स्वच्छता मोहिमेद्वारे ‘स्वच्छ भारत’ ला चालना

0
318
  • नीरज वाजपेयी

गेल्या तीन वर्षांत स्वच्छता व चांगल्या आरोग्य सवयींवरील विश्वास ग्रामीण पातळीवरील मागासलेल्या भागात देखील वाढीस लागला आहे. यामुळे सध्या देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता चळवळीला वेग मिळाला आहे…

२०१४ मध्ये गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ या महत्वाकांक्षी योजनेच्या याशोगाथांचा पाऊस पडत असताना, स्वच्छ शौचालये व सुरक्षित पिण्याच्या पाण्याविषयीची जागरुकता आणि मागणी वाढत आहे. यासोबतच ‘स्वच्छता’ या शब्दाला चलनासारखे महत्व प्राप्त झाले आहे. शांतपणे सुरुवात झालेल्या या चळवळीने गावोगावी मोठ्या प्रमाणात शौचालये उभारणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि नियमित स्वच्छता इत्यादीस प्रोत्साहन दिले आहे. नवीन शौचालयांच्या मोठ्या आकडेवारीशिवायही सरकारी यंत्रणा, संस्था, सामाजिक संस्था, सामान्य नागरिक इत्यादींचा सहभाग हा चळवळीच्या वाढत्या यशस्वीततेचे निदर्शक आहे.
स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि सार्वत्रिक स्वच्छता प्राप्त करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ग्रामीण व शहरी अशा दोन भागांत स्वच्छ भारत मिशन सुरू केले. २०१९ पर्यंत स्वच्छ भारतचे उद्दिष्ट पूर्ण करून महात्मा गांधींना त्यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने आदरांजली देण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छ भारत मिशनमुळे देशातील स्वच्छता क्षेत्र ३९% वरून ६७.५% इतके वाढले आहे. ज्यामध्ये आज २.३८ लाख गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाली आहेत. ही प्रगतीदर्शक माहिती स्वतंत्र तपास संस्थांनी देखील पडताळून पाहिली आहे.
स्वच्छतेशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी वैयक्तिक नवकल्पनांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘स्वच्छथोन’ हे सार्वजनिक व्यासपीठ उभे करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशनचे बोधचिन्ह देखील अशाच सार्वजनिक व्यासपीठावरून प्राप्त झालेले आहे.
स्वच्छ भारत कार्यक्रमाला उत्तेजन देण्यासाठी आणि त्याला एक प्रभावी लोकचळवळ बनविण्यासाठी पंधरा दिवसांची ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम हाती घेतली गेली आहे. यामध्ये संसद सदस्य आणि इतर लोक ‘श्रमदान’ करतील. स्वत: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या मूळ गावी, कानपूर देहात येथे या मोहिमेचा शुभारंभ केला. येत्या गांधी जयंतीला ही मोहीम पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री, संसद सदस्य व विधानसभा सदस्य देखील देशभरात या उपक्रमाखाली श्रमदान करीत आहेत. १७ सप्टेंबर हा पंतप्रधानांचा जन्मदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला गेला. स्वच्छता मिशनमधील सहभागी सांगतात की, असे कार्यक्रम समस्येवर लक्ष केंद्रित करून सामान्य माणसाचा चळवळीतील सहभाग वाढवितात. धोरण कर्त्यांच्या मते संसद सदस्य, नामवंत आणि ब्रँड ऍम्बॅसॅडर्स अशा उच्च पातळीवरील व्यक्तींच्या सहभागाने समाजाला एक ठोस संदेश मिळतो आणि मोहिमेची गती वाढीस लागते. सेवा दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय वाहिनीवरून ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ सारख्या चित्रपटाचे प्रक्षेपण करून सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्वच्छतेसाठी, शौचालय बांधणीसाठी आणि परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सर्व स्तरांतून अधिकाधिक श्रमदानाचे आयोजन करेल. सार्वजनिक तसेच पर्यटन स्थळांची स्वच्छता यामध्ये केंद्रस्थानी असेल. या मोहिमेचे समन्वयन पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय करीत आहे.
हा कार्यक्रम अधोरेखित आणि लोकप्रिय करण्यासाठी प्रत्येक औचित्याचा उपयोग करण्यात येईल. याचाच भाग म्हणून सत्ताधारी पक्षाचे विचारवंत आणि सामाजिक सुधारक डॉ. दीनदयाळ उपाध्याय यांचा २५ सप्टेंबर रोजी असलेला जन्मदिन ‘सर्वत्र स्वच्छता’ म्हणून सार्वजनिक ठिकाणी – जसे बागा, बस थांबे, रेल्वे स्थानके या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. त्यानंतर गांधी जयंतीला पर्यटनस्थळांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल. मिळालेल्या माहिती आणि एका अंदाजानुसार स्वच्छतेच्या अभावामुळे पर्यटन विभागाचे दरवर्षी सुमारे ५०० कोटींचे नुकसान होते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, अस्वच्छतेमुळे भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये (जीडीपी) दरवर्षी सहा टक्के घट होते. अशी अनेक स्थाने सरकारने शोधून काढली आहेत, जिथे या मोहिमेदरम्यान स्वच्छता केली जाईल. प्रत्येक मंत्रालयाला या मोहिमेसाठी कंबर कसण्यास सांगितले गेले आहे. संरक्षण मंत्रालय उंच ठिकाणांवरील छावण्यांवरील स्वच्छतेसोबतच सर्व छावण्या हागणदारीमुक्त होण्याची काळजी घेईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, खाजगी वृत्त वाहिन्या, एफएम रेडीओ, लघुपट यांच्या मदतीने स्वच्छता कार्यक्रमाचा प्रसार करत आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, स्वच्छ भारत मिशनने अनेक लक्ष्ये समोर ठेवली आहेत. यामध्ये देशभरात २९ लाख ७९ हजार ९४५ घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत, तर ४४ हजार ६५० प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन १००% कचरा जमा केला जात आहे.
स्वच्छ भारत (शहरी) पोर्टलद्वारे मिळणार्‍या त्वरित/प्रत्यक्ष आकडेवारीनुसार, जवळपास २ लाख १९ हजार १६९ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत आणि सध्या ९४.२ मेगावॉट उर्जेची निर्मिती कचर्‍यापासून केली जात आहे. एकूण १ हजार २८६ शहरे हागणदारीमुक्त म्हणून स्व-घोषित झाली आहेत. तसेच ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशनच्या अहवालानुसार, २ ऑक्टोबर २०१४ पासून ४ कोटी ८० लाख ८० हजार ७०७ घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत, तर जवळपास २ लाख ३८ हजार ५३९ गावांनी हागणदारीमुक्तीचे लक्ष्य प्राप्त केले आहे. संकेतस्थळ सांगते, १९६ जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. हागणदारीमुक्त गावे, हा स्वच्छ भारत मिशनमधला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. नीती आयोगाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०१९ पर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी आणखी ५५ दशलक्ष घरगुती शौचालये आणि १ लाख १५ हजार सार्वजनिक शौचालये बांधण्याची गरज आहे. सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड ही संपूर्ण हागणदारीमुक्त राज्ये आहेत. आणखी दहा राज्ये मार्च २०१८ पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करतील.
स्वच्छ भारत मिशन अनेक कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये शैक्षणिक संस्था, शहरे यांची स्वच्छता सूचीवरील क्रमवारी देखील समाविष्ट आहे. परंतु या महत्वाकांक्षी योजनेचे खरे यश सामान्य नागरिकांच्या हातात आहे. सामान्य नागरिकांनी सामाजिक आणि वैयक्तिक स्वच्छतेप्रती अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. आशा करूया २०१९ पर्यंत आपला देश उघड्यावर मलविसर्जन करण्याच्या सवयीपासून मुक्त झालेला असेल.