स्पेनचा उपांत्य फेरीत प्रवेश

0
177

जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काल इराणला ३-१ असे पराजित करत स्पेनने फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी होणार्‍या उपांत्य फेरीतील लढतीत त्यांना आफ्रिकन विजेत्या माली संघाशी दोन हात करावे लागतील.

इराण संघावर विजय मिळविण्यासाठी स्पेनला अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. युरोपियन विजेत्या स्पेनने पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत आपला दरारा कायम राखला. पहिल्या पंधरा मिनिटांचा खेळ पूर्ण होण्यापूर्वीच स्पेनने आपला पहिला गोल केला. स्पेनचा कर्णधार आबेल रुईझ याने १३व्या मिनिटाला इराणचा गोलरक्षक अली गुलाम झादे याला चकवून हा गोल केला. यानंतर काही मिनिटांतच स्पेनचा संघ आघाडी दुप्पट करण्याच्या उंबरठ्यावर होता. मात्र, सीझर गिलबर्ट याचा फटका उंच झेपावत क्रॉसबारवरून ढकलून अली गुलाम याने स्पेनचा हा प्रयत्न निष्फळ ठरवला. तासाभराचा खेळ पूर्ण झालेला असतानाच ६०व्या मिनिटाला स्पेनने इराणची बचावफळी दुसर्‍यांदा भेदली. फेर्रान टॉरेस याच्या पासवर सर्जियो गोमेझ याने आपल्या डाव्या पायाने लांब अंतरावरून जोरदार किक लगावताना इराणच्या गोलरक्षकाला चेंडू अडविण्याची कोणतीही संधी दिली नाही. ६७व्या मिनिटाला स्पेनने आपला तिसरा गोल लगावला. फेर्रान टॉरेस याने मोहम्मद मुखलिसच्या जमिनीलगतच्या क्रॉसवर हा गोल केला. इराणच्या सईद करिमी याने ६९व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. परंतु, यानंतर त्यांचा संघ गोल नोंदविण्याच्या जवळपासही गेला नाही.