स्वप्न धुळीस

0
204

सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निवाड्याने व्ही. के. शशिकला यांची तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची स्वप्ने धुळीला मिळाली. बेहिशेबी संपत्ती प्रकरणात दोषी धरले गेल्याने चार वर्षांची उर्वरित सजा तर त्यांना भोगावी लागेलच, पण त्यानंतर आणखी सहा वर्षे त्या निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार असल्याने पुढील दहा वर्षे त्या लोकप्रतिनिधी बनू शकणार नाहीत. मात्र, राजकीय पक्ष चालवण्यापासून त्यांना हा निवाडा रोखू शकत नाही. त्यामुळे अभाअद्रमुकवरील आपला सध्याचा वरचष्मा त्या कायम ठेवू शकतील का, आपल्याऐवजी आपला प्रतिनिधी तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान करू शकतील का याचे उत्तर अभाअद्रमुकच्या आमदारांचा कल आता कोणत्या बाजूने राहतो त्यावर व राज्यपालांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. गेले काही दिवस बहुतांश आमदार शशिकला यांच्या बाजूने राहून ‘चिन्नम्मा, चिन्नम्मा’ चा घोष करीत राहिले, परंतु बुडत्या जहाजातून उंदीर निसटावेत तसे एकेक आमदार ओ. पनीरसेल्वम यांच्या गोटात जाऊन मिळताना दिसत आहेत. राज्यपाल विद्यासागर राव यांची भूमिकाही आता महत्त्वाची ठरेल. शशिकला यांची अभाअद्रमुकच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होऊनही राव यांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी पाचारण करण्यास वेळ लावला हे तर स्पष्टच आहे. अगदी जयललितांविरुद्धचे हे बेहिशेबी संपत्तीचे प्रकरण गेली एकवीस वर्षे ज्यांनी धसास लावले, त्या सुब्रह्मण्यम स्वामींनीच राज्यपालांच्या पक्षपाती भूमिकेवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या इशार्‍यांनुसार ते तसे वागले असा ठपका कॉंग्रेसने ठेवला आहे. केंद्र सरकारला शशिकलांचे सरकार सत्तारूढ झालेले नको होते. दक्षिणेत पाय पसरवण्यासाठी विश्वासू साथीदार म्हणून ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे भाजपा पाहतो आहे. अभाअद्रमुकमध्ये या घडीला निर्माण झालेली ही दुफळी निर्णायक असेल. शशिकला यांच्याविरुद्धच्या निवाड्याकडे तामीळनाडूच्या राजकारणापेक्षा व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये पाहिले जाणे आवश्यक आहे. खरे तर त्या ह्या प्रकरणातील आरोपी क्र. २ आहेत. आरोपी क्र. १ असलेल्या जयललितांनी मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या पहिल्या कार्यकाळात उत्पन्नाच्या कितीतरी पट अधिक संपत्ती गोळा केल्याचे हे प्रकरण. आलिशान बंगले, गाड्या, शेतजमिनी, चहाचे मळे, दागदागिने, अशी वारेमाप संपत्ती जयललितांपाशी मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या पाच वर्षांत एकवटली. ९७ साली त्यांच्या घरावर छापा पडला तेव्हा ८०० किलो सोने, ७५० चपलांचे जोड, १०,५०० साड्या, १९ उंची घड्याळे असा जामानिमा छाप्यात सापडल्याने देश थक्क झाला होता. पुढे हे प्रकरण नाना वळणे घेत गेले. ते कमकुवत करण्याचा तामीळनाडूच्या सरकारी वकिलांमार्फत प्रयत्नही झाला. पण शेवटी एवढ्या वर्षांनंतर का होईना ते धसास लागले आहे. समस्त राजकारण्यांना हा इशारा आहे. भ्रष्टाचाराला दडवण्याचा कोणी कितीही प्रयत्न करो, त्याला कधी ना कधी वाचा फुटणारच हा या निवाड्यातून येणारा संदेश आहे. ९६ साली जेव्हा हे प्रकरण बाहेर आले तेव्हा जयललितांपाशी ६६ कोटींची बेहिशेबी संपत्ती असल्याचा गदारोळ झाला होता. आज २१ वर्षांनंतर ६६ कोटी ही रक्कम क्षुल्लक वाटू लागेल एवढी भ्रष्टाचाराची अगडबंब प्रकरणे देशात उजेडात आलेली आहेत. पण असे गुन्हे करणारे सदैव मोकाट राहू शकणार नाहीत हा विश्वास किमान ह्या निवाड्यातून देशामध्ये जागला आहे. जयललिता आज असत्या तर त्यांनाही निश्‍चितपणे खडी फोडायला जावे लागले असते. जयललितांचा राजकीय वारसा सांगणार्‍या शशिकलांनी सत्तेची स्वप्ने पाहण्यापेक्षा आता कारावासात त्यांचा वारसा जरूर मिरवावा.