स्वास्थ्यरक्षणात योगाची अष्टांगे

0
387
  •  डॉ. मनाली महेश पवार

व्यायामातून कमीत कमी श्रम खर्चून त्यातून जास्तीत जास्त क्षमता तयार व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यायाम पद्धतीत फक्त मांस, सांधे, स्नायू यांची क्षमता सुधारून पुरेसे नाही, तर माणसाच्या मज्जासंस्थेस, चेतासंस्थेसही योग्य व्यायाम दिला पाहिजे.

दिवसेंदिवस स्वास्थ्यासाठी जगणे क्लिष्ट होत आहे. शारीरिक श्रम कमी करणार्‍या सोयी- यंत्रे, वाहने, उपकरणे- उपलब्ध झाल्या. शारीरिक श्रम कमी झाले. मात्र माणसाच्या मनाला ताणतणाव देणार्‍या बाबी मात्र वाढल्या. बदललेल्या जीवनपद्धती, स्वतःपुरती जगणे (स्वार्थ), स्पर्धा, दंगली, व्यापक युद्धे या सर्वांत मज्जासंस्थेच्या क्षमतेचा वापर वाढला. मांस, अस्थी यांच्यावरचा ताण पूर्वीपेक्षा कमी होत आहे.

व्यायामातून कमीत कमी श्रम खर्चून त्यातून जास्तीत जास्त क्षमता तयार व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यायाम पद्धतीत फक्त मांस, सांधे, स्नायू यांची क्षमता सुधारून पुरेसे नाही, तर माणसाच्या मज्जासंस्थेस, चेतासंस्थेसही योग्य व्यायाम दिला पाहिजे.
शरीरस्थ्य प्राण ः अपानावर जागृत स्वरूपाचे चांगले नियंत्रण मिळविणे, मनात येणार्‍या दुष्ट ऊर्मी घालवून कल्याणेच्छा वाढविणे, शरीराची काळजी घेत घेत आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाशी परिचित होणे गरजेचे आहे. भौतिक सुखसाधने वाढली म्हणजे नंतर आध्यात्मिक गरजांची गरज भासते हे जगभर दिसू लागले आहे.
तेव्हा व्यक्तीचे आचरण वा गरजा पूर्ण करणारे हवे असेल तर त्याला योग अष्टांगांशिवाय साधन नाही.
योग- व्याख्या
युज्- जोडणे, या धातूपासून ‘योग’ शब्द बनला आहे. कोणत्याही दोन गोष्टी जोडणे या अर्थाने योग, संयोग हे शब्द व्यवहारात वापरले जातात.

योगः चित्तवृत्तिनिरोधः
मनातील चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग. मनात परस्परविरोधी अशा अनेक वृत्ती निर्माण होत असतात व त्यांना अडविणारी प्रक्रियाही मनातच निर्माण होते. रोग निर्माण करणारे घटक शरीरसंपर्कात येताना शरीर व मनाकडून ‘हे टाळा, थांबवा’ अशा प्रकारचा इशारा दिला जातो. परंतु प्रज्ञापराधामुळे अनेकवेळा तो धुडकावला जातो. असे घडू नये म्हणून मनात निर्माण होणार्‍या परस्परविरुद्ध वृत्तींच्या आहारी न जाता त्याबद्दल त्रयस्थ बनून पाहण्याची क्रिया म्हणजे निरोध होय.
रज-तम वृत्तीचा निरोध म्हणजे योग
समत्वं योगं उच्यते
– परस्परविरुद्ध घटकांना सारखेपणाने सांभाळणे म्हणजे योग.
नास्तियोगात् परं बलम्‌|
– योगासारखे बल दुसरे कोणतेच नाही.
इंद्रियान् वशं कुरुते|
– योगामुळे इंद्रियांना ताब्यात ठेवता येते, प्रज्ञापराध टळतात.
इंद्रियवशित्व म्हणजे योग
निसर्गातील व शरीरातील सतत बदलणार्‍या परिस्थितीमुळे उत्पन्न होणारे शीतत्व, उष्णत्व, चलत्व इत्यादी सर्व प्रकारच्या द्वंद्वामुळे उत्पन्न होणार्‍या सुख-दुःखांच्या परिस्थितीत मनाचे स्थैर्य टिकवून धरणे व ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणे हे योगाचे फलित आहे.
प्राण व अपान या वातदोषाच्या दोन प्रकारांचा संबंध अनुक्रमे शरीरपोषक बाह्य घटक स्वीकारण्याशी आणि मलरूप त्याज्य घटक उत्सर्जित करण्याशी आहे, व या दोन क्रिया सुस्थितीत राहण्यावरच शरीर-मानस आरोग्य अवलंबून असते. प्राण व अपान यांचे कार्य समस्थितीत राखणे म्हणजेच योग होय.

आरंभीच्या योगग्रंथांचा भर मोक्षप्राप्तीकडे आहे व संपूर्ण मार्गदर्शन त्यादृष्टीने आहे. त्यानंतर विकसित झालेल्या हठयोगप्रणीत ग्रंथांनी मात्र सामान्य व्यक्तींचे शरीर व मन योगाला अनुकूल असे तयार करण्याच्या दृष्टीने शिकवण व आचारणपद्धती सांगितली आहे. हे विवरण रोगनिवारक व स्वास्थ्यपालक यांसाठी सर्वांनाच उपयुक्त आहे.

अष्टांग योग
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार
धारणा ध्यान समाधयोः अष्टौ अंगानि|
– यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची आठ अंगे आहेत.
चित्तवृत्तिनिरोध कसा साधायचा? या प्रश्‍नाचे उत्तर आहे, योगाच्या आठ अंगांच्या सहाय्याने साधावा. या आठही अंगांचे अनुष्ठान करावे लागते. या आठ अंगांवर गप्पा मारून काही उपयोग होत नाही. दिवसाकाठी काही काळ योगाचा सराव करायचा व मग वाटेल तसे वागायचे असे करूनही उपयोग नसतो. सतत, अखंडपणे ही आठ अंगे आत्मसात केली पाहिजेत.

यम ः अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रहा यमाः|
* अहिंसा- आपल्या बोलण्यानेसुद्धा कुणाला दुखवू नये असे अहिंसा सांगते. पण आत्मरक्षणार्थ हत्या करणे ही हिंसा नव्हे.
* सत्य- सत्य म्हणजे सत् (हे) यं (जे). जे आहे ते. जे घडले ते मानणे सत्य होय. स्वार्थ सोडला तर सत्याचरण करणे अवघड नाही.
* अस्तेय- चोरी न करणे म्हणजे अस्तेय. चोरी करणे म्हणजे जाणूनबुजून दुसर्‍याची वस्तू घेणे. हे तर पाप आहेच, पण ते पाप आहे हेच आज समाजाला कळत नाही. ती चोरीच आहे.
* ब्रह्मचर्य- ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म + चर्य, चर्य या शब्दात आचरण अर्थ आहे. ब्रह्माला धरून आचरण करणे. (ब्रह्मचर्य इथे स्त्री-पुरुष संबंध येतो का?)
* अपरिग्रह- सर्व बाजूने घेणे किंवा संचय करणे म्हणजे परिग्रह. अपरिग्रह म्हणजे कोठूनही काही घेऊ नये व कसलाही संचय करू नये.
यम म्हणजे बंधने. आपण ते यम अबाधितपणे सतत आचरणात आणावयास हवेत.
नियम ः शौचसंतोषतपः स्वाध्याय ईश्‍वरप्रणिधानानि नियम|
शुद्धी, संतोष, तप, स्वतःचा अभ्यास आणि ईश्‍वराजवळ सर्वस्व ठेवणे हे नियम आहेत.
शौच ः म्हणजे शुद्धता. आपण अंतर्बाह्य शुद्ध राहावे हा पहिला नियम आहे.
संतोष ः शुद्धता असेल तेथे प्रसन्नता असते. संतोष म्हणजे आनंदी राहणे, संतुष्ट राहणे.
ताप ः याचा मूलभूत अर्थ तेज किंवा उष्णता आहे. आपले तेज वाढविण्याचे सर्व प्रयत्न म्हणजे तप होय.
स्वाध्याय ः म्हणजे स्वतःचा अध्याय, स्वतःचा अभ्यास करणे. स्वतःच्या देहाचा (मी) अभ्यास म्हणजे स्वाध्यायच.
ईश्‍वरप्रणिधान ः आपले सर्वस्व ईश्‍वराच्या अधीन करणे.
‘तप, स्वाध्याय आणि ईश्‍वर प्रणिधान’ या तीन क्रिया हाच योग आहे. म्हणून त्याला क्रियायोग असे म्हटले आहे. योग म्हणजे परमात्म्याशी मीलन हा अर्थ घेतला तर ते मीलन घडवण्यास या तीन क्रिया अतिशय आवश्यक आहेत.
आसन ः धारणाध्यान आदी पुढील योगाचरणासाठी दीर्घकाळ क्लेश न होता सुखाने बसता येईल असे. ज्या आसनात आपले शरीर अगदी स्थिर, निश्‍चल राहते व ज्यामध्ये आपणास सुख लाभते असे आसन असावे असे साधे सरळ विधान भगवान पतंजलींनी केले आहे. योगासने ही स्वास्थ्य रक्षणासाठी व व्याधिनाशासाठी सांगितलेली आहेत.

प्राणायाम ः श्‍वासप्रश्‍वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः|
श्‍वास आणि प्रश्‍वास यांची गती तुटते त्यालाच प्राणायाम म्हणतात. स्थिर सुखासनामध्ये बसून प्रयत्नपूर्वक शैथिल्य आणून अनंताशी समापत्ती साधली आणि त्यामुळे द्वंद्वाचा परिणाम संपला म्हणजे आपोआप श्‍वास आणि प्रश्‍वास थांबतात. श्‍वासोच्छ्‌वास आपोआप थांबण्याच्या या क्रियेला प्राणायाम असे म्हणतात. द्वंद्व संपले म्हणजे माझ्या आतील हवा व बाहेरील हवा हे द्वंद्वसुद्धा संपले. मग श्‍वासोच्छ्‌वास हवाच कशाला? जीव आणि आत्मा हे द्वंद्वही येथे संपते. अशा स्थितीत जीवाला श्‍वास कशासाठी लागेल? प्राणाचे नियमन आत्म्याकडून होणे म्हणजे प्राणायाम.

प्रत्याहार ः स्वविषय असंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार
इव इंद्रियाणां प्रत्याहारः|
– स्वतःच्या विषयाशी संबंध न ठेवल्यामुळे इंद्रिये चित्ताच्या स्वरूपाशी एकरूप होतात त्यालाच प्रत्याहार म्हणतात. इंद्रिये नेहमी बाहेर धावून आपल्या विषयाशी मीलन पावत असतात. आपल्या आत चित्त आहे. त्या चित्ताकडे पंचज्ञानेंद्रिये वळवून त्या चित्ताच्या स्वरूपासारखा आकार (अनुकार) म्हणजे त्याची प्रतिमा मिळविणे म्हणजेच प्रत्याहार. एकदम चित्ताचा अनुकार मिळवणे शक्य नसते म्हणून तशी खटपट करणे, त्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे हाच प्रत्याहार होय.
धारणा ः देशबंधः चित्तस्य धारणा|
– एका देशापाशी चित्ताला बांधून ठेवणे म्हणजे धारणा होय. देश म्हणजे एखादा भाग. एखादा लहान बिंदू, समईची ज्योत, देवाची मूर्ती या जड वस्तू म्हणजे एक देश किंवा भाग. तेथे आपले मन स्थिर करणे म्हणजे धारणा होय. एका विचारावर किंवा नामस्मरण करूनही धारणा करता येते, पण ती गोष्ट अवघड असते. विचार केव्हा भरकटत दूर जाईल याचा नेम नसतो. नामस्मरण केव्हा थांबले व भलते विचार केव्हा चालू झाले हेसुद्धा आपणास कळत नाही. म्हणून सुरुवातीच्या काळात विचारावर किंवा नामावर धारणा करू नये. त्यासाठी एखादी मूर्ती किंवा चित्र समोर ठेवावे, उदबत्ती लावावी, फुले वहावीत म्हणजे पंचज्ञानेंद्रिये त्या मूर्तीवर वा चित्रावर खिळतील आणि मन तेथेच अडकेल. इतर विचार बंद केले की मन समोरच्या धारणा विषयावर केंद्रित होते.

ध्यान ः तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्‌|
तेथे प्रत्ययाशी एकतानता साधणे म्हणजे ध्यान होय. धारणेचा विषय समोर आहे. धारणा साधली आहे म्हणजेच आपले चित्त धारणेच्या विषयावर स्थिरावत आहे. अशावेळी त्या विषयापासून जो प्रत्यक्ष अनुभव येत असतो त्याच्याशी एकतानता साधावी. या क्रियेलाच ध्यान असे म्हणतात. ध्यान या शब्दाचा अर्थ चिंतन करणे, विचार करणे असाच आहे. पण हे चिंतन किंवा विचार धारणेसंबंधीच पाहिजे, तरच त्याला ध्यान म्हणता येईल. धारणेच्या विषयाचे एकतान होऊन चिंतन करणे. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की निर्णयशक्ती चांगली प्राप्त होते. धारणाविषयाशी एकतान होऊन विचार करताना तार कुठेच तुटता कामा नये. असे चिंतन करणे म्हणजे ध्यान होय.

समाधी ः तदैवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिण समाधिः|
तो (ध्यानविषय) व अर्थमात्र भासमान होतो (आणि) स्वतःचे रूप पूर्ण नाहीसे होते त्या अवस्थेला समाधी म्हणतात. आपण आणि ध्यान विषय वेगळे आहेत, हा भावच येथे उरत नाही. यालाच समाधी म्हणायचे.