स्मृतिगंध

0
619

– कालिका बापट

आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या, वाईट घटनांचा आढावा म्हणजे स्मृती, आठवणी. त्या डोकावत असतात आपल्या आयुष्यात, कधी फूल तर कधी काटे बनून. चांगल्या घटना पुढील प्रवासात लाभदायी, सुखदायी होतात, तर वाईट घटनांच्या आठवणी मन बेचैन करतात. या आठवणींचा आपल्या पुढील आयुष्यावर परिणाम होऊ न देता मार्गक्रमण करणे इष्ट होय. तर आयुष्याच्या या प्रवासात काटे चुकवून, फुलं तेवढी वेचावीत म्हणजे या स्मृतींचा गंध आपल्या मनात दरवळत राहील.

झुले बाई झुला
झुला आठवणींचा
आठवणी जन्मास पुरल्या
झुले बाई झुला
झुला आठवणींचा
आठवणी मनात ठसल्या
झुले बाई झुला
झुला आठवणींचा
आठवणींनी पापण्या ओलावल्या
झुले बाई झुला
झुला आठवणींचा
आठवणी मैत्रिणी जाहल्या

बालपणातल्या मैत्रिणी सुटल्या परंतु आठवणी मैत्रिणी बनून सदैव सोबत करतात आणि जगण्याचे भान देत भूतकाळातल्या सुखद क्षणांचा हिंदोळा मनात झुलवतात. आपल्या आयुष्यातल्या आठवणी कधी पाठ सोडत नाहीत. त्या ठाण मांडून बसतात आपल्या मनात, मनाच्या अंतर्गर्भात. आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या, वाईट घटना घडून जातात. त्या सर्वच लक्षात राहतात असे नाही. काही मनाच्या खोल तळाशी साठून राहतात, त्या कधी कधी बोलतात, व्यक्त होतात. आपण आपल्या लहान भावंडांशी, मुलांशी, मैत्रिणींशी या गोष्टी वाटत असतो. त्यांच्याशी बोलताना आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या कितीतरी गोष्टी आपण सहज बोलून जातो. आईने लहानपणी सांगितलेल्या तिच्या माहेरच्या आठवणी, भावाबहिणींशी झालेला वाद, संवाद आणि भांडणेही ती सांगत असते. जर एखादी आपली बहीण दुरावली आहे, ती का दुरावली आहे, त्याचे कारण काय, याविषयीचे विश्लेषण ती करते. हा दुरावा मिटला.. असं वाटतानाच त्यावेळी घडलेल्या गोष्टींच्या आठवणी तिची पाठ सोडत नाही. परंतु आपल्या मुलांना खरं कारण सांगून ती त्या ओझ्यातून मुक्त होत असते. भांडणे काय होतातच. परंतु आपल्या मुलांनी मोठ्या मनाने नातं जपावं या भावनेने त्या आठवणी मुलांना सांगते. ज्याप्रमाणे चांगल्या आठवणी आपण मनाच्या कुपीत दडवून ठेवतो, त्याचप्रमाणे अशा वाईट आठवणीही कधी पाठ सोडत नसल्याने आणी आपल्यातला ईगो संपत नसल्याने या आठवणींना वेगळे वळण लागते. अशा आठवणी सतत मनात रुंजी घालत असल्याने आपण त्यातून सुटत नाही. अशा आठवणी आपल्यात नकारात्मकतेची भावना जागृत करतात. म्हणूनच आपण माफ करणे इष्ट होय. अशा आठवणी विसरता येत नसल्या तरी माफी हेच याचे उत्तर. कारण माणूस बदलतोच बदलतो. निदान त्याला पश्चाताप करण्याची संधी आपण दिली पाहिजे.
जरा मागे वळून पाहताना, आपल्याला कितीतरी गोष्टी अशा आठवतात. त्या घरातील कुठल्या ना कुठल्या गोष्टींशी संबंधित असतात. आपणांस जवळच्या प्रिय व्यक्तीने भेट दिलेली एखादी साडी, मोठ्या कष्टाने पै पै जोडून आणलेला सोफा, लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंशी जोडलेल्या कितीतरी आठवणी असतील. नवीन संसार थाटताना स्वयंपाकघरात लावलेली अन्नपूर्णेची तसबीर, त्या तसबिरीभोवतीदेखील स्मृतींचा खजिना असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या स्मृती अधिक जागृत असतात, असं म्हणतात. कधी आणि केव्हा कुणाशी झालेलं भांडण ती कधीच विसरत नाही. असो.
तर आपल्या घरातील वस्तूंशी निगडित असलेल्या स्मृती चांगल्यापैकी आपण आठवणीत ठेवतो. परंतु काही गोष्टी आपल्या स्मृती-पटलावरून गायब होतात. एखादा किस्सा, एखादी गोष्ट नकळत आपल्या स्मृतीतून अलग होते. आणि मग कधीतरी भावनांच्या कल्लोळात ती पुन्हा जागृत होऊन आपण त्या दिशेने झेपावतो. कधी कधी आपण एखादी गोष्ट कुठे ठेवली आहे, ती विसरतो. नाना प्रयत्न करूनही कसलाच संदर्भ लागत नाही. आणि काळाच्या ओघात पूर्णपणे विसरूनही जातो. केव्हातरी मग अचानक वीज चमकावी तशी डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. ती वस्तू तशीच्या तशी त्या जागेवर आपल्याला सापडते. तो आनंद वेगळाच असतो. स्मृती विस्मृतीत गेलेल्या कितीतरी गोष्टींची आपण पाठ सोडतो, किंवा नकळत, ते आपसूकच तसं होण भाग असतं. नाइलाजास्तव आपल्याला कितीतरी आठवणींना तिलांजली द्यावी लागते. माणूस आंतरिक सुखापेक्षा व्यावहारिक सुखाची कल्पना करत असल्याने काही सुखद स्मृतीही त्याच्यापासून दूर होऊ लागतात. या धकाधकीच्या जीवनात स्मृतींना जागविणे माणसाला कठीण होऊ लागले आहे. काय काय शोधणार आपण या स्मृतींच्या विलक्षण विश्वात. त्यांना वेळच नसतो, एखाद्या क्षणी शांत बसून मागे वळून पाहायला. काही तर म्हणतात, गेले ते गेले. भूतात डोकवायच नाही. परंतु स्मृतीभ्रंश झालेल्या आईवडिलांच्या मुलांनाच या लाखमोलाच्या स्मृतींचे मोल समजते.
हल्ली डिमेंशीया किंवा अल्झायमर्स या आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. अस्तू किंवा माई या चित्रपटामध्ये स्मृती गेलेली व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतात. डॉ. मोहन आगाशे यांनी स्मृती गेलेल्या विद्वान व्यक्तिमत्त्वाची भूमिका अस्तूमध्ये साकारली आहे. आपण कोण आहोत, याचा विसरही त्याला पडतो. अशीच वयोपरत्वे स्मृती गेलेली माणसे आपल्या अवतीभवती असतात. स्मृती गेल्यावर काय होतं, हे अशा माणसांना कळणे कठीण. जवळच्यांच्या मात्र आपल्या माणसांच्या या अचानक झालेल्या बदलामुळे मनावर आघात होतो. आपले बुद्धिवान आईवडील अशा आजाराला बळी पडून सर्वस्व गमावून बसल्याचे दुख त्रासदायक असते. माझ्या मैत्रिणीच्या सासर्‍याला हा आजार आहे. आपण व्यवसायाने सराफ आहे, हेही तो विसरला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलालाही तो ओळखत नाही. याहून दुख ते कोणते. अशा असतात या स्मृती. काहींची पाठ सोडत नाही तर काहींना अर्ध्या वाटेवर सोडून जातात. एकीकडे आपण आपल्या स्मृतींचा गंध अनुभवत असतो, तर आपल्याच समाजातील हा महत्त्वाचा असा घटक स्मृतीभ्रंशास बळी पडलेला दिसतो. आठवणी, स्मृतींविषयी बोलताना ओघा ओघाने वरील मुद्दा आला.
आपण ज्याप्रमाणे आपल्या स्मृतींच्या भरवशावर आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे पुढेही आपल्या आयुष्यात चांगल्या आठवणी असाव्यात या उद्देशाने चांगले कर्म करायला हवे. कारण कर्माची फळं चांगल्या आठवणी बनून आपली सोबत करतात. आपल्या स्मृतींचा गंध इतरांपर्यंतही पोचायला हवा असेल तर मग चांगल्याचीच, बर्‍याचीच कास धरावी लागते. स्मृती, आठवणींविषयी बोलताना अधिकतर बाल्य आणि तारुण्यातल्या स्मृती आपल्याला अधिक आठवत असतात. या दोन्हीही काळात आपण नव्याची, उंच उडण्याची स्वप्ने उराशी बाळगून असतो. या काळातील घटनांचा आपल्या जीवनाशी अधिक संबंध असतो. वयोपरत्वे आपण जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली काही घटनांकडे दुर्लक्ष करीत असतो. त्यामुळे त्या आठवणी ओझरत्या आपल्या लक्षात राहतात. बालपणातल्या स्मृती मात्र आपण कधीच विसरत नाही. आणि तारुण्यातल्या तर शक्यच नाही म्हणा. मनातली गुपितं, त्यातल्या रंगीबेरंगी आठवणी मोहपाशात अडकवणार्‍या. कुणीही, कितीही सांगोत आपण विसरून गेलोय सारं. या काळातल्या स्मृती आणि त्यांचा गंध हवाहवासा वाटणारा. त्यामुळे त्या आठवणी पुन्हा पुन्हा भविष्यात डोकावून पाहिल्याशिवाय आपण राहत नाही. काहींच्या आयुष्यात वाईट घटना घडून गेलेल्या असतात. त्या स्मृती बनून त्यांच्या मागे लागलेल्या असतात. यातून काही बाहेर येतात तर काहींना यातना भोगाव्या लागतात.
तर या स्मृती, आठवणी आपल्या आयुष्यात डोकावतात म्हणून तर आपल्या जगण्याला अर्थ आहे. बुद्धी तल्लख असली म्हणजे स्मृती चांगली राहते असं म्हणतात. त्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा असल्याचेही सांगतात. परंतु या सर्वांबरोबरच सर्वांत महत्त्वाची आहे ती साधना. आपल्या कामाविषयीची निष्ठा आणि आदर हीच साधना मानून कार्य केल्यास स्मृतींचा गोंधळ होत नाही. त्या स्मृतींचा गंध चारी दिशांना पसरून कीर्तिमान, दैदीप्यमान असे सफल आयुष्य बनते.