स्पोर्टिंगने वास्कोला बरोबरीत रोखले

0
257

>> गोवा प्रो-लीग

स्पोर्टिंग क्लब दी गोवाने दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करताना वास्को स्पोर्ट्‌स क्लबला २-२ असे बरोबरीत रोखत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल धुळेर स्टेडियमवरील सामन्यात गुण विभागून घेतले.

बरोबरीमुळे स्पोर्टिंगचे ४४ गुण झाले असून ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत. तर वास्को स्पोर्ट्‌स क्लबने आपल्या शेवटच्या सामन्यातील बरोबरीसह २० गुणांसह अभियानाची समाप्ती केली.
अनिल गावकर (६वे मिनिट) आणि मॅथ्यू कुलासो (७३वे मिनिट) यांनी वास्कोचे तर फिलिप ओडोग्वू (२७वे मिनिट) आणि जोसेफ क्लेमंेंत (९०+३वे मिनिट) यांनी स्पोर्टिंगचे गोल नोंदविले.

वास्को स्पोर्ट्‌स क्लबने आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या प्रारंभीच ६व्या मिनिटाला आपले खाते खोलले. मायनू दादानुवूरने लांबवरून दिलेल्या पासवर स्पोर्टिंगचा गोलरक्षक अक्षत हडकोणकरने नियंत्रण मिळविण्यापूर्वीच वास्कोचा कर्णधार अनिल गावकरने ताबा मिळवित चेडूला जाळीची दिशा दाखवित संघाला १-० अशा आघाडीवर नेले. १७व्या मिनिटाला वास्कोला आपली आघाडी वाढविण्याची संधी चालून आली होती. परंतु सुरज मोंडलकडून मिळालेल्या अचूक पासवर मॅथ्यूने घेतलेला फटका स्पोर्टिंगचा गोलरक्षक अक्षतच्या हातात जाऊन विसावला.

अखेर २७व्या मिनिटाला स्पोर्टिंगने बरोबरी साधण्यात यश मिळविले. जॉर्जने घेतलेल्या कॉनंर किकवर फिलिप ओडोग्वूने हा स्पोर्टिंगला १-१ अशी बरोबरी साधून देणारा हा गोल नोंदविला. पहिल्या सत्रात दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत राहिले.
दुसर्‍या सत्रात ७३व्या मिनिटाला वास्कोने गोल नोंदविला. शेल्डनकडून मिळालेल्या पासवर मॅथ्यू कुलासोने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला कोणतीही संधी न देता वास्कोला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

वास्को हा सामना जिंकून पूर्ण गुण मिळविणार असे वाटत असताना इंज्युरु वेळेच्या तिसर्‍या मिनिटाला अनिलने ऍझम्प्शनला धोकादायक कक्षेत अवैधरित्या खाली पाडल्याने रेफ्रीने स्पोर्टिंगला पेनाल्टी बहाल केली. त्यावर कोणतीही चूक न करता जोसेफ क्लेमेंतने वास्कोच्या गोलरक्षकाला चकवित संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.