स्त्री-प्रजननसंस्था आणि वंध्यत्व

0
556
  • डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

फलकोषांवर कार्य करणारे दुसरे औषध म्हणजे खारीक. खारीक किंचित उष्णवीर्य, रसायन बल्य पुष्टीकारक शुक्रापर्यंत जाऊन पोचणारी व अस्थिमज्जेला बल देऊन आर्तवाला वाढवणारी आहे. बदाम, अक्रोड, चारोळ्या, सुके अंजीर याचा उपयोग बीजरूप आर्तवधातू वाढवण्यासाठी होतो.

पुरुष-शरीरातील शुक्रदोष पाहिल्यावर अपत्यजननासाठी आवश्यक असलेले शोणित म्हणजे ‘आर्तव’ याचा विचार करुया. स्त्रियांमधील वंध्यत्वाचा विचार करण्यापूर्वी आपल्याला स्त्री प्रजननसंस्थेची प्राथमिक ओळख करून घ्यावी लागेल.
निसर्गाने स्त्री-शरीराची रचना तशी बरीच गुंतागुंतीची केलेली आहे. पण तरीही त्यात निसर्गाची मोठी किमया आहे. स्त्री-शरीरातील प्रत्येक कार्य हे सुयोग्य स्थितीत होत असते. केवळ अपत्यप्राप्ती होण्यासाठीच नव्हे तर एरवीही सुयोग्य शारीरिक विकास साधण्यासाठीसुद्धा स्त्रीच्या शरीरातील विविध अवयवांचे, अंतःस्रावी ग्रंथींचे, मेंदू आणि मज्जासंस्थेचे कार्य योग्य प्रकारे सुरू राहणे, त्यात नियमितता आणि संतुलितपणा असणे गरजेचे असते. यातील घटक एवढे सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे असतात की अनेक वेळा स्त्री-शरीराचे कार्य सुरळीतपणे कसे चालते याचे आश्‍चर्य वाटते खरे.
आर्तव धातू – ऋतौ भवम् आर्तवम् | – नियमित काळाने महिन्याने निर्माण होणारे ते आर्तव. निषिक्तस्य बीजस्य फलप्रसवानुगुणः कालः| या व्याख्येनुसार गर्भधारणेला जे उपयोगी पडते व ‘रसाद्रक्तं’ या न्यायाने सातवा धातू म्हणून जे काम करते त्याला ‘आर्तव’ म्हणतात. आर्तव हे अग्नीपासून उत्पन्न झालेले, आग्नेय गुणाचे व उष्णवीर्य होय.

ज्याप्रमाणे पुरुष-शरीरात लहान वयात शुक्र असते पण दिसत नाही त्याचप्रमाणे स्त्री-शरीरात आर्तव असते पण ते सूक्ष्मरूपात राहून मुलीची लहान वयात वाढ करणे, अकराव्या-बाराव्या वर्षी स्तनवृद्धी, जघनवृद्धी करणे, सर्वधातूपरिपोष करणे व मानसिक स्वास्थ्य कायम राखणे ही कार्ये करत असतो. बाराव्या वर्षानंतर ते रजरुपाने प्रतीत होते आणि दर महिन्याला तीन दिवसांपर्यंत रजरूपाने स्रवण होते.
आर्तव तयार होण्याचा काळ हा एक महिन्याचा असतो. त्या काळात या सूक्ष्मकेशप्रतिकाश अशा बीजरक्तप्रवाही शिरांमार्फत गर्भाशयाचे पोषण होत असते. त्यातील सारभाग फलकोषांमार्फत शोषला जातो आणि रससदृश पोषक भाग गर्भाशयाच्या आतल्या स्तरावर साठवला जातो. उपचयाच्या या दोन्ही प्रक्रिया एकदम होत असतात आणि बीज निर्माण झाल्याखेरीज बीजाकडून प्रेरणा मिळाल्याखेरीज रजस्राव सुरू होत नाही म्हणजे मासिक पाळी येत नाही.
स्रावाचे स्वरूप –
स्राव हा वेदनारहित, दाहरहित, पिच्छिलत्वरहित व कोणत्याही दोषाने दुष्ट झालेला नसावा.
– स्राव हा सशाच्या रक्ताप्रमाणे लालबुंद अशा वर्णाचा असावा.
– लाखेचा रंग हा थोडा फिक्का, लाल रंगाचा असतो त्याप्रमाणे त्याचा वर्ण असतो.
– रज एवढे शुद्ध असते की वस्त्राला लागलेले रज धुतल्यावर वस्त्र स्वच्छ होते. डाग राहत नाही. आर्तवाला घट्टपणा येता कामा नये. त्याचा वर्ण बिघडल्यास म्हणजे काळपट झाल्यास – फिकट झाल्यास – गाठाळ झाल्यास किंवा दुर्गंधी आल्यास रजाची-आर्तवाची पंचभौतिक घटना बिघडते. गर्भाशयाच्या वाहिन्यांची सूक्ष्म केशवाहिन्यांमार्फत शोषून घेण्याची क्षमता कमी होते व आर्तव-क्षय होतो. त्याचा परिणाम आर्तवाच्या निर्मितीवर होतो आणि फलकोषांवरही होतो व पाळी वेळच्या वेळी येत नाही.

अशा रीतीने सारभूत आर्तवधातू नीट निर्माण न झाल्यास गर्भाशयाच्या अंतःत्वचेला रुक्षत्व येते. योनि भागाला खरत्व येते. कटिशूल निर्माण होतो व आर्तवधातूच्या क्षयातून अस्थिक्षय व मज्जाक्षय होतो. म्हणून आर्तव शुद्ध असणे हे स्त्रीच्या आरोग्याचे प्रमुख लक्षण आहे. स्त्रीचे वात्सल्य, तितिक्षा, मार्दव, सुखी कामजीवन आणि गर्भधारणा या सर्व गोष्टी शुद्ध आर्तवावर अवलंबून असतात.
शुद्ध आर्तव हे गर्भधारणेस योग्य असल्यामुळे ज्याप्रमाणे वस्त्राला रंग द्यायचा असल्यास स्वच्छ, निर्मळ वस्त्र चटकन रंगते त्याचप्रमाणे आर्तव शुद्ध असल्यास गर्भधारणा चटकन होते. गर्भ स्थिर राहतो आणि वाढीला लागतो.

मासिक पाळीचे सामान्य चक्र –
स्त्री-गर्भ आईच्या पोटात वाढत असतानाच तिच्या आयुष्याच्या बाराव्या आठवड्यातच तिच्या बिजांडकोषात जवळजवळ ६० ते ७० लाख बिजे अर्धपक्व अवस्थेत असतात. मुलगी जन्मताना त्यातील सर्वसाधारणपणे २० लाख बिजे शिल्लक राहतात. आणि तिच्या पहिल्या पाळीच्या वेळी या २० लाखांपैकी पाच लाख बिजे दोन्ही बिजांडकोषात मिळून शिल्लक राहतात. उरलेली बिजं आतच नष्ट होतात. मासिक पाळीच्या वेळी या पाच लाख बिजांपैकी फक्त एकच पक्व बीज दर महिन्याला बिजनलिकेत येणे ही निसर्गाची फार मोठी किमया आहे.

१. फॉलिक्युलर फेज – रक्ताच मिसळलेले ‘एफएसएच’ ओव्हरीत पोचताच एका किंवा दोन्ही ओव्हरीतील मिळून सात-आठ फॉलिकल्स मोठी होऊ लागतात आणि इस्ट्रोजन तयार करतात. हे इस्ट्रोजन रक्तात मिसळते. काही नैसर्गिक संकेत मिळाल्यावर या इस्ट्रोजनमुळे या सात-आठपैकी बाकीची फॉलिकल्स वाढायची थांबतात आणि एकच फॉलिकल वाढते ज्याला ‘डॉमिनंट फॉलिकल’ म्हणतात. हे अधिकाधिक इस्ट्रोजन तयार करीत जाते. इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाचे आतील स्तर जाड होते आणि रक्तवाहिन्या वाढतात.
२. ओव्ह्युलेशन फेज – ‘जीएनआरएच’च्या प्रमाणानुसार पिट्युटरी ग्रंथीचे काम बदलत जाऊन अखेर पूर्वी साठविलेले ‘एलएच’ रक्तात मिसळायला सुरुवात होते. हे एलएच रक्तातून ओव्हरीकडे येऊन डॉमिनंट फॉलिकलला बीजमुक्त करण्यास भाग पाडते. ओव्ह्युलेशन प्रेडिक्शन किट – एलएच हे सगळ्यात जास्त प्रमाणात रक्तात मिसळले गेल्यास दिवस (एलएच सर्ज) दाखवितात. एलएच सर्जच्या दिवशी स्वार्हयकल म्युकस सगळ्यांत जाड आणि मिलनयोग्य होतो. गर्भाशय ग्रिवा गर्भाशयाजवळ वर सरकते आणि मऊ पडून थोडीशी उघडते. थोडक्यात- ज्यामुळे वीर्यातील शुक्रजंतूचा स्त्रीशरीरातील प्रवास निर्धोकपणे पार पडू शकतो अशा सगळ्या गोष्टी स्त्रीच्या शरीरात घडत असतात. स्त्रियांमध्ये या काळात शरीरसुखाची आसक्तीही वाढलेली असते. या एलएच सर्जनंतर एक बीज ओव्हीतून मुक्त होते.
३. ल्युटिअल फेज – पाळीच्या साधारण चौदाव्या दिवशी हे ओव्ह्युलेशन होऊन मग ल्युटिअल फेज सुरू होते. मुक्त बीज (ओव्हम्) २४ तास योग्य शुक्रजंतूची वाट बघत फेलोपियन ट्यूबमध्ये जिवंत राहते. गर्भाशयातील बीजाच्या वाढीतील शिल्लक राहिलेल्या भागाला कॉर्पस ल्युटिअम असे म्हणतात. त्याला ओव्ह्युलेशन नंतरच्या काळात एलएच अधिकाधिक इस्ट्रोजन आणि एक नवीन हॉर्मोन प्रोजेस्टरोन तयार करण्यास भाग पाडते. यामुळे गर्भाशयाच्या आतील पेशी आवरणात रक्तप्रवाह वाढतो आणि ते तयार बाळाचे संगोपन करण्यास अधिकाधिक सक्षम बनते. बीज फलित झाले तर त्यापासून तयार होणारे एचसीजी’ हॉर्मोन ओव्हरीज शिल्लक असलेल्या कॉर्पस ल्युटिअमला एलएच प्रमाणेच अधिकाधिक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन तयार करण्यास भाग पाडते. मात्र जर बीज फलित झाले नाही तर हे कॉर्पस ल्युटिअम पाळीच्या तीन दिवस आधी नष्ट होते. इस्ट्रोजन-प्रोजेस्टरोन स्राव कमी झाल्याने बाहेर पडलेले बीज, गर्भाशयाने केलेली गर्भारपणाची तयारीही हळूहळू नष्ट होत नवीन मासिक स्रावाच्या रूपाने गर्भाशयाबाहेर पडते. यालाच पाळीचा पहिला दिवस म्हटले जाते. स्त्री-शरीरात हे सारे चक्र दर महिन्याला सुरू असते.
आधुनिक शास्त्रीमध्ये अशा प्रकारे मासिक पाळीचे चक्र सांगितले आहे. या सगळ्यामध्ये महत्त्वाचे आहे ते नियमित पाळी येणे व बीजाची अपेक्षित वाढ होणे, बिजाची अपेक्षित वाढ न झाल्यास परिणाम वंध्यत्व.
आर्तवधातूकर योग –
आयुर्वेद शास्त्रामध्ये स्त्रीबीज किंवा आर्तवधातूच्या वृद्धीकरता काही योग सांगितले आहेत.
साध्या आहारातून काही योग मिळत असतात. उदा. त्या स्त्रीने तूप, दूध, उडीद, मुगाचे-तुरीचे वरण, सर्व प्रकारची कडधान्ये, सर्व पालेभाज्या, डाळिंब, मोसंबी यांसारखी रसाळ फळे, डाळिंब, अंजीर, पेरू अशी बहुबीज फळे अधुनमधून घ्यावीत.
– अहळीव ः हे किंचित भिजत टाकून खीर करून किंवा लाडू करून त्याचा उपयोग करावा. स्त्री स्थूल असल्यास अहळीवाची पूड करून खाल्ल्यास मेदक्षरण होते.
– खारीक ः फलकोषांवर कार्य करणारे दुसरे औषध म्हणजे खारीक. खारीक किंचित उष्णवीर्य, रसायन बल्य पुष्टीकारक शुक्रापर्यंत जाऊन पोचणारी व अस्थिमज्जेला बल देऊन आर्तवाला वाढवणारी आहे.
– खोबरे ः हे ओले किंवा वाळलेले असो- स्निग्ध, बल्य, उष्णवीर्य, रसायन असे असल्यामुळे आर्तवधातूपर्यंत पोचते.
हे साधे साधे योग आहार्य द्रव्य असूनही औषध म्हणून उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड, चारोळ्या, सुके अंजीर याचा उपयोग बीजरूप आर्तवधातू वाढवण्यासाठी होतो. भुईकोहळा, आवळकठी, गोखरू, शतावरी, बाळंतशोप या औषधांचा प्रकृतीनुसार वापर केल्यास उत्तम उपयोग होतो.