स्नेहसोहळा

0
349

सौ. भाग्यश्री केदार कुलकर्णी

 

भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन ’तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन करतो. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील एक अनमोल ठेवा आहे.

आज आपण मकर संक्रांतीविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेणारच आहोत, पण या सणाविषयी नव्याने समोर येणार्‍या संकल्पनाही, आज या विषयाचे आकर्षण नक्कीच ठरतील असे वाटते. पारंपरिकता टिकवण्यामागे कुठलेही राज्य किंवा देश कधीच मागे नसतो. तसेच जुने आणि नवीन यांमधला योग्य सुवर्णमध्य साधून ही पारंपरिकता जपण्यातही हा आधुनिक काळ मागे नाही. जसं कपड्यांमध्ये नवनवीन फॅशन्स येऊनदेखील नऊवारी आजही तितक्याच आवडीने नेसली जाते, तसेच पक्वान्नांचेही आहे. कुठेतरी आपला तडका किंवा तो टच असतोच. मग हे वेगवेगळे सण साजरे करण्यातही नावीन्य, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी या गोष्टींचा समावेश करून नवीन पद्धती उदयास येतात.

संक्रांत साजरी करण्याच्याही काही वेगवेगळ्या संकल्पना निदर्शनास आल्या, त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:|
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि॥
मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.
काही महिला मंडळे वृद्धाश्रमात जाऊन प्रेमाचे वाण देऊन पुण्य कमावतात, तर काही शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून देणगी देतात. काही महिला संघटना अशा आहेत की ज्या अनाथाश्रमात पुस्तकं, वस्त्रदान, अन्नदान करतात. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी समाजाप्रती कर्तव्याची जाण ठेवून केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.

आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा.
तसं पाहिलं तर प्रत्येक राज्यात पाऊस ही चिंताजनक बाब आहे हे लक्षात घेता मला वाटते प्रत्येक सुवासिनीने रोपवाटिका देऊन पर्यावरण संवर्धनाचा वसा घ्यावा, जेणेकरून यान्वये हरित संक्रांतीची लाट येईल. आणि ही लाट आली की, पर्यायाने वनसंवर्धन, पशु-पक्षी-प्राणी संवर्धन घडून येईल.
मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते. फार वर्षांपूर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.
महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत.

पूर्वीच्या काळी बायका अंगावर जेवढे असेल तेवढे सोन्या-चांदीचे अलंकार का परिधान करायच्या? तर दाखवण्यासाठी म्हणून नाही तर सोन्या-चांदीच्या धातूंमधून शरीरातील पृथ्वीतत्त्व आणि आकाशतत्त्वाचा समतोल राखला जातो. कारण स्त्रीकडे ९०% ऊर्जा असते जी आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या माध्यमातून प्रदान करत असते. मग ती सुंदर दिसण्यातून, बोलण्यातून, तिच्या स्वयंपाकातून वगैरे असो. म्हणून या सौभाग्याच्या वस्तूंचे विशेष महत्त्व.

लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू (कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर इ.) देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात. लग्नानंतर येणारी संक्रांत नवीन सुनेच्या कोडकौतुकाची असते. तशीच बाळाच्याही कौतुकाची असते. काही घरांत तर पहिल्या संक्रांत सणाला हळद-कुंकवाच्या राशी टेबलावर मांडतात. त्यातून प्रत्येकीला आपल्याला हवे तेवढे घ्यायला सांगतात. नवीन सुनेला काळी साडी, हलव्याचे दागिने घातले जातात. गळ्यात हार, मंगळसूत्र, बिंदी, कानातले, कमरपट्टा, बाजूबंद या अन् अशा अनेक प्रकारचे हलव्याचे दागिने कित्येक हौशी बायका करतात. ते बनवणे ही एक कलाच आहे. हल्ली हे दागिने बनवण्याच्या स्पर्धाही काही ठिकाणी आयोजित केल्या जातात. अनेकदा महिलेच्या नवर्‍याच्याही गळ्यात मोठा हार व हातात हलव्यांनी सजवलेला नारळ दिला जातो.

नवीन बाळाला (वर्षाच्या आतील) ’बोरन्हाण’ केलं जातं. लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांनी बाळाला सजवतात. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या यांसारख्या मुलांना आवडणार्‍या वस्तू सोडतात व इतर मुलेही त्याचा आनंद घेतात. या अन् अशा अनेक पद्धती आपल्यात आहेत. यामागील उद्देश रूढी नसून नव्याचे स्वागत करणे व त्यातून आनंद घेणे हा आहे. आपल्या शेतातल्या पेरणीतून उगवलेला हा वानोळा एकमेकींना देणे ही सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेली रूढी आहे.

पूर्वी एकत्र येण्याची संधी बायकांना दुर्मीळ होती, त्यामुळेच ही प्रथा निर्माण झाली असावी. या वस्तू लुटण्याच्या निमित्ताने संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत एकमेकींकडे जाता येते. सगळ्यात गमतीचा मुद्दा हा की, रथसप्तमीपर्यंत रोज १० दिवस वेगवेगळ्या रंगांच्या, दुर्लक्षित झालेल्या साड्या घालण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. भेटण्याचा आनंद, संधी आजच्या काळातही हवीच. त्यानिमित्ताने पुन्हा नातलग, मैत्रिणी एकत्र येतात, यातून प्रेमाच्या ऊर्जेची एकमेकींना देवाण-घेवाण करता येते, हाच खरा यामागचा अर्थ.
गुळाची पोळी हे या सणाचे वैशिष्ट्य. तिळाचे लाडू किंवा वड्या याही या सणाच्या निमित्तानेच बनतात. या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोरं हे शेतातले नवीन उत्पन्न होते. त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याचाही प्रघात आहे.
वर उल्लेखलेले सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणं सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ व तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलवून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात, तर काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला ’सुगड’ असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन ’तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तीळगूळ दिले जाते.

दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. हा सण हिवाळ्यात येत असतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करत असतो. या दिवसापासून दिवस तिळा-तिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे.

भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने संक्रांत सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये आकाशात रंगबेरंगी पतंग उडवून, तर महाराष्ट्रात नवदांपत्यांना, नुकत्याच जन्मलेल्या बालकांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.

आपल्या संस्कृतीत निसर्गाची आणि सणांची किती कुशलतेने सांगड घातली गेली आहे, हे पाहून नवल वाटते. ऋतुमानानुसार वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते. त्यावर गुणकारी ठरणारी औषधी वनस्पती, फळे वगैरे निसर्ग त्या-त्या ऋतूत निर्माण करतो. सणावारांच्या माध्यमातून हे सृष्टीतील नैसर्गिक रोगप्रतिकारक खाद्य आपसूकच माणसाच्या पोटात जाते. त्यादृष्टीने विचार करायचा तर थंडीच्या दिवसांत शुष्क झालेल्या शरीरासाठी स्निग्ध तीळ आणि मधुर गुळाशिवाय दुसरे आणखी कोणते योग्य औषध असू शकते, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. निसर्ग आणि माणसाचे अतूट नातेही या सणाच्या निमित्ताने पाहायला मिळते.

या कालावधीत शेतात हिरवीगार पिके डोलत असतात. त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याचाही उद्देश या सणामागे आहे. या काळात अमावस्येच्या निमित्ताने शेतातील धान्याची पूजा केली जाते. या दिवशी कुटुंबीय, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रपरिवार यांच्यासह शेतात भोजन करण्याची प्रथा आहे. या दिवसांत गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, बोरे ही पिके ऐन भरात असतात. साहजिकच त्यांचा या सणासाठी आवर्जून वापर केला जातो. त्यातून एक प्रकारे या पिकांची पूजा होते आणि काळ्या आईचे ऋणही व्यक्त केले जाते. संक्रांतीच्या दिवशी महिला पाच घट (सुगड), दोन वेळण्या, पाच बोळकी आणून त्यास हळद-कुंकू लावतात. त्यामध्ये सुपारी, तीळ, गहू, कापूस, ऊस, बोरे, भुईमुगाच्या शेंगा, हळकुंड, पैसे घालून वायन म्हणून दान देतात.
भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो; मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान करतात.
मकर संक्रातीचा कुलाचार तीन दिवसांचा असतो. पहिल्या संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते. दुसर्‍या दिवशी संक्रांत व तिसरा किंक्रांतीने या सणाचा आनंदाने समारोप होत असतो.