स्मार्ट सिटी : भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने फेटाळले

0
204

पणजी ‘स्मार्ट सिटी’च्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा कॉंग्रेस पक्षाने केलेला आरोप काल भाजपने फेटाळून लावला. खासदार बोलताना नरेंद्र सावईकर म्हणाले की, सिध्दार्थ कुंकळ्येंकर यानी पणजीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उडी घेतल्यानंतरच कॉंग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावरुन हे आरोप खोटे आहेत हे सिध्द होत आहे.

सिध्दार्थ कुंकळ्येकर यानी पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच गिरीश चोडणकर यांना स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले काय, असा प्रश्‍न सावईकर यानी यावेळी केला.

झेब्रा क्रॉसिंगसाठी अद्याप
कामाचा आदेशही नाही
पणजीत झेब्रा क्रॉसिंगसाठी ३५ लाख रु. खर्च करण्यात आल्याचा आरोप चोडणकर यानी केला असल्याचे सांगून सावईकर म्हणाले की हे काम अजून सुरूच झालेले नसून अजून कुणाला त्यासाठी ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आलेली नाही. जुन्या सचिवालयातही स्मार्ट सिटीसाठी फर्निचरची खरेदी करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुने सचिवालय हे वारसा विभागामध्ये येत असून तेथे सार्वजनिक वापरासाठीच्या वस्तूंची सोय करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. स्मार्ट सिटीचे काम पूर्ण पारदर्शकपणे करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतही पारदर्शकता आहे, असे सावईकर म्हणाले.
पणजी ते रायबंदर ह्या दरम्यान भू वीज वाहिन्या घालण्याचे काम ४ एप्रिल रोजी सुरू झाले होते. हे काम ३० टक्के पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले.