स्त्री अजूनही अनभिज्ञच…!

0
161

– सौ. नीता शि. फळदेसाई, पर्वरी 

मागच्या आठवड्यात जागतिक महिला दिन साजरा केला गेला. आपल्या आईच्या स्मृतीसाठी लेकीने चालविलेल्या लढ्याला एक दिन म्हणून साजरा करण्याचा सन्मान या दिनाला मिळाला व तेव्हापासून स्त्रियांमध्ये असलेल्या अनेक गुणांचा महिमा वर्णिला जातो. अगदी पुरातन काळापासून ते आजच्या प्रगत युगात स्त्रीशक्तीविषयी सार्थ अभिमान बाळगून स्त्रियांबद्दल गौरवोद्गार काढले जातात. स्त्रीला वंदनीय मानले जाते. आई, बहीण, पत्नी, कन्या या चार प्रमुख भूमिकांमधली स्त्री समजून उमजून तिच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाते. प्रत्येक घरात स्त्रीची भूमिका अतुलनीय आहे. घर फक्त घर न राहता, चार भिंती न राहता ते शांती, सुख, मानवी मूल्यांना जोपासणारे मंदिर करण्यास स्त्रीचा वाटा महत्त्वाचा आहे.परमेश्‍वराने स्त्रीला अतिशय हुशारीने सावकाश सवडीने, मोठ्या निगराणीने घडविले जेणेकरून कुठे कसर राहू नये. स्त्री कर्तबगारीमध्ये कुणाच्याही पेक्षा कमी नाही. आपल्या दोन हातांनी जगाशी भांडण्याची ताकद असणारी स्त्री दोन हातांचा पाळणा करून आपल्या तान्हुल्याला जोजविताना कमालीची हळवी होत असते.
अगदी पराकोटीचा संयम ठेवणार्‍या स्त्रीला आपल्यावर होणार्‍या अन्यायाशी मुकाबला करण्यास अजिबात वेळ लागत नाही. ईश्‍वराने स्त्रीची अद्वितीय अशी रचना करून तिला प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी हवी असलेली जाण, संयम, धीर, हुशारी, समयसूचकता, दक्षता प्रदान केलेली आहे. दिवसा अठरा तास काम करण्याची अपूर्व शक्ती, दोन हातांनी अनेक कामे लीलया झेलण्याची किमया स्त्रीमध्ये आहे. स्त्री विचाराने, आचाराने प्रगल्भ आहे. बर्‍यावाइटाची पारख करण्याची नैसर्गिक शक्ती स्त्रीमध्ये आहे.
कणखर मनाची स्त्री एखाद्या छोट्याशा भावनिक प्रसंगाने वितळून जाते. प्रेमात, ममतेत सर्वस्व ओतणारी स्त्री विश्‍वासघात, प्रतारणा, वंचना मात्र सहन न करता अगदी दुर्गामातेच्या आवेशाने आपल्या झुंजार व्यक्तिमत्त्वाची छाप पण पाडू शकते. स्त्रीचे प्रेम निरपेक्ष असते. त्यागाची भावना अभिजात असते. छिन्नविच्छिन्न झालेल्या तिच्या हृदयातूनसुद्धा दुसर्‍याच क्षणी मायेचा झरा वाहत असतो. स्त्री अतुलनीय, अमूल्य वंदनीय आहे. स्त्रीच्या प्रत्येक कामगिरीतून तिच्या कर्तृत्वाची छाया दिसते. स्त्री आनंद निर्माण करते. एखाद्या रणरणत्या, भयाण आयुष्यात प्रेमाचा शीतल शिडकावा करून त्याचे जीवन पल्लवित करू शकते. पण मग एवढ्या सर्व जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडणारी स्त्री अबला कशी? कारण मला वाटते देवाने सगळंकाही स्त्रीला दिले. कणखरपणा, दिलदारपणा, इमान, नेकी, सचोटी, कर्तृत्व, संयम, सहनशीलता… पण एक गोष्ट मात्र देव द्यायला विसरला असावा ती म्हणजे स्त्रीला स्वतःचीच ओळख, जाण. आपल्या कर्तृत्वाबद्दलची भरारी कदाचित स्त्री विसरली असावी व त्यामुळेच अजूनही एक अबला म्हणून अत्याचार, बलात्कार, हुंडाबळीच्या यज्ञात स्वाहा होते आहे. ज्या दिवशी तिला तिच्या स्वत्वाची ओळख होईल तोच दिवस तिच्या जीवनातला खरा ‘महिला दिन’ असेल!!