स्नेहवर्धनातून ज्ञानसंवर्धन व्हावे!

0
284

 – मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर
(म्हापसा)

कपाळाला नुसतंच हळदकुंकू लावून वाणं वाटण्याचा खर्च वाचवावा आणि त्या जमलेल्या पैशातून थोडी पुस्तकं खरेदी करुन वाचनालय उघडावे. यातून या सणाद्वारे होणार्‍या स्नेहवर्धनाला ज्ञानसंवर्धनाचीही जोड मिळेल. सणांचा उपयोग केवळ मौजमजेकरता किंवा मनोरंजनाकरिता न करता समाजाच्या बौद्धिक विकासाकरिताही केला जावा.

भारतीय हिंदू सणांपैकी मकर संक्रांतीचा सण स्नेहवर्धक म्हणून मानला जातो. वर्षाच्या शुभारंभी महिन्यातच म्हणजे जानेवारीमध्येच येणारा हा पहिला सण. कोणताही सण साजरा करण्यामागे धार्मिक, पौराणिक, सामाजिक, भौगोलिक, राष्ट्रीय अशा विविध दृष्टीने विविध प्रयोजनं असतात. मकर संक्रांत साजरी करण्यामागे एक भौगोलिक कारण आहे. नभोमंडळातील सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे मार्गक्रमण करतो. म्हणजेच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. थोडक्यात सूर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकत जाते. संपूर्ण वर्षात सूर्य चार वेळा बारा राशीतून संक्रमण करतो. उत्तरायण काळात तो धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. याच काळात भारतीयांना जास्तीत जास्त उष्णता आणि प्रकाश मिळतो. त्यामुळे धनधान्य विपुल प्रमाणात मिळते. समृद्धी येते. आपला भारत देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तेव्हा शेतकरी महिला आपल्या शेतात पिकलेल्या धान्याचं दान वाणाच्या रूपात देत असत. थंडीचे दिवस असल्याने तीळ, ऊस, शेंगदाणे, गहू, बाजरी अशी उष्ण प्रकृतीची धान्ये दानात दिली जात जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण व्हावी हा उद्देश असे.

एक आख्यायिका हा सण साजरा करण्यामागे सांगितली जाते. संकारसूर नावाचा एक राक्षस प्राचीन काळी होता. त्याला संकरासूर असेही संबोधतात. हा दैत्य प्रजेला, ऋषीमुनींना खूप त्रास देई. तेव्हा या दैत्याच्या जाचापासून सुटका करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण करुन संकरासूराला ठार केले आणि प्रजा सुखी झाली, अशी पुराणकथा सांगितली जाते.

देवीने घेतलेलं संक्रांतीचं रूप भयानक होतं. ती म्हणे साठ योजने पसरलेली असून, ओठ लांब आणि नासिका दीर्घ होती. तिला एक तोंड आणि नऊ हात होते. ती पुरुषाच्या आकारासारखी दिसे असं तिचं वर्णन आहे. फार पूर्वीपासून असा एक समज रूढ आहे की संक्रांत ज्या वस्तूंचा स्वीकार करते, ती वस्तु महाग होते. त्याचप्रमाणे ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी येते आणि ज्या दिशेकडे ती जाते आणि पाहते त्या दिशेला उत्पात होतो. एखाद्याचं कुणापासून नुकसान झालं की त्यांच्यावर संक्रांत आली रे बाबा, असं म्हणतात. थोडक्यात ‘संक्रांत येते’ हा वाक्‌प्रचार रूढ झाला.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संकरासुराच्या वधाचा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस किंकरासूराचा वध केला तो दिवस म्हणजे किंक्रांत. महाराष्ट्रात नववधुला चंद्रकळा परिधान करवून हलव्याच्या अलंकारांनी सजवतात आणि सुगडांचं वाण दान करायला लावतात. सुगड म्हणजे गहू, ऊसाचे तुकडे, हळकुंड, कापूस आणि द्रव्य इत्यादींनी भरलेलं, रंगवलेलं मातीचं छोटंसं मडकं असतं. हे सुगड नारळाच्या वाटीने झाकून, पदराचं टोक धरून दान करण्याची रीत आहे. जावयालाही तिळगूळ आणि अहेर पाठवला जातो.
आजकाल जात-पात आणि धर्मभेदावरून समाजाचं वातावरण असं काही ढवळून निघालेलं आहे की भिन्न भिन्न धर्मियांच्या आपल्या भारत देशात अशा ऐक्य जोडणार्‍या सणांची नितांत गरज भासते. अशा स्नेहवर्धक सणांच्या निमित्ताने निदान सर्व धर्मबंधू-भगिनी एकत्र येतात आणि त्यामुळे परस्परांप्रति प्रेमभाव निर्माण होण्यास मदत होते. परस्परांमध्ये असलेले पूर्ववैमनस्य, हेवेदावे, द्वेष-मत्सर विसरून स्नेहपूर्ण नाते जोडण्याचे संदेश घेऊनच या सणाचे शुभागमन होत असते. आपल्या नावडत्यांच्या किंवा विरोधकांच्या आणि शत्रूंच्या मनात आपल्याविषयी असलेली किल्मिषं – आपण आपला अहंकार झटकून त्यांना म्हटलेले ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे चारच शब्द- झटकन् झटकून टाकून पुनश्‍च स्नेहभाव निर्माण करु शकतात. एवढ्या ताकदीचा हा सण आहे.

आरोग्याच्या दृष्टीने पाहता, संक्रांतीच्या सणासाठी बनवले जाणारे तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या हे अत्यंत गुणकारी आहे. तीळ हे उष्णतावर्धक असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात यापासून शरीरात उष्णता निर्माण होते. शिवाय तिळाच्या गोड पदार्थाच्या देवाण- घेवाणीमुळे आपसातला स्नेहभाव, प्रेमभाव वृद्धिंगत होतो. दुरावलेली नाती, मैत्री अशाप्रकारे एकत्र आणण्याचा संदेश हा सण देतो.

संपूर्ण भारतातील कित्येक राज्यात संक्रांत मनवली जाते, पण ती निरनिराळ्या नावांनी ओळखली जाते. पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, आंध्रप्रदेश इथे याला मकरसंक्रांती हेच नाव रूढ आहे, पंजाब, हिमाचल प्रदेश इथे याला ‘लोहडी’ असे, तामिळनाडूत ‘पोंगल’, आसाममध्ये ‘बिहू’ तर परदेशातील थायलंडमध्ये ‘सोंक्रांत’, लाओसमध्ये चिमालाऊ तर म्यानमारमध्ये ‘चिनीयान’ अशी नावं आहेत. या उत्तरायणाशी संबंधित एक ऐतिहासिक घटनेचाही उल्लेख सापडतो. भीष्म हा कुरूवंशाचा संरक्षक होता. तो मृत्युशय्येवर बराच काळ पडून होता. त्याला इच्छामरणाचं वरदान होतं. उत्तरायण सुरू होताच त्याने इच्छेनुसार प्राणत्याग केला.

१८५२ साली थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी या संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ समारंभ घडवून आणला होता. त्यामागे एक छुपा हेतु होता. त्यांनी फक्त हिंदू स्त्रियांनाच या समारंभात सहभागी करुन न घेता सर्व धर्माच्या महिलांना निमंत्रित केलेलं होतं. समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची जागृती व्हावी हा व्यापक दृष्टिकोन ठेवून त्यांनी हा कार्यक्रम केला. तत्कालीन कलेक्टरसाहेबांच्या अर्धांगिनी मिसेस जोन्स यांना अध्यक्षपद देऊन हा तिळगुळ समारंभ पार पाडण्यात आला होता. जातिभेद, धर्मभेद संपुष्टात यावेत यासाठी सुरू केलेल्या या समारंभामुळे त्यांचे ईप्सित आज फळास आले आहे का हा गहन प्रश्‍न आज उभा राहिलाय.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि मोबाईलसारख्या स्मार्ट यंत्रणेमुळे माणसं एकमेकांना भेटणं आणि ख्याली-खुशाली विचारणं हे समाजातलं चित्रच पार पुसून गेलेलं आहे. अशा परिस्थितीत संक्रांतीचा वर्षातून एकदा येणारा हळदीकुंकवाचा सण समाजातील सर्व स्तरातील महिलांना एकत्र येण्याची संधी देतो. उच्च स्तरातील स्त्रिया भिशी, पार्टी, सहली या निमित्ताने एकत्र जमत असतीलही. परंतु त्यामध्ये निम्न स्तरातील महिलांना एकवटून थोडेच घेतले जाते! संक्रांत हा एकमेव सण स्त्रियांनी, स्त्रियांसाठी, स्त्रियांद्वारेच मनवला जातो. नोकरीवाल्यांकडे आजकाल वेळेचा अभाव असल्याने हा हळदीकुंकवाचा व्याप घेऊन बसणे आणि गावभर फिरणे शक्य होत नसले तरी आपल्यासाठी सर्वांत श्रेष्ठ असलेलं सौभाग्याचं लेणं स्वीकारण्याकरिता प्रत्येक स्त्री वेळात वेळ काढून निमंत्रकांच्या घरी रात्री दहा वाजेपर्यंतदेखील जाऊन येते हे कौतुकास्पद! शिवाय वेळ नाही या सबबीखाली स्त्रियांची सजण्या-धजण्याची स्त्रीसुलभ जन्मजात असलेली स्वाभाविक प्रवृत्ती थोडीच मिटून जाणार आहे! अशा सणांची आलेली संधी न दवडता ती आपली हौस पुरी करते.

शिवाय पतिदेवाला मस्का मारून मारून मोठ्या मुश्किलीने प्रसन्न करुन घेऊन मोठ्या उमेदीने बनवून घेतलेले दागिने आज चोर्‍या-दरोड्याच्या भयाने बँकेच्या कडेकोट बंदोबस्तात कुलुपबंद करुन ठेवले जातात. या दिवशी मात्र त्या आत गुदमरणार्‍या दागिन्यांना बाहेरची हवा दाखवण्याची आणि आपलं स्त्रीधन प्रदर्शित करण्याची संधी स्त्रिया सोडत नसतात. वाणं लुटण्याचा हा सण मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो. यंदाची रथसप्तमी १ फेब्रुवारीला येते. म्हणजे जेमतेम पंधरा दिवस हा समारंभ चालू राहणार आहे.

हा सण स्नेह वाढवणारा असला तरी, मानवामध्ये स्वाभाविकपणे असणारा हेवाभाव इथे दृष्टीस पडतो. तसेच या हळदीकुंकू समारंभाला स्पर्धेचं रुप येतं. श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची चढाओढच लागते. जणू ऐपत नसताना पोकळ बडेजाव भारण्यासाठी उसनवारी करुन हळदीकुंकू केलं जातं. आज त्यांचं वाण महागडं असेल तर पुढच्या वर्षाचं त्याहून महागडं आपलं असेल अशी चुरस लागते. ही चुरस कीड ठेचली गेली पाहिजे.

शेजारच्या सर्वधर्मीय भगिनींना निमंत्रित केलं जात असल्यामुळे सावित्रीबाईंचा मूळ हेतु सफल होतोय ही आनंदाची बाब आहे. आता विशाल विचारांच्या महिला विधवांनाही निमंत्रित करताना दिसतात. फक्त विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे.
धार्मिक परंपरा जपतानाच, या सणाद्वारे स्त्रियांसाठी सामाजिक प्रबोधनही झाल्यास समाजाचा वैचारिक आणि बौद्धिक विकास बर्‍यापैकी होऊ शकेल. कितीतरी विवाहित स्त्रियांमध्ये असलेल्या कला, ज्ञान संसाराच्या रहाटगाडग्यात चिरडून जात असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. त्याबद्दल खरोखर वाईट वाटतं. तेव्हा त्यावर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. एक तर एकाच सोसायटीवाले किंवा वाड्यावरील प्रत्येकाचा वेगवेगळा होणारा हळदीकुंकू समारंभ, सर्वांनी ठरवून एकाच दिवशी करावा. आणि या दिवशी जमलेल्या स्त्रियांना एखादा सोपासा विषय देऊन उत्स्फूर्तपणे बोलायला लावणे, आवडलेल्या पुस्तकावर विचार व्यक्त करायला लावणे, थोर व्यक्तींचं चरित्र स्पष्ट शब्दोच्चारात वाचून दाखवणे, सहलीविषयी लिहायला लावणे, म्हणींचे खेळ खेळणे, सामाजिक समस्यांवर तोडगा सुचवणे, समाज-भान देणे, गंजत पडलेल्या कलांना सादर करुन त्यावरील गंज झटकून टाकणे असं बरंच काही करता येईल. शिवाय कपाळाला नुसतंच हळदकुंकू लावून वाणं वाटण्याचा खर्च वाचवावा आणि त्या जमलेल्या पैशातून थोडी पुस्तकं खरेदी करुन वाचनालय उघडावे. यातून या सणाद्वारे होणार्‍या स्नेहवर्धनाला ज्ञानसंवर्धनाचीही जोड मिळेल. सणांचा उपयोग केवळ मौजमजेकरता किंवा मनोरंजनाकरिता न करता समाजाच्या बौद्धिक विकासाकरिताही केला जावा. अशा उपक्रमांची जबाबदारी अंगावर घेणार्‍या बर्‍याच सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन हळदकुंकवाचं स्वरूप समाजहिताच्या दृष्टीने बदलण्याचा प्रयत्न करावा.