स्मृतिगंधातील ‘देऊळवाडा’

0
346
  •  शरत्चंद्र देशप्रभू

दत्तजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर श्री. अशोक कामत यांच्या पंचाहत्तरीचा समारंभ महालक्ष्मी मंदिराच्या नूतन सभागृहात आयोजित केला होता. श्री. कामत माझ्याशी त्रिसूत्री नात्याने जोडलेले. शेजारी, मित्र अन् मजूर खात्यातील सहकारी. सत्यदत्त पूजा विद्याधिराज सभागृहात, तर स्वागतसमारंभ वरच्या सभागृहात. प्रवेशद्वारावर गाडी थांबल्यावर मनात आमच्या चाळीतील वास्तव्यासंदर्भातील फार जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रेडकर चाळीत आमचा मुक्काम १९५४ ते ५७ असा तीन-साडेतीन वर्षे होता. १९५७ साली आमचा या जागेशी संपर्क तुटला. कारण वडिलांची डिचोलीला बदली झाली होती.

सरकारी सेवेत असल्यामुळे वडिलांची बदली विविध गावांत, शहरांत होत होती. जीवनात खूप स्थित्यंतरे झाली. १९६२ जुलैच्या दरम्यान पणजीत पुनर्गमन झाले. रेडकर चाळीतील माणसांशी थोडाफार संपर्क साधता आला. परंतु व्यवधानामुळे मला व्यक्तिशः या जागेला भेट देण्याचा योग आला नव्हता. योग आला नाही म्हणणे असयुक्तिक ठरेल; दुर्लक्षच झाले, कानाडोळाच झाला असे म्हणावे लागेल. रेडकरांची ही जागा आल्तिनो टेकडीवर जाणार्‍या रस्त्याच्या उजव्या बाजूला. केणी यांच्या बंगल्याजवळून निमुळती वाट आहे. तसेच झरीच्या बाजूने सरदेसाईंच्या दोन भव्य वाड्यांच्या लगत पण रस्ता आहे. पायीच जायचे झाले तर महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारातून जायला दोन शिड्या आहेत.

श्री. उमेश कामतांचा समारंभ आटोपून घरी जाताना ठरवले की या रेडकर चाळीला भेट द्यायची. विलंब करायचा नाही. आता कुणाचाच भरवसा नसतो. कालचा मनुष्य आज दिसत नाही अन् आजचा उद्या दिसणार याची शाश्‍वती नसते. मनात विचार आले की, काळाच्या ओघात जवळची माणसे, शेजारी दूर होतात. संबंध बिघडलेले नसतात, परंतु जीवनच अशी कलाटणी घेते की प्रवासात नवे चेहरे भेटतात, गाठीभेटी होतात; परंतु निरगाठी निर्माण होत नाहीत. आपुलकीतली ऊब निवत जाते, नात्यातील वीण विस्कळीत होते. हे सारे नकळत घडते. यातून कटुता पण येत नाही. हे सारे सहजपणे घडते. बंध सुटताना जाणीव होत नाही. आपल्या कोशात आत्ममग्न असताना या निसटत्या बंधाची, क्षणाची नोंद पण घेतली जात नाही. अकस्मात भेट झाली तर आठवणींच्या रम्य जगात विहार होतो. परंतु तो त्या क्षणापुरता. यामुळेच मी ठरवले की मनाच्या कोपर्‍यात जपलेल्या हळुवार स्मरणकोशात हळूच डोकवावे अन् एक विलक्षण अनुभूतीच्या आविष्काराला उत्कटपणे भिडावे. श्री. सुरेश च्यारीच्या अकस्मात झालेल्या भेटीने तर परिसराला भेटल्याची प्रेरणाच मिळाली. सुरेश च्यारी माझा मुष्ठिफंड शाळेतील वर्गमित्र अन् त्यावेळचा शेजारी.

मागच्या शुक्रवारी बासष्ट वर्षांच्या कालावधीनंतर रेडकर चाळीशी गळाभेट झाली. १९५४ साली या घरात आम्ही मुक्काम पेडण्याहून हलविला. त्यापूर्वी माझे वडील याच जागेत केंकरे बंधुद्वयांसोबत पोर्तुगीज शिक्षणासाठी राहिले होते. कै. फटूबाब केंकरे व यू. बी. केंकरे हे आमच्या वडिलांचे सहाध्याची. हे बंधू मूळ कुंभारजुवे येथील प्रख्यात केंकरे घराण्यातील. कालांतराने ते कालापूरला स्थायिक झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर केंकरेबंधूंनी जागा रिकामी करण्याचा मनोदय व्यक्त केला. वडिलांना पण बिर्‍हाडाची गरज होती. चाळीचे मालक कै. दाजी रेडकर पण दिलदार स्वभावाचे. ते तत्परतेने तयार झाले आणि आम्ही या चाळीत प्रवेश केला. त्यावेळची पणजी म्हणजे शहर अन् गाव यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारी. आजच्या भाषेत बोलायचे तर ‘टाऊन!’ पेडणे सोडल्यावर हे आमचे पहिलेवहिले बिर्‍हाड. परंतु या वास्तव्याच्या खुणा बालमनात कायमच्या रूतल्या. त्या काळचा देऊळवाडा म्हणजे पावित्र्याने भरलेले वातावरण, मांगल्याने ओसंडून गेलेला भक्तिभाव. श्री महालक्ष्मीदेवीच्या अस्तित्वाचा प्रभाव प्रखरपणे जाणवत होता. चैत्र पौर्णिमा रथसप्तमीला हे उत्सव समर्पित भावाने साजरे होत. दोन्ही उत्सवप्रसंगी रथ नाचवताना एक आगळाच माहोल निर्माण होत असे. झरीजवळ आल्यावर तर रथ नाचविणार्‍यांचा अन् भाविकांचा उत्साह उधाणलेला. लयबद्ध परंतु जोरकसपणे वाड्याच्या ताळावरून रथ नाचविणे, गरगरा फिरवणे हे आता होणे नाही. या उत्सवानिमित्ताने समराधना होत असे. मंदिराचे महाजन तसेच शहरातील लोक उपस्थित असत. एक प्रकारचे गावजेवणच. सार्‍या समाजातील, सर्व स्तरांतील लोकांचा सहभाग असे. अजूनही ही परंपरा चालू आहे. परंतु देवळातील वयोवृद्ध पुजार्‍याच्या म्हणण्यानुसार मंदिरातील नाटके बंद झाल्यातच जमा! चैत्र पुनवेला सांकेतिक अर्थाने ही परंपरा पाळली जाते. वर्षाला तेहतीस नाटके होणार्‍या मंदिरात आता महाप्रसादाच्या निमित्ताने होणार्‍या जेवणावळीची संख्या वाढली. अन्नदान म्हणजे पुण्यसंचय. ज्यांच्या घरी अन्न शिजत नाही अशांना या जेवणावळी म्हणजे अलभ्य लाभच! नागपंचमी सप्ताहात मात्र आता संगीत मैफली रसिकांसाठी सादर केल्या जातात.

रेडकर चाळीतल्या परिसराला भेट दिल्यावर या जुन्या आठवणी जागृत झाल्या. या परिसरात तसे जास्त बदल दिसले नाहीत. चाळीचे मालक कै. दाजी रेडकर चाळीच्या दर्शनी प्रशस्त भागात राहत असत. त्यांच्या लगतच आमची जागा भिंतीला जोडून होती. जागा आम्हाला अपुरीच वाटायची. कारण प्रशस्त अशा पेडण्यातील जागेतून स्थित्यंतर झालेले. आमच्या जागेला खेटूनच साळगावकर कुटुंबीय राहत असत. कमलाकांत साळगावकर हा आमच्याहून वयाने मोठा, परंतु आमच्यात मिसळणारा. तेल चोपडून केसाचा कोंबडा काढण्यात हा सराईत. तेच खोबरेल तो आपल्या पठाणी पठडीतील वहाणांना कापसाने लावत असे. कदाचित बूट पॉलिश उपलब्ध नसेल किंवा परवडत नसेल. हा मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा कमलाकांत कायम आमच्या पेडण्याच्या भाषेवर चेष्टा करायचा. चांगला हेल काढून. १९६४ च्या दरम्यान याचा त्याच्या जीवलग मित्राकडून खून झाला. गोव्यात त्यावेळी बरीच खळबळ माजल्याची आठवते. आम्ही सारे कुटुंबीय गलबलून गेल्याचे स्मरते. साळगावकरच्या बिर्‍हाडाजवळच देसाई यांचे कुटुंब राहत होते. यांचा मला वाटते आईस्क्रीमचा धंदा होता. मनोरमा नावाच्या या घरातील स्त्रीची आमच्या आईशी जवळीक झाली होती. या चाळीच्या विरुद्ध जागेत आणखी एक इमारत होती. तळमजल्यावर एक गुजराथी कुटुंब राहत होते. यांचा चंपक नावाचा मुलगा आमचा मित्रच झाला होता. वरच्या भागात त्यावेळचे लिसेवचे प्रोफेसर यशवंतराव तळावलीकर राहत. हे सुप्रसिद्ध केणी घराण्याचे जामात. या बिर्‍हाडाला रस्त्यालगत प्रवेशद्वार होते. तसेच आतून एक जिना होता. हळदीकुंकवाच्या निमित्ताने या जिन्याचे दार उघडले जात असे. यशवंतराव तळावलीकरांशी आमचे हृद्य संबंध होते. वृद्धापकाली त्यांचे वास्तव्य मुंबईला पेडररोडवर चिरंजीवासोबत होते. यांचे चिरंजीव टाटा समूहात उच्चपदावर होते. तळावलीकरांना त्याकाळी मोठा मान होता. आजोबांशी त्यांचे चांगलेच हितगुज जमले होते. कारण दोघे पोर्तुगीज भाषेेचे व्यासंगी. चाळीच्या मागच्या बाजूला चिखलीकर कुटुंबीय राहत असत. हा पण भाग रेडकरांचा असावा. च्यारी कुटुंबीयांचे घर आल्तिनो रस्त्याच्या उजव्या वळणावर. तिथून थोड्याच अंतरावर ही रेडकरांची चाळ. कै. जनोराम रेडकर यांनी रेड्डीहून येऊन ही स्थावर मालमत्ता संपादित केली. त्यात निर्मिती केली. मिठागरे निर्माण केली. कुडचड्यात व्यापाराची एक शाखा उघडली. त्यांच्या हयातीत व्यापाराने बरीच मोठी झेप घेतली. देवकार्य व समाजकार्यात कै. जनोरामनी सिंहाचा वाटा उचलला. मारुतीगडावरील पुरातन मंदिर म्हणजे त्यांचेच योगदान. आजच्या भेटीत पण मला या परिसरात जास्त बदल जाणवला नाही. तुळशीवृंदावन, लोखंडी प्रवेशद्वार, बाहेरची खोल विहीर सारे जशास तसे आहे. आमची जागा अपुरी असली तरी कै. दाजी रेडकरांची जागा आम्ही हक्काने वापरत असू. नातेवाईकांचे येणे-जाणे चालूच होते. त्यांची झोपण्याची व्यवस्था दाजींच्या जागेत. मालक व भाडेकरू यांचे त्याकाळचे संबंध सलोख्याचे नव्हे तर जिव्हाळ्याचे होते.
मालकांचे घर गिळंकृत करण्याची मनीषा कोणी भाडेकरू बाळगत नसे. कै. दाजींच्या घराबाहेरची जागा अरूंद होती. उजव्या बाजूला खोलगट भाग होता. या भागात छोटी झोपडीवजा घरे होती. अजून आठवतं, या घरातील एक म्हातारी जिचं डोकं कायमचं हलत्या स्थितीत असे. तशाच परिस्थितीत ती पापड, सांडगे वाळत घालत असे. त्यावेळी आम्हाला काही वाटत नसे. आता आठवण झाल्यावर मन खिन्न होते. या अरुंद रस्त्यावर उजव्या बाजूची जागा निमुळती होती. या निमुळत्या जागेवर धावण्याच्या शर्यतीत आमची दमछाक होत असे. परंतु कडेला असलेल्या चाफ्याच्या झाडाचा आधार होता, नाहीतर आमचा कपाळमोक्ष ठरलेलाच. त्या छोट्या घराच्या पाठीमागे लाकडी संडास होता. त्याकाळी डोक्यावरून मैला वाहून नेण्याची प्रथा होती. परंतु दाजी रेडकरनी चाळकर्‍यांसाठी एका ओळीत चार ते पाच संडासांची व्यवस्था केली होती. कै. काकासाहेब म्हणजे श्रीमंत आरोबेकर देसाई हे आमचे आजोबा (आईचे वडील). यांना संडासाची ऍलर्जी. यामुळे ते प्रातःविधीसाठी आल्तिनो टेकडीचा मार्ग धरत. त्याकाळी आल्तिनो वनश्रीने नटलेली. आता गोव्यात उघड्यावर विधी करणे आपोआप बंद होत आहे. कारण वनश्रीच लुप्त झाली आहे. एका परीने ही वाईट प्रथा बंद होते आहे हे चांगलेच. कै. दाजीच्या घरात एक ऑफिससाठी जागा होती.

दाजींच्या चिरंजीवाशी म्हणजे विनायकशी बोलताना मन जुन्या आठवणींनी गहिवरून आले. आजारी असूनसुद्धा विनायकच्या चेहर्‍यावर जुन्या स्मृती जागवताना आनंद ओसंडून वाहात होता. परिसर तर जास्त बदलला नव्हता. रस्त्याचे सपाटीकरण झाले असून जागेची धूप झाल्याचे संकेत मिळत होते. आणि आम्ही घाबरत असलेल्या रस्त्याच्या निमुळत्या बाजूला छोटा पण भक्कम कठडा आला आहे. सारा परिसर तोच आहे, परंतु त्यावेळी बालमनाला तो भव्य वाटत असे. विनायकाकडून माहिती निघत होती. सारे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले होते. कै. दाजी रेडकरांच्या पत्नी ज्यांना सारा परिसर ‘वैनी’ नावाने ओळखत होता, त्या स्वभावानं शांत अन् परिपक्व व्यक्तिमत्त्व लाभलेल्या. अजून मला आठवते, त्या गॅलरीतल्या लाकडी बाकावर एक पाय दुमडून बसायच्या अन् शेजारी बायकांचा घोळका. त्यांच्या देहबोलीत एक आश्‍वासक वलय होतं. त्यामुळे माझी आईसुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होत होती. विनायककडून एक एक घटना उलगडत होती अन् मन खिन्न होत होते. विनायकच्या बहिणी विमल, कुसूम आणि छोटी बहीण महानंदा पण आता हयात नाहीत. महानंदा तर माझ्या वर्गात होती. सरस्वती पूजनानिमित्त पाटीवर रेखाटलेले सरस्वतीचे चित्र आठवते. धावण्याची शर्यत आठवते. सार्‍या मुलांनी खेळलेल्या भेंड्या आठवतात. निरागस बाललीला अजून कोमेजल्या नव्हत्या. स्मृतींना पुनर्प्रत्ययाचा आनंद अन् माणसे दुरावलेल्या दुःखाची किनार लाभली होती. मधू व विनायक रेडकर हे आमच्यापेक्षा वयाने मोठे, परंतु कोयणेबाला खेळताना वयाची जाणीव होत नाही. चाळीच्या मागच्या भागात राहत असलेले चिखलीकर कुटुंबीयांची माहिती मिळत होती. यातील रामा हा माझ्या थोरल्या भावाचा वर्गमित्र. परंतु बुद्धिमान असूनही पुढे शिकू शकला नाही. त्याचा थोरला भाऊ कै. रत्नाकर आम्ही ताळगावला असताना आईसफ्रूट विकत असताना भेटला. यांचीच एक बहीण होती सरस्वती, तिची विनायकने आठवण करून दिली. सरस्वती अन् विनायक हे इतिहासाचे साक्षीदार अजून हयात आहेत.

विनायकची सून आतिथ्यशील. ओळख नसताना आगतस्वागत केले. घरामागच्या ओहोळाची जागा दाखवली. आम्ही राहत होतो ती जागा दाखवली. आमचे नातेवाईक झोपत असत ती कै. दाजींच्या घरातील जागा दाखवली. आता या सार्‍याला नवा साज आला आहे. परंतु मायेची ऊब तीच आहे. च्यारी कुटुंबीयांचे घर पाहिले. समोरच मामी या नावाने ओळखली जाणारी मध्यमवयीन स्त्री आपल्या आशा या मुलीबरोबर राहत होती. आम्ही ही जागा सोडली अन् त्यात कै. गुरुनाथ सरदेसाईंनी (गृहखाते) बिर्‍हाड थाटले. देऊळवाड्यातील आता भव्य वाडे ओस पडत चालले आहेत. सरदेसाई, कैसरे, सिंगबाळ, आरस, खरखटे यांची कितीतरी घरे येथे आहेत. अजून देऊळवाडा आपले अस्तित्व राखून आहे. इतर भागांतील पणजीकर गिरगावकरसारखा बाहेर फेकला जात आहे किंबहुना स्वतःच फेकून आहे. पर्वरी, मिरामार, दोनापावल येथे स्थलांतरित होत आहेत. जुन्या वाड्यांची जागा व्यापारी संकुलांनी घेतलेली आहे. त्यामानाने देऊळवाड्याने आपली ओळख, संस्कृती जपलेली दिसते आहे. गोव्यात प्रगतीची गती मती कुंठित करणारी. सांस्कृतिक, सामाजिक चौकटी विस्कटून टाकणारी असंवेदनशील प्रगती जरी नेत्रदीपक असली तरी ती गोव्याला भविष्यात मारकच. या सार्‍या कोलाहलात देऊळवाड्याने आपल्या शांत सहजीवनाला तडा येऊ दिला नाही. आधुनिकतेचा साज अन् परंपरागत ओळखीचा बाज घेऊन देऊळवाडा वाटचाल करत आहे. श्री महालक्ष्मीचा वरदहस्त या वाड्यावर आहे.