारा होत असतो. समजा अथवा कल्पना करा, पती-पत्नीमध्ये असाच विसंवाद चालला आहे. अशावेळी पतीचा अगर पत्नीचा हात जरासा वर उचलला गेला तर एकमेकांना काय वाटेल? दोघांनाही चीड, संताप येणार नाही का? एकमेकांबद्दल त्यांना यत्किंचितही आदर राहणार नाही. आपली कदर केली जात नाही असेच त्यांना वाटेल. कितीतरी भावनांचा कल्लोळ मनात दाटेल… मग स्वतःच्या मुलांच्या बाबतीत वेगळा न्याय का? भौतिक साधनांचे मूल्य मुलांच्या जीवनापेक्षा जास्त आहे का? भौतिक साधने मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, बौद्धिक आणि भावनिक विकासासाठीच वापरली जातात. अशावेळी संयम, सबुरी आणि सहनशीलतेने मुलांशी सुसंवाद साधून, त्यांच्या स्वाभिमानाला न दुखवता कोणताही प्रसंग हाताळायला हवा याचे भान पालकांनी सातत्याने ठेवायला हवे.
आईवडिलांची इच्छा असते की मुलांनी शारीरिकदृष्ट्या सशक्त, निरोगी असावं. काही वेळा त्यांना भीती दाखवून, मारूनही भरवलं जातं. मुलांना अभ्यासात कशाचीही उणीव तथा कमतरता भासू नये यासाठी पालक सर्वतोपरी जागृत राहून प्रयत्न करीत असतात. त्यांना चांगल्या नावाजलेल्या क्लासला घालणे, स्वतःही त्यांच्याबरोबर बसून, जागून अभ्यासाला वेळ देणे याद्वारे ते बौद्धिकदृष्ट्या मुलांना सक्षम करू इच्छितात. परंतु त्यांच्या भावना जाणून घेऊन भावनिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता प्रयत्न फारसे केले जात नाहीत. एकदा रस्त्यावरून जात असताना एका मुलाच्या हातून दप्तर पडलं. सकाळची घाईगडबडीची वेळ. वडिलांना ऑफिसची घाई. त्याला त्याच्या गतीनं न नेता ते खेचून घेऊन चालले होते. दप्तर पडल्यामुळे सर्वांसमोर वडिलांनी मुलाच्या थोबाडीत मारलं. मुलाचे ओठ थरथरू लागले. भयाने तो काही बोलू शकला नाही. तरीही वडिलांनी खेचत शाळेत पोहोचवले. ही आहे प्रतिक्षिप्त क्रिया. यामुळे मुलाच्या भावना दुखावल्या याची जाणीवही नव्हती. अशा घटना सातत्याने आपल्या आजूबाजूला घडत असतात.
अभ्यासासाठी मुलांमागे ससेमिरा लागलेला असतो. चांगले गुण, श्रेणी, दर्जा मिळाला की चांगली नोकरी मिळते, याचे बाळकडू बालपणापासूनच मुलांना पाजले जाते, मनावर बिंबवले जाते. नोकरी लागल्यावर पुन्हा त्या विविध परीक्षांचं गुणपत्रक कधी उघडून पाहिलं जात नाही. परीक्षेचं गुणपत्रक फक्त उच्च शिक्षण आणि नोकरी एवढ्यापुरतंच मर्यादित. सुरुवातीला मुलांकडून काही चूक झाली तर ती आपल्या वडिलांना भाबडेपणाने सांगतात. पालक त्यांच्यावर रागावतात, त्यांना फटकारतात. काही वेळा मारतातही. पालकांकडे खरेखुरे सांगितले की बोलणी खावी लागते, अपमान सहन करावा लागतो हे समजल्यावर खरे सांगणे ती लपवतात. खोटे सांगतात.
मुलं दहा वर्षांची होईपर्यंत शाळेत शिकताना, खेळताना काय घडले ते अगदी उमेदीने सांगतात. पण पुढे ती आईवडिलांजवळ न येता थोड्याशा अंतरावर उभे राहून त्रोटक बोलू लागतात. येथूनच बालक-पालक नात्यातील विसंवादाला सुरुवात होते. तीच वृत्ती पुढे कायम ठेवीत ही मुले आचरण करतात. त्यामुळे पालकांनीच ठरवायचं असतं, आपल्यासमोर खरं, सत्य बोलणं चांगलं की लपवणं? मुलांना खरेखुरे बोलायला प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांमध्ये सत्य ऐकण्याची शक्ती आणि संयम असणे गरजेचे आहे. मुलांनी सांगितलेले सत्य पचवून आनंदाने, प्रेमाने त्यांना समजावलं पाहिजे.
मूल हाताबाहेर गेलं तर पालक खूपच अस्वस्थ होऊन जातात. वडिलांच्या चेहर्‍यावर राग, तिरस्कार, घृणा यांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते. प्रतिष्ठित समाजातही त्यांची पत एकदम खालावते. आपण कमावलेलं मुलाने धुळीला मिळवलं असं त्यांना वाटू लागतं. मुलंही जाणूनबुजून तसं वागतात. पालकांनी मला सतत अपमानित केलं. थोड्या थोड्या बाबीवरून खूप ओरडतात. कितीही चांगलं वागण्याचा, करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना चांगलं न वाटता फक्त वाईटच दिसतं. मी सांगितलेलं, घेतलेला निर्णय त्यांना कधीच आवडत नाही, असंच त्यांना वाटायला लागतं.
पालकांनी संस्कारक्षम वयातच आपल्या मुलांना समजावणं, त्यांच्या आवडी-निवडी जपणं आवश्यक असतं. त्यांच्यातील सुप्त गुण हेरणं, त्यांच्यातील कला, खेळ आदी वृत्तींना सकारात्मक आणि विधायक वळण लावणं गरजेचं असतं. आपली मुलं ही आपलंच प्रतिबिंब असतात. त्यांची शरीरयष्टी, बुद्धी, मती, गती, आकलन शक्ती, शिक्षणाची आवड याची पुरेपूर जाण पालकांना असते. काहींची शिक्षणात गती कमी-जास्त असते. आकलन, निरीक्षण शक्तीतही फरक असतो. हे समजून-उमजून मुलं जशी आहेत तशी स्वीकारली पाहिजेत. सज्ञान होईपर्यंत पालकांची गरज मुलांना असते. त्यानंतरही पालकच मुलांचे आधारस्तंभ असतात.