स्वसंरक्षणाची ‘शाळा’

0
359

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था, ब्रिटीश गुप्तचर संस्था आणि भारतीय गुप्तचर संस्था यांना होती अशा प्रकारचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. याबाबत बरीच चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती असूनही आपल्याला हा हल्ला का थांबवता आला नाही असा प्रश्‍न उपस्थित होतो. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरेकी हल्ल्यांबाबतची ढोबळ स्वरुपातील माहिती गुप्तचर संस्था आपल्या सुरक्षा संस्थांना देत असतात. उदाहरणार्थ, २०१३ मध्ये १२० हून जास्त वेळा गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली होती. पण २०१३ मध्ये मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. अशाच प्रकारे मंदिरांवर, रेल्वे स्टेशनवर वा इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले होणार असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणा वर्तवत असतात. परंतु त्याबाबतची नेमकी आणि अचूक माहिती, वेळ दिली जात नाही. आज दहशतवाद्यांना मोठ्या शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी लाखो टार्गेट मिळू शकतात. पण प्रश्‍न असा उद्भवतो अशा प्रकारच्या टार्गेटचे आपण रक्षण कसे करायचे?

याबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या हल्ल्यांबाबतची अचूक माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळणे आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या शहरात कुठेतरी केव्हा तरी हल्ला होणार आहे किंवा मुं़बईवर समुद्रातून हल्ला होणार आहे अशी गुप्तहेर माहिती मिळण्याऐवजी जर आपण मुं़बईच्या व्हीटी भागामध्ये उद्या सकाळी दहा वाजता दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती मिळाली तरच अशा प्रकारच्या हल्ल्याचे आपल्याला सरंक्षण करता येते. जुजबी वा ढोबळ मानाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर या टार्गेटचे रक्षण करणे कठीण असते. नेमके हेच पेशावरमध्ये तहरीक-ए-तालिबानने केलेल्या हल्ल्याबाबत झाले. हा हल्ला लष्कराने चालवलेल्या एका शाळेवर झाला. सैनिकी शाळाच जर असुरक्षित असतील तर बाकीच्यांची सुरक्षा कशी असेल?
शाळांच्या सुरक्षेसाठीच्या प्राथमिक गोष्टी
आज कुठल्याही शहरामध्ये हजारो शाळा आहेत. यांना सुरक्षा कशी द्यायची हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व शाळांनी आपल्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु याबाबत नेमके काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे शाळांच्या भोवती कंपाऊंड भिंत बांधली आणि शाळेमध्ये प्रवेश करण्याकरिता एक किंवा दोन गेटच ठेवले आणि या प्रवेशद्वारांवर खाजगी सुरक्षारक्षकांना नेमून येणार्‍या जाणार्‍यांवर आपल्याला लक्ष ठेवले गेले तर शाळा बर्‍याच अंशी सुरक्षित राहू शकतील. परंतु प्रश्‍न असा उद्भवतो की ३६५ दिवस शाळांना आपण असे संरक्षण देऊ शकतो का? कारण हल्ला हा कधीही, कुठल्याही दिवशी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडील शाळांचे स्थान, त्यांच्या भोवतीची गर्दी, वाहतुकीची गर्दी यांचा विचार करता अशा प्रकारचा हल्ला झाल्यास तो थांबवण्यासाठी पोलीस किंवा इतर सुरक्षा यंत्रणांना तिथे पोहोचण्यास बराच वेळ लागू शकतो. त्यामुळेच शाळेतील कर्मचार्‍यांना शाळेचे रक्षण कसे करायचे याचेे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. याशिवाय वयाने मोठे विद्यार्थी आणि स्टाङ्ग यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे.
हल्ला होऊ नये म्हणून पूर्वखबरदारी
दशहतवादी हल्ले दोन प्रकारचे असतात. एक शाळा अथवा गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब ठेवणे अथवा २६/११ किंवा पेशावरप्रमाणे प्रत्यक्ष सशस्र दहशतवाद्यांनी येऊन गोळीबार करणे हल्ला करणे. पहिल्या प्रकारात म्हणजे बॉम्ब ठेवण्याच्या प्रकाराला थोपवण्यासाठी उत्तर सरळसोपे आहे. ते म्हणजे कोणती बेवारस वस्तू आढळल्यास तिला हात न लावता त्याबाबत तात्काळ पोलीसांना कळवणे. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुटण्यापूर्वी पूर्ण परिसराचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्ष दहशतवाद्यांनी हल्ला जर केला तर त्यापासून कसे रक्षण करायचे? सुदैवाने २६/११ नंतर तरी भारतावर अशा प्रकारचे हल्ले झालेले नाहीत आणि होण्याची शक्यताही नक्कीच कमी आहे. तरीही असे जर हल्ले झाले तर त्यापासून रक्षण करण्यासाठी आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्या सामान्य नागरिकांना आणि अशी मुले जे आत्मसंरक्षण करु शकतात त्यांना देणे गरजेचे आहे.
हल्ला झाल्यास काय करावे?
कुठल्याही दहशतवादी हल्ल्यापासून संरक्षण करण्याचे तीन भाग आहेत. पहिले म्हणजे दहशतवादी हल्ला होण्याअगोदर आपल्याला काय करता येईल? किंवा दहशतवादी हल्ला होणार आहे अशी सुचना मिळाल्यानंतर त्या संस्थेला किंवा त्या शाळेला काय करता येईल? दुसरे म्हणजे ज्यावेळी दहशतवादी हल्ला सुरु असतो त्यावेळी काय करता येईल? आणि तिसरे म्हणजे दहशतवादी हल्ला संपल्यानंतर काय करायला पाहिजे ? हल्ला होण्यापूर्वी शाळेचे सुरक्षा कर्मचारी गेटवर अलर्ट असण्याची गरज आहे. तसेच घातपाताबाबतची सूचना मिळाल्यास शाळेची प्रवेशद्वारे तातडीने बंद करणे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शाळेच्या आवारात प्रवेश देण्यापूर्वी प्रवेशपत्र पाहणे किंवा त्यांची ओळख पटवून घेणे. असे केल्यामुळे शाळेमध्ये येणार्‍या लोकांची गर्दी कमी होईल. शाळेचा परिसर मोठा असल्यास एकाहून अधिक सुरक्षारक्षकांच्या मदतीने पूर्ण परिसरावर निगराणी राखणे आवश्यक असते. याशिवाय प्रत्येक शाळेमध्ये सर्वांत जवळच्या पोलीस स्टेशनचे टेलीङ्गोन नंबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळेजवळच्या व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येण्यासाठी त्यांचेही संपर्क क्रमांक शाळेच्या स्टाङ्गकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे आकस्मात काही हल्ला झाला तर आपल्याला जी मदत आहे ती लवकर शाळेकडे पोहोचू शकेल.
विद्यार्थ्यांना द्यावेत आत्मसंरक्षणाचे धडे
दुर्दैवाने, एखादा अतिरेकी समोरासमोर आला तर त्याचा मुकाबला कसा करावा याबाबत शाळेतील नववी-दहावी किंवा त्यापुढील वर्गातील मोठे विद्यार्थी किंवा स्टाङ्ग यांना आत्मसंरक्षणाचे तसेच काठी अथवा दांड्याचा वापर करून दहशतवाद्यांशी एक-दोन मिनिटे लढण्याचे किमान प्राथमिक शिक्षण तरी दिलेले असणे गरजेचे आहे. काठीच्या साहाय्याने अथवा इतर मार्शल आर्टस् प्रशिक्षणाने आत्मसंरक्षण कसे करावे याचा सराव असणे आवश्यक आहे. हा सराव शाळेमधल्या सगळ्या कर्मचार्‍यांना करणे सक्तीचे करता येईल. त्यामुळे हे कर्मचारी पोलीसांची किंवा इतर कमांडोंची मदत पोहोचेपर्यंत त्या भागाचे संरक्षण करू शकतील.
आत्मसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे इतर ङ्गायदे
दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण दैनंदिन आयुष्यामध्ये आत्मसंरक्षण करण्यासाठीही नक्कीच उपयोगाचे ठरू शकते. घरात एखादा मोठा अपघात झाला, इमारत कोसळली, वीजेचा धक्का बसला, कोणी बुडू लागले, कोणी उंचावरून पडून ङ्ग्रॅक्चर झाले असेल तर काय करता येईल तर अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणे गरजेचे आहे. तसेच या सर्व गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे. त्यातून स्वत:चे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याकरिता समर्थ बनता येईल. यासाठी गरज आहे ती अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमात सामील करायला पाहिजे. ज्यामुळे प्रत्येकच माणूस किंवा मुलगा स्वत:चे आत्मसंरक्षण करू शकेल. असे प्रशिक्षण घेतलेली मुले प्रौढ नागरिक बनतील, त्यावेळेस ते स्वत:चे आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यास समर्थ राहतील. पर्यायाने आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची पातळी वाढण्यास मदत होईल. प्रत्येकाला आज जागरूकतेची जाणीव झाली पाहिजे. तसे झाले तर आपला समाज आणि देश जास्त सुरक्षित बनेल.