स्त्रियांमधील वंध्यत्वाची शारीरिक कारणे…

0
204

– डॉ. मनाली म. पवार 
(गणेशपुरी, म्हापसा)

गर्भधारणा होईपर्यंत फलकोषांमार्फत बीजग्रहण करून त्याचे वहन करणे यामुळे नियमित पाळी येण्यासाठी आर्तववह स्रोतसे सहाय्यक ठरतात. गर्भधारणाा झाल्यानंतर या स्रोतोमुखाचा अवरोध होतो. त्यामुळे पाळी बंद होते.

वंध्यत्वामध्ये स्त्रीच्या शारीरिक कारणांमध्ये प्रथमावर्त व द्वितियावर्त पाहिल्यावर आता आपण तृतियावर्त व इतर काही कारणांचा विचार करू…
यात गर्भाशय, आर्तववाहिन्या आणि फलकोश हे भाग येतात.
गर्भाशय म्हणजे गर्भधारण व वाढ होण्यासाठी जी पोकळी किंवा आशय लागतो तो भाग म्हणजे गर्भाशय. गर्भशय्या म्हणजे गर्भाशयाचा आशय. गर्भशयमुख हे बीज ग्रहण करते तर गर्भशय्या ही गर्भाला स्थिरत्व देते व ती गर्भाचे आश्रयस्थान आहे. स्वाभाविक प्रसवाची वेळ येईपर्यंत प्राकृत गर्भशय्येमध्ये गर्भ सुरक्षित राहतो. अर्थातच त्याचे अंतरावरण योग्य नसल्यास गर्भ स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळे वारंवार गर्भपात वा गर्भस्राव होतात.

ज्याप्रमाणे बाहेरील बीजाचे पाणी, हवा, चांगली जमीन आणि चांगले बीज या चार गोष्टींवर अंकुर येऊन त्याची वाढ होणे अवलंबून असते त्याप्रमाणे …
– स्त्रीची पाळी वेळच्या वेळी येणे.
– गर्भाशयाची अंतःत्वचा योग्य असणे.
– गर्भाशयाचे आकारमान योग्य असणे.
– गर्भाशयाचे स्नायू सबल असणे या गोष्टी आवश्यक असतात.
आपल्या आहारातून निर्माण होणारा सर्वशरीरव्यापी रसधातू, स्त्री-पुरुष यांची सक्षम बिजे व त्यांचा योग्य काळात झालेला संयोग या गोष्टींमुळे निरोगी गर्भ निर्माण होतो. म्हणून वंध्यत्वामध्ये यांपैकी नेमक्या कोणत्या ठिकाणी दुष्टी आहे हे कळण्यासाठी तृतियावर्ताचे परीक्षण करणे आवश्यक ठरते. यासाठी आधुनिक परिक्षणांचे सहाय्य उपयुक्त ठरते. उदा. एन्डोमेट्रियल बायोप्सी, एचएसजी, लेपरोस्कोपी, पेल्व्हिक सोनोग्राफी. या सर्व तपासण्यांवरून तिसर्‍या आवर्ताचे बरेचसे ज्ञान आपल्याला होऊ शकते.

१) गर्भाशयाशी संबंधित कारणे –
– गर्भाशयाच्या आंतरवर्णामध्ये दार्ढ्य, रौक्ष्य, शैथिल्य किंवा अतिदाटपणा असणे. हे आधुनिक परिक्षणावरून समजून घेऊन आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करता येते. अपत्यपथात मुखापाशी स्नेहपिचू ठेवल्यास गर्भाशयामध्ये शोषला जातो व त्याचे औषधी उपयोग या अंतःत्वचेवर कार्य करतात.
– गर्भाशयाच्या श्‍लेश्र्मल त्वचेचा दाह (एन्डोमेट्रिओसिस), गर्भाशयातील गाठी (फायब्रॉइड), गर्भाशयाचा कॅन्सर, लहान लहान ग्रंथी आणि छोट्या छोट्या गुठळ्या गर्भशय्येवर असल्यास गर्भधारणा किंवा गर्भाची वाढ होऊ शकत नाही. अशा वेळी किमान सहा-आठ महिने चिकित्सा घ्यावी लागते.
– गर्भाशयाच्या रचनेतील विकृती.
– गर्भाशयाची ग्रिवा अति लांब असणे.
– गर्भाशय स्वस्थानापासून खाली सरकणे.
– जेव्हा गर्भाशयाचा योनीसोबतचा वाक जास्त प्रमाणात मागच्या भागात असतो, तेव्हा काही वेळा ते वंध्यत्वाचे कारण असू शकते.
२) गर्भनलिका अवरोध –
– गर्भनलिकांमध्ये अवरोध असणे. गर्भनलिका आवळल्या गेल्याने बीज बाहेरच येऊ शकत नाही. अशा वेळी त्याच्या फलनाची शक्यता नष्ट होते. अशा स्थितीला वंध्यत्व म्हटले जाते.
– क्षयरोगात गर्भनलिकेचा दाह झाल्यास फायब्रॉसिस होऊन गर्भनलिकेत बीजवहनात अडथळा निर्माण होऊन वंध्यत्व येते.
– गर्भनलिकेतील फलन – गर्भनलिकेत बिजाचे फलन झाल्यानंतर गर्भाशयाच्या अंतःत्वचेमध्ये न रुजता नलिकेत वाढ होणे. अशा प्रकारच्या गर्भधारणेला एक्टोपिक प्रेग्नंसी म्हणतात. याचा उपद्रव म्हणून गर्भनलिकेत अवरोध उत्पन्न होऊ शकतो.
– गर्भनलिकेची कार्यक्षमता कमी होते. जसे स्त्रीबीज झेलून न घेणे, गर्भनलिकेची हालचाल कमी होणे.

फलकोषांमार्फत स्रवण झालेले बीज किंवा आर्तव आर्तववाही दोन धमन्यांमार्फत गर्भाशयापर्यंत आणले जाते. क्रियाशीलतेचा विचार करत असताना गर्भधारणा होईपर्यंत फलकोषांमार्फत बीजग्रहण करून त्याचे वहन करणे यामुळे नियमित पाळी येण्यासाठी आर्तववह स्रोतसे सहाय्यक ठरतात. गर्भधारणाा झाल्यानंतर या स्रोतोमुखाचा अवरोध होतो. त्यामुळे पाळी बंद होते. परंतु गर्भाच्या वाढीसाठी असणार्‍या भागाचा पुरवठा व स्तन्यनिर्मितीसाठी लागणार्‍या सारभूत भागाचा पुरवठा या स्रोतसामार्फत होतो. अधोगामी धमन्या स्त्रीशरीरात आर्तवनिर्मितीला व आर्तववहनाला कारणीभूत होतात. त्याच सप्तधातूचे सारभूत रक्त म्हणजे आर्तव तयार करण्यासाठी सहाय्यक होतात आणि फलकोषांमार्फत हे सारभूत आर्तव गर्भाशयामाार्फत पोचवण्याचे काम करतात. विसर्जनाचे पुढील काम रजोवाहिन्या करतात. म्हणून ‘आर्तव’ व ‘रज’ निर्मिती व विसर्ग यांचा भेद लक्षात घेऊन त्यानुसार चिकित्सा करावी.
आर्तववाहिन्यांच्या ठिकाणी बिघाड झाल्यास म्हणजे रोध, वक्रताा, तीव्र शोथ आल्यांस या धमन्यांचा विचार तसेच पित्ताशय, पक्वाशय या सर्वांचा विचार करून चिकित्सा करावी.

आर्तववाहिनी वक्र असल्यास स्वाभाविक रितीनेच रोध असतो. वाताचे वहन योग्य होत नाही आणि वातसुद्धा जाऊ न शकल्याने बीजाचे वहन होत नाही. त्यामुळे आकाश व वायू महाभूते वाढतील असा तिक्त रसात्मक, सूक्ष्म स्रोतोगामी आणि आर्तववर्धक अशा द्रव्यांचा वापर करणे हितावह ठरते.

अंडाशयाशी संबंधित वंध्यत्वाची कारणे –
– अंतःस्रावी स्रावांच्या असंतुलनामुळे स्त्रीबीजाचा विकास नीट न होणे.
– ल्युटिनायझिंग हार्मोनच्या अभावामुळे स्त्रीबीज परिपक्व होत नाही आणि अंडाशयाच्या बाहेर पडत नाही. यालाच आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आर्तवगत बीजदुष्टी हे कारण आहे. याची कारणे आपल्या आहारविहारात असतात. हे बीज एक महिन्याने तयार होत असते आणि त्यासाठी योग्य आहारविहाराची गरज असते. अर्थात आर्तवाची क्षिणता ही येणार्‍या पाळीवरून ओळखावी लागते. दर महिन्याला तीन दिवसापर्यंत योनिस्राव होणे म्हणजेच योग्य वेळी आर्तव धातू तयार होणे होय. बीजदुष्टी ही क्षीणता किंवा वृद्धी अशा दोन्ही प्रकारातून होते. बीजदुष्टीमध्ये चिकित्सा करताना संशोधनानंतर आग्नेय द्रव्यांचा उपयोग करावा. असे केल्याने आर्तव धातू सबल होतो.
स्त्रियांमधील जननसंस्थेशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती यासुद्धा वंध्यत्वाला कारणीभूत असू शकतात.
– गर्भाशयाची विकृत वाढ ः बीजांडकोषाची जन्मजात अनुपस्थिती, गर्भाशयाची अपूर्ण वाढ, त्यांचे द्विभाजन, द्विकोटर गर्भाशय, रंध्र नसलेला योनिमार्ग.. वगैरे अनेक विकृती आढळतात.
– जननेंद्रियांच्या इजा व त्यांचे स्थानांतर ः योनी- मूत्राशयावरील खोलवर गेलेला वळसेदार व्रण, मलाशय-योनी यांच्यातील व्रण व गर्भाशयास इजा यांचा समावेश होतो. जननेंद्रियातील स्नायूंच्या कमजोरीमुळे व आधार देणारे बंध नष्ट झाल्यामुळे गर्भाशयाचे स्थानांतर होते.
– जंतुसंक्रमण ः फंगल इन्फेक्शन, ट्रिपोनेमा पॅलिडम, गोनोकॉकल इत्यादी जंतूंचे संक्रमण होऊ शकते.
– गाठी व पेशींची अनावश्यक वाढ ः गर्भाशयात तसेच बिजांडकोषात निरनिराळ्या प्रकारच्या गाठी आढळतात. काही वेळा अशा गाठी कर्करोगाच्याही असतात.
– गर्भाशयातून होणारे विकृत रक्तस्राव ः थायरॉइड ग्रंथींची जास्त किंवा कमी क्रियाशीलता मासिक अतिस्रावाला कारणीभूत असते.
– हॉर्मोन्सचे असंतुलन .
– गर्भाशयाचा क्षयरोग.
– गर्भनिरोधक साधनांचा अतिवापर.
– विवाहापूर्वी किंवा वारंवार गर्भपात करून घेणे.
– ऋतुकाळात संबंध न ठेवणे. हे बर्‍याच वेळा ‘शिफ्ट’मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये दिसून येते.
– वंध्यत्वाच्या स्त्रियांमधील अशा सार्‍या कारणांचा विचार घेतल्यानंतर सध्याच्या काळात ज्याची सर्वाधिक चर्चा केली जाते त्या ‘पीसीओडी’ किंवा ‘पीसीओएम्’ अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज किंवा सिंड्रोम याची थोडी माहिती पुढे घेऊ.