स्त्रीसंगम महिला मराठी संमेलन रविवारी पणजीत

0
208

>> नामवंत कवयित्री उषा परब भूषविणार अध्यक्षस्थान

>> उत्साहिनींचा संमेलनात होणार गौरव

साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील महिलांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे स्त्रीसंगम महिला मराठी संमेलन रविवार २५ मार्च रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ पर्यंत पाटो, पणजी येथील संस्कृती भवनच्या बहुद्देशीय सभागृहात गोवा मराठी अकादमीतर्फे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान सावंतवाडी येथील नामवंत लेखिका तथा कवयित्री उषा परब भूषविणार आहेत.

संमेलन आयोजन समितीच्या स्वागताध्यक्षा सुलक्षणा सावंत, कार्याध्यक्षा शुभदा सावईकर, गोवा मराठी अकादमाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, संमेलनाचे समन्वयक सागर जावडेकर व पौर्णिमा केरकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होईल. काल पत्रकार परिषदेत प्राचार्य सामंत व पौर्णिमा केरकर यांनी संमेलनाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला.

उद्घाटनानंतर सकाळी १०.४५ वाजता ‘यशोगाधा’ या सत्रात विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांशी पौर्णिमा केरकर संवाद साधतील. त्यात डॉ. स्नेहा म्हांबरे (प्राध्यापिका), चित्रा क्षीरसागर (समाज कार्यकर्त्या), मेधा शिरोडकर) (गृहिणी), लीना पेडणेकर (पत्रकार व कवयित्री), सम्राज्ञी मराठे (नाट्यकलाकार), प्रज्ञा देसाई (पुनर्वसन मानसशास्त्र) यांचा सहभाग असेल. दुपारी साडेबारा वाजता ‘विविध गुणदर्शन’ या सत्रात महिला मंडळ, मडगावचे सादरीकरण होईल.

भोजनानंतरच्या ‘प्रेरणा’ या सत्रात, ‘वयाची साठी तरीही हाती घेतली नाही काठी’ अशा उर्जेने कार्यरत असलेल्या उत्साहिनींचा गौरव होईल. मोहिनी देसाई व शीतल लावणीस या गौरवमूर्ती आहेत. दुपारी ३ वा. उषा परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कविसंमेलनाने संमेलनाचा समारोप होईल. कविसंमेलनात दया मित्रगोत्री, अंजली आमोणकर, नलिनी देशपांडे, स्वप्ना धुपकर, नीता तोरणे, आरती दिनकर, श्रेया केळकर, दीपा मिरिंगकर, रेखा पौडवाल, प्रज्वलिता गाडगीळ, गीता गावस, वर्षा मालवणकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, सरोजनी गावकर, गौतमी चोर्लेकर, विद्या शिकेरकर, सविता गिरोडकर आदी कवयित्री सहभागी होतील.