स्वतंत्र बलुचिस्तान हा एकमेव पर्याय

0
260

– दत्ता भि. नाईक

भारत सरकारवर जनतेने आता लोकमताचा रेटा लावून बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले पाहिजे. आता युद्ध झाल्यास पुन्हा साहस करण्यासाठी पाकिस्तान जिवंत राहणार नाही हेही तितकेच खरे आहे.

दि. १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सीमाभागातील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर जबरदस्त मोठा हल्ला करून येथील विश्रांती घेणार्‍या जवानांच्या निवासामध्ये बॉम्बस्फोट घडवला. यात सतरा जवान जागीच मरण पावले, तर आठ गंभीर जखमी झाले. यांपैकी एकाला दुसर्‍या दिवशी वीरमरण आले. हा लेख वाचकांच्या हातात पडेपर्यंत ही संख्या वाढलेली असू शकते.
उरी येथील हे लष्कराचे मुख्यालय म्हणजे १० डोग्रा रेजिमेंटचे प्रशासकीय कार्यालय आहे. ही घटना घडताच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आपला नियोजित रशिया व अमेरिकेचा दौरा रद्द केला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात चालू असलेले सर्व कार्यक्रम सोडून दिल्लीचा रस्ता धरला. पाक पुरस्कृत जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केले आहे हे याचवेळी सिद्ध झाले. हल्लेखोर चारही दहशतवादी भारतीय जवानांनी ढेर केले तरी चारच्या बदल्यात अठरा ही मोठी किंमत आहे. २ जानेवारी रोजी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर ही सातवी घटना आहे. यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने भारताविरुद्ध अघोषित युद्ध पुकारलेले आहे हे या सर्व घटनाक्रमावरून सिद्ध होते.
बलुच जनतेची मुस्कटदाबी
प्रत्येकवेळी जेव्हा अशी घटना घडते तेव्हा तेव्हा देशभरातून प्रतिक्रिया येते. परंतु यावेळची प्रतिक्रिया प्रखर असून भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी सर्व थरांतून होऊ लागलेली आहे. दि. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनप्रसंगी भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तान सरकार सध्या खवळले आहे. बलुचिस्तान हा एक पाकिस्तानचा प्रांत असला तरी तेथील जनता मनापासून समाधानी नाही. सध्याचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ हे बलुच वंशाचे असले तरी जनतेचा लष्करावर विश्‍वास नाही.
सन अठराशेच्या सुमारास ब्रिटिशांनी बलुचिस्तानवर निरनिराळ्या मार्गानी आपला अंमल बसवला. प्रांताच्या उत्तरेकडच्या भागावर त्यांनी चीफ कमिशनर नेमून त्यावर राज्य करण्यास सुरुवात केली. या भागातील अति उत्तरेला पश्तुन लोकांचीही वस्ती आहे. आजच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा याच भागात आहे. याशिवाय कलात, खरन मकरान व लास बेला असे राजा व नवाबांच्या अमलाखाली प्रदेश होते. देशातील इतर राजांच्या दरबारात प्रतिनिधी नेमून व स्वतःचे सुसज्ज सैनिक त्यांच्याच खर्चावर त्या-त्या राज्यात ठेवून जसे इंग्रजांनी राज्य चालवले तसेच त्यांनी येथेही केले.
स्वातंत्र्यपूर्व घेतलेल्या निवडणुकीत इंग्रज शासित बलुचिस्तानने मुस्लीम लिगला मतदान केले नव्हते. मुस्लीम लिगला सिंध व बंगालमध्ये बहुमत मिळाले होते व उत्तर प्रदेश म्हणजे तेव्हाचा युनायटेड प्रोविन्स व बिहारमध्ये लक्षात भरण्यासारख्या जागा लिगला मिळाल्या होत्या. लिगच्या बाजूने मतदान म्हणजे देशाच्या विभाजनाला मतदान असाच त्यावेळी अर्थ निघत होता. तरीही पंजाबचा बराच मोठा भाग, वायव्य सरहद्द प्रांत, इंग्रज शासित बलुच प्रदेश व पूर्व बंगाल तसेच आसामचा सिल्हेट जिल्हा पाकिस्तानला देण्यात आला. त्यावेळी बलुचिस्तानच्या चारही राजघराण्यांनी पाकिस्तानमध्ये विलीन होण्यास नकार दिला होता. कलातच्या खानाने तर आपले संस्थान भारतात विलीन करण्याची तयारी ठेवली होती, परंतु पाकिस्तानी लष्कराने जबरदस्तीने ही चारही संस्थाने ताब्यात घेतली व तेव्हापासून या प्रदेशात जनतेची मुस्कटदाबी चालू आहे.
पवित्र कुराणाची शपथ
२७ मार्च १९४८ रोजी पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण बलुचिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानविरोधात पाच मोठे उद्रेक झाले. स्वातंत्र्य गमावल्यानंतर लगेच कलातच्या खानाचा लहान भाऊ युवराज अब्दुल करीम खान याच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेने फार मोठे आंदोलन चालवले. परंतु हे आंदोलन क्रूरपणाने चिरडले गेले. १९५० मध्ये नवाब नवरोज खान यांनी लोकक्षोभामुळे उसळलेल्या उद्रेकाचे नेतृत्व केले. त्यानंतर वीस वर्षे शांतता होती. यानंतर १९७० साली नवाब खैर बख्श मर्री याच्या नेतृत्वाखाली फार मोठे आंदोलन झाले. १९७१ च्या युद्धामुळे व पाकिस्तानमधून पूर्व बंगाल बाहेर पडल्यामुळे पाकिस्तान लष्कर चवताळले होते. लष्कराचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो भूमिगत झाला व त्याने सरळ अफगाणिस्तान गाठले. १९९० च्या नंतर अफगाणिस्तानवर पाकप्रेरित तालिबानने कब्जा केल्यामुळे तो स्वदेशात परतला. १९९६ साली त्याने बलोच लिबरेशन आर्मी या सशस्त्र संघर्षावर विश्‍वास असलेल्या संघटनेची स्थापना केली. २००१ साली या संघटनेने पाक लष्कराला शस्त्रांच्या माध्यमातून उत्तर देण्यास सुरुवात केली. या सशस्त्र लढ्याला यापूर्वी चर्चेच्या माध्यमातून प्रश्‍न सुटेल म्हणून प्रयत्न करणारे डॉ. अल्लाह नजर बलोच तसेच नवाब खैर बख्श मर्री यांनीही पाठिंबा दर्शवला. नवाब साहेब जनतेत इतके लोकप्रिय आहेत की ते बलुचिस्तानमध्ये ‘बाबा-ए-बलोचिस्तान’ या नावाने ओळखले जातात.
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, युवराज अब्दुल करीम खान तसेच नवाब नवरोज खान यांच्याशी झालेल्या शांतता कराराच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने सरकारी अधिकारी व आंदोलकांचे नेते यांनी मिळून पवित्र कुराणाची शपथ घेऊन शब्द पाळण्याचे ठरवले होते. परंतु पाकिस्तान सरकारने जनतेचा छळ थांबवला नाही. त्यामुळे संपूर्ण बलुचिस्तानमधील जनता आज अस्वस्थ आहे.
मारा आणि फेकून द्या
बलुची लोकांना पाकिस्तान सरकारने देशाच्या नागरिकांसारखी वागणूक कधीही दिली नाही. अताउल्ला मेंगल या लोकनेत्याचे दोन मुलगे असद मेंगल आणि अख्तर मेंगल हे दोघेजण प्रांताच्या राजकारणात सक्रिय होते. काही काळ त्या दोघांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते. १९७६ साली त्यांचे अपहरण केले गेले. त्यानंतर त्यांचा पत्ता लागलाच नाही.
नवाब अकबर बुगती हे पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय होते. ते संसदीय राजकारणात सक्रिय होते. त्यांनी कुठल्याही लष्करी उठावाला पाठिंबा दिलेला नव्हता. ते लोकशाही मार्गाने अधिकारांची मागणी करत होते. परंतु २००६ साली लष्कराने त्यांची हत्या केली.
बलोच नॅशनल मुव्हमेंटचे नेते गुलाम महमद बलोच आणि लाला मुनीर, तसेच बलोच रिपब्लिकन पार्टीचे शेर महंमद बलोच यांच्यावर दहशतवादी कारवायांत हात असल्याबद्दल खटला चालू होता. २००९ मध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करणारा निकाल दिला. पण पाक सरकारने त्यांना घरी जाऊ दिले नाही. त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली व त्यांची प्रेते निर्जन स्थळी फेकून दिली. हे प्रकार सर्रासपणे चालू असून याला पाकिस्तानचे ‘मारा आणि फेकून द्या’ धोरण म्हणून ओळखले जाते.
वंशसंहार चालूच
बलोच नॅशनल पार्टीचे नेते माजी खासदार हबीब जलील बलोच यांची १४ जुलै २०१० रोजी हत्या करण्यात आली. पत्रकारांच्या कुटुंबीयांना त्रास देणे, त्यांच्या घरातील महिलांशी छेडछाड करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. डेरा बुगती येथे नैसर्गिक वायू आहे. ग्वादर बंदर चीनच्या ताब्यात द्यावयाचे आहे म्हणून बलुचिस्तानमधील लोकांना हाकलून लावणे, त्यांचा वंशसंहार करणे सर्रासपणे चालू आहे. पाक सरकारकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अलीकडे जवळजवळ गोळीबारामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह निरनिराळ्या ठिकाणी सापडलेले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवालाप्रमाणे तेहतीस हजाराहून अधिक बालके एकट्या बलुचिस्तानात पोरकी बनलेली आहेत. त्यांतील तीस टक्क्यांहून जादा बालके कुपोषणाला बळी पडलेली आहेत. आठ ते दहा हजार मुले अन्नाच्या तुटवड्यामुळे मरण पावलेली आहेत. १३ ऑगस्ट २०१६ रोजी क्वेटा येथील हॉस्पिटलमध्ये घडवून आणलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे सर्व जगाचे लक्ष आता या समस्येने वेधून घेतले आहे. हा नरसंहार फक्त देशातच चाललेला आहे असे नाही तर अफगाणिस्तानातील बलुची निर्वासित छावणीवर २०१६ च्या मे महिन्यात हल्ला करण्यात आला व ११ जुलै रोजी निर्वासित नेता शाह नवाज नेहरी याचा इराणमधील शरावान या ठिकाणी मारेकरी पाठवून खून करण्यात आला.
पाकिस्तान जिवंत राहणार नाही
भारत सरकारचे संरक्षण सल्लागार श्री. अजित डोवाल यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले आहे. ते इराद्याचे पक्के आहेत. अहमदशहा अब्दाली याने पानिपतच्या युद्धातील युद्धकैद्यांना त्यांच्या परंपरेप्रमाणे गुलाम बनवले व फुकट पोसावे लागणार म्हणून त्यांना वाटेत विकले. १९४४ मध्ये नवाब अकबर खान बुगती यांनी त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामध्ये स्वतः मराठा असल्याची भावना आहे. त्यातील बरेचजण घरात शिवाजी महाराजांची तस्वीर ठेवतात. १९९० मध्ये बुगती शहरात ‘तिरंगा’ चित्रपटात नाना पाटेकर यांनी ‘मै मराठा हूँ और मराठा मारता है या मरता है’ हे वाक्य उच्चारले तेव्हा चित्रपटगृहात शिट्‌ट्या व टाळ्यांनी गडगटाड झाला. यानंतर भारतीय चित्रपट पाकमध्ये दाखवण्यावर बंदी घालण्यात आली.
बांगलादेशमध्ये जशी भारतीय सेनादलांनी कारवाई केली तशी बलुचिस्तानमध्ये करावी अशी मागणी होत आहे. ग्वादर बंदराच्या बांधकामाच्या निमित्ताने तिथे मुक्कामाला आलेल्या चिनी नागरिकांच्या डुकराचे मांस खाण्याच्या सवयीवरून तेथील जनतेत असंतोष आहे. चीनचा झिंजियांग-ग्वादर मार्ग प्रकल्प बंद पाडलाच पाहिजे यासाठी एकतर झिंजियांग प्रांत चीनमधून फुटून निघाला पाहिजे, पाकव्याप्त जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले पाहिजे वा बलुचिस्तान प्रांत स्वतंत्र झाला पाहिजे. यांपैकी कोणतीही एक घटना या योजनेत खोडा घालू शकते. महाभारतातही युद्ध टाळण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु दुर्योधनाच्या अधर्मी वृत्तीमुळे शेवटी युद्ध अटळ झाले. आजही पाकिस्तान अधर्मी वृत्तीने वागत असल्यामुळे युद्ध हा पर्याय अटळ ठरत चाललेला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यचळवळीचे नेते ब्रहमदाग बुगती, सेर मोहम्द बुगती आणि अझिजुल्ला बुगती यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी भारत सरकारने पावले उचललेली आहेत. ही एक आशादायी घटना आहे. भारत सरकारवर जनतेने आता लोकमताचा रेटा लावून बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले पाहिजे. आता युद्ध झाल्यास पुन्हा साहस करण्यासाठी पाकिस्तान जिवंत राहणार नाही हेही तितकेच खरे आहे.