‘स्वाईन फ्ल्यू’चे राज्यात अडीच वर्षात १९ बळी

0
109

गेल्या अडीच वर्षांत वराह ज्वरामुळे (स्वाईन फ्ल्यू) राज्यात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्यातील साथींच्या रोग्यांचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल दिली. २०१७ साली राज्यात वराह ज्वराने कहरच केला होता. त्यावर्षी वराह ज्वरामुळे तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला होता. यासाठी राज्यात वराह ज्वराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडाही विक्रमी म्हणजेच २६० एवढा होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात वराह ज्वराचा कधीही फैलाव झाला नव्हता, असे डॉ. बेतोडकर म्हणाले.
२०१८ मध्ये ४ जण दगावले

२०१८ रोजी वराह ज्वरामुळे राज्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावर्षी ३५ जणांना वराह ज्वराची लागण झाली होती, अशी माहिती डॉ. बेतोडकर यांनी दिली. चालू वर्षी १ जानेवारी ते आतापर्यंत १०५ जणांना वराह ज्वराची लागण झाली. त्यापैकी तिघाजणांचे आतापर्यंत निधन झाले असल्याचे ते म्हणाले.

चालू वर्षी भारतात
११२४ जणांचा मृत्यू
चालू वर्षी पूर्ण भारत देशात आतापर्यंत ११२४ जणांचा वराह ज्वराने मृत्यू झाला. २७५९४ जणांना ह्या रोगाची लागण झाली होती. गेल्या वर्षी ह्या रोगामुळे भारतभरात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा ११२८ एवढा होता. १५२६६ लोकांना ह्या रोगाची लागण झाली होती.

गोव्यात जानेवारी ते मार्च व ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या दरम्यान वराह ज्वराचे रुग्ण आढळत असतात, अशी माहितीही डॉ. बेतोडकर यांनी यावेळी दिली. मधुमेह व दम्याचे रुग्ण तसेच, रक्तदाबाचे रुग्ण व फुफ्फुसांचे विकार असलेले रुग्ण तसेच पाच वर्षांखालील मुले व वयोवृद्ध यांनाच ह्या रोगापासून धोका आहे. धडधाकट माणसांना ह्या रोगाची लागण झाली तरी त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे डॉ. बेतोडकर यांनी स्पष्ट केले.