स्वच्छ भारतासाठी

0
104

आजच्या गांधीजयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची सुरूवात झाली आहे. ही मोहीम अर्थातच प्रतिकात्मक आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या जाणिवेचे बीजारोपण करणे हा या सार्‍या उपक्रमामागील हेतू आहे. गांधीजी हे स्वच्छतेचे भोक्ते होते हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या अंगावर एकच आखूड पंचा असे, पण तो मळका, फाटका नसे, तर स्वच्छ आणि नेटका असे, अशी आठवण त्यांच्या निकटवर्तीयांनी लिहून ठेवली आहे. गांधीजींनी स्वच्छतेचा आग्रह आपल्या लेखनातून आणि प्रार्थनेच्या वेळी दिलेल्या भाषणांतून सातत्याने मांडलेला दिसतो. जे लोक स्वच्छतेचे नियम मोडतात ते आपल्या समाजालाही बदनाम करीत असतात असे स्पष्ट आणि परखड मत गांधीजींनी नोंदवले आहे. ‘रस्त्यावर थुंकू अथवा नाक शिंकरू नये. त्यातून रोगराईचा संसर्ग होऊ शकतो. पान – तंबाखू खाऊन जे रस्त्यावर थुंकतात, ते दुसर्‍याचा विचार करीत नाहीत. एखाद्याने तसे केलेच तर त्यावर निदान माती टाकावी’ असे गांधीजींनी २ नोव्हेंबर १९१९ च्या ‘नवजीवन’ मध्ये लिहिले. आपल्या घरातील स्वच्छतागृह हे दिवाणखान्याएवढेच स्वच्छ असायला हवे असे गांधीजींनी २४ मे १९२५ च्या अंकात लिहिले. सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे हा गुन्हा मानला जावा असे १३ सप्टेंबर १९२५ च्या अंकात ते लिहितात. म्हणजेच सातत्याने गांधीजी सार्वजनिक स्वच्छतेचा आग्रह धरीत आले आणि समाजाला तो आदर्श देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी प्रसंगी झाडू हाती घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. जो मळक्या पायांनी येईल, तो माझ्या मनात प्रवेश करू शकणार नाही, असे गांधीजी उद्गारले होते. एकदा बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्घाटनासाठी ते गेले, तेव्हा तेथील काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरातील गलीच्छता पाहून व्यथित झाले आणि त्याबाबतची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ज्या आदर्श ग्रामजीवनाचे स्वप्न गांधीजींनी पाहिले, त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतेलाही त्यांनी महत्त्व दिलेले आहे. असे गाव जेथे कोणी निरक्षर नसेल, कोणी बेरोजगार नसेल, सर्वांना पुरेसे काम असेल, प्रत्येकाला हवेशीर घर असेल, शरीर झाकणारी खादी असेल, सर्व गावाला आरोग्याच्या व सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे ज्ञान असेल, असा आदर्श गाव गांधीजींना अभिप्रेत होता. दुर्दैवाने स्वातंत्र्याचा अर्थ आपण स्वैराचार असाच घेतला आणि जे जे सार्वजनिक त्याचा वाली कोणी नाही असा समज करून घेतला. परिणामी सार्वजनिक ठिकाणे ही अतिक्रमणे, गलीच्छता यांची आगरे ठरली. गांधीजींनी प्रत्येक व्यक्तीच्या आत्मशुद्धीचा आग्रह धरला होता. आपले विचार शुद्ध ठेवा, शारीरिक व मानसिक श्रमांमध्ये संतुलन राखा आणि प्रत्येक कामामध्ये स्वच्छता पाळा असा त्यांचा संदेश होता. पाणी, अन्न आणि हवा या तिन्ही गोष्टींची स्वच्छता राखली, तर अनारोग्याची समस्या उद्भवणार नाही आणि केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेपुरतेच पाहू नका तर चोहीकडे तशा प्रकारची स्वच्छता राहावी याची काळजी घ्या असे गांधीजी सांगायचे. आज देशभरात गांधीजयंती साजरी करीत असताना गांधीजींचा सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भातील हा किमान विचार जरी प्रत्येकाने लक्षात ठेवला, तरी ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आपल्यामागे आपले पुतळे उभारू नका असे गांधीजींनी बजावले होते. गांधीवाद नावाची काही चीजच नाही असे तेच म्हणाले होते. त्यामुळे आपल्यामागे आपले देव्हारे माजवले जाऊ नयेत यासाठी दक्ष असलेल्या गांधीजींचा वारसा हा केवळ त्यांच्या विचारांचा वारसा आहे. तो अभिमानाने मिरवण्याऐवजी आपली सुटी वाया गेली असा विचार करणे करंटेपणाचे नाही काय? शेवटी असे उपक्रम हे प्रतिकात्मक असतात. ते सक्तीमुळे नव्हे, तर स्वेच्छेने राबवण्याची प्रेरणा मिळाली, तरच सार्थकी लागतात. गतवर्षी स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीच्या निमित्ताने सार्वजनिक सूर्यनमस्काराचे उपक्रम राबवले गेले. सार्धशती संपली आणि लोक सूर्यनमस्कारही विसरले. गांधीजींच्या ‘स्वच्छ भारता’च्या संकल्पनेचाही असा तोंडदेखला ‘इव्हेंट’ होऊ नये, तर तो आपल्या सार्वजनिक जीवनाचा भाग बनावा, आपल्या सवयीचा भाग व्हावा. तसे घडले तरच गांधीजींच्या स्वप्नातला स्वच्छ भारत प्रत्यक्षात उतरू शकेल. अन्यथा केवळ झाडू घेतलेली छायाचित्रेच मागे उरतील!