स्त्रियांमधील वंध्यत्वाची शारीरिक कारणे

0
167

–  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

परिक्षण करून दोषांचा विचार करून लाक्षणिक चिकित्सा करणे आवश्यक ठरते ज्यामुळे वंध्यत्व येते. ही लक्षणे नाहिशी झाल्याखेरीज अपत्यसंभव होत नाही. वंध्यत्वामध्ये कृमींचा विचार करून कृमिघ्न चिकित्सा देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे समजून घेणे जितके सोपे आहे तितकेच स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे समजून घेणे कठीण आहे. स्त्री-पुंबीज मिलनापासून ते बाळ गर्भाशयात वाढून जन्माला येईपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी स्त्रीच्या शरीरात घडतात. त्यामुळे अपत्य जन्मापूर्वीच्या प्रत्येक पायरीतील चूक स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दोष निर्माण करू शकते.

स्त्रियांमध्ये अनपत्यतेचा विचार करता योनीच्या तिन्ही आवर्तांचा विचार करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रथम आवर्त म्हणजे बाह्य योनी, दुसरा आवर्त म्हणजे अपत्यपथ (व्हजायना) व तिसरा आवर्त म्हणजे गर्भ ज्या ठिकाणी राहतो ती गर्भशय्या म्हणजे गर्भाशय. फलकोषातून येणारे स्त्री-बीज ज्याच्यामार्फत गर्भाशयामध्ये आणले जाते त्या आर्तववाहिन्या (फॉलोपियन ट्यूब्ज) आणि ज्या ठिकाणी आर्तव धातूची निर्मिती होते ते फलकोष यांचा अंतर्भाव तिसर्‍या आवर्तात होतो. या आवर्तांपैकी कशातही दुष्टी घडल्यास वंध्यत्व संभवते. म्हणूनच वंध्यत्वामध्ये या तिन्ही आवर्तांचे परीक्षण योग्य प्रकारे करणे खूपच महत्त्वाचे आहे. नेमकी दुष्टी कोणत्या ठिकाणी झालेली आहे हे निदान होणे महत्त्वाचे आहे.

कित्येकदा बाह्य योनीकडून पूय, पूतिगंध स्राव होऊन ती दुष्टी अंतरिंद्रियांपर्यंत पोचते तर कित्येकदा, फलकोष आणि आर्तववाहिन्या यांच्या ठिकाणी असणार्‍या दुष्टीचे परीणाम अपत्यपथ व बाह्य भागावर होत असतात. शारीरिक दोष वाढत असताना, दोषदुष्टी झाल्यानंतर दोषांचा प्रवास बाह्य आवर्ताकडून म्हणजे प्रथमावर्ताकडून तृतियावर्ताकडे आहे का तृतियावर्ताकडून प्रथमावर्ताकडे आहे हे ओळखणे म्हणजेच निदान होय व हे फार महत्त्वाचे आहे कारण त्यानुसार औषधयोजना बदलते.
बाह्य योनी – बाह्य योनीकडून आपण योनिपरिक्षण करत असताना अनपत्यतेला कारणीभूत ठरणार्‍या व्यवहारात आढळणार्‍या गोष्टींचा विचार केला पाहिजे. उदा. संभोगकष्टता. या कारणाबरोबर क्वचित प्रसंगी बाह्ययोनीच्या ठिकाणी शोथ, दाह, स्पर्शासहत्व, आत्यंतिक संकोच, वेदना ही कारणेही वंध्यत्वाला कारणीभूत असतात. अशी ही जी कारणस्वरूपी लक्षणे असतात ती लक्षणे बर्‍याच वेळा रुग्ण स्वतःहून सांगत नाही. म्हणून वंध्यत्वाची चिकित्सा करताना परिक्षण हे बाह्य योनीपासून सखोल सुरू करावयास हवे. या सर्वांचा विचार करून बाह्य भागावर आणि अपत्यपथ भागी चिकित्सा केली असता संभोगकष्टता हे कारण व लक्षण दूर होऊ शकते.
बाह्ययोनिभागी विस्फोट असल्यास फिरंग, उपदंश याचा विचार करावा. ते नसल्यास औषधी काढ्यांनी परिषेक, योनिधावन केल्यास उपशय मिळतो. स्पर्शासहत्व कमी होऊन संभोगकष्टता दूर होऊ शकते.

कित्येक स्त्रिया आत्यंतिक योनिसंकोच असणार्‍या असतात. त्यांना योनिवीक्षण यंत्राने तपासताही येत नाही. योनिमुखाची अवस्था एक अंगुल एवढीसुद्धा नसते. अशा अवस्थेत स्त्री कृश असल्यास बृहण चिकित्सा व वातशामक औषधांनी सिद्ध तेलाचा पिचु योनिभागी ठेवल्यास उपशय मिळतो. त्याचबरोबर स्त्री स्थूल असल्यास मेदोपाचक औषधाचा उपयोग पोटातून व सुरसादि गणातील औषधांचा वापर तेलासाठी केल्यास योनिसंकोच हलुहळू नाहीसा होतो. अपत्यपथ विस्तृत होतो. कारण वाताचे शमन हीच योग्य, प्रधान चिकित्सा होय. योनिकर्कशता, स्तब्धता, रौक्ष्य असल्यास संभोगकष्टता आढळते व संभोगकाली आनंद मिळू शकत नाही. अशावेळी स्नेहपिचूचा उपयोग याठिकाणी उत्तम होतो.

बाह्ययोनिभागी शोथ असल्यास शोथ कशामुळे निर्माण झाला आहे याचा पूर्ण विचार करावा. त्याठिकाणी विस्फोट, गळू, वगेरे झाल्याने सूज आहे का याचा विचार करून प्रलेप आणि प्रदेहाचा वापर केल्यास उपशय वाटतो. अतिव्यवायजन्य शोथ असल्यास निदान परिवर्जन करावे म्हणजे व्यवाय टाळावा. पिरंग व उपदंश असल्यास त्यानुसार व्याधिहरण करावे. अशावेळी बाह्योपचार व पोटातून औषधे घ्यावीत.
बाह्ययोनिभागी लाली, दाह व जोडीला वेदना असल्यास शीतप्रदेह व प्रलेपांचा उपयोग केल्यास उपशय मिळतो.

इतर लक्षणांबरोबर बर्‍याच वेळा मूत्रदुष्टी आढळते. अशा वेळी शीत जलाचा अवगाह व शीत द्रव्याचा प्रलेप, प्रदेह उपयोगी पडतो.
– अतिपिच्छिल श्‍वेतस्राव, योनिकंडू व बाह्ययोनिभागी शोथ असल्यास कफज दुष्टी असते. या ठिकाणी निर्माण झालेल्या क्लेदाचे उपशोषण होण्यासाठी क्वाथाने योनिभाग स्वच्छ करून योनिधावन केल्यास उपशय मिळतो.
योनिमार्गातील स्राव अधिक प्रमाणात असतील तर ते शुक्राणूचा स्त्रिबीजाशी संयोग होऊ देत नाही.

– जंतुसंक्रमण हे महत्त्वाचे कारण होय.
* द्वितियावर्त – अपत्यपथातील अंतःत्वचा ही आत्यंतिक मृदु, पेशीमय आणि स्थितीस्थापकत्व असलेली असते. या आवर्तामध्ये आप महाभूताचे आधिक्य असल्याने हा भाग मृदूतर आणि पेशीमय असा बनलेला असतो आणि गर्भाशयमुखाचा भाग याच्या वरच्या बाजूस चार अंगुले, वर्तुळाकृती असा लागत असल्यामुळे द्वितियावर्ताच्या परीक्षणावरून आपल्याला गर्भाशय आर्तववाहिन्या व फलकोष या तिसर्‍या आवर्ताचा अंदाज येतो. म्हणून योनिपरीक्षण करत असताना दोन अंगुले सहजपणे अपत्यपथात पविष्ट होणे आवश्यक असते. परंतु कित्येकदा बाह्ययोनिभागापासून अपत्यपथाचा संकोच इतका तीव्र असतो की एका अंगुलीनेसुद्धा परीक्षण करता येत नाही. अशा वेळी स्वकष्ट मैथुनक्षमता असल्यामुळे वंध्यत्व संभवते.

हल्ली शिक्षणामुळे विवाहाची वयोमर्यादा वाढली असल्याने शिक्षणाच्या ताणामुळे आणि दुचाकी प्रवासामुळे कटिरभागी येणारा ताण या स्नायूंच्या ठिकाणी दार्ढ्य निर्माण करतो व अनप्यतता संभवते. जोडीला मलावष्टंभादी तक्रार असल्यास हा संकोच अधिकच वाढतो व वंध्यत्व येते. या ठिकाणी वातदोषाची प्रामुख्याने दुष्टी असल्याने वाताची चिकित्सा करावी.

योनिपरिक्षण करत असताना अपत्यपथात शोथ असल्यास त्याचा विचार सार्वदेहिक आणि स्थानिक अशा दोन प्रकारांनी करावा. सार्वदेहिक दुष्टीमध्ये पांडू हे प्रमुख कारण असू शकते. दुष्टी उपदंशजन्य असल्यास बाह्ययोनीपासून अपत्यपथात शोथ, औष्ण, लाली असते.

गर्भाशय परीक्षण करत असताना अपत्यपथात अत्याधिक औष्ण्य जाणवते. त्या ठिकाणी लाली आलेली असते. ही लाली बाह्यमुखापासून अपत्यपथापर्यंत किंवा गर्भाशयमुखापासून अपत्यपथापर्यंत आलेली असते. यांपैकी गर्भाशयमुखापासून आलेली असल्यास अनपत्यतेच्या दृष्टीकोनातून हे लक्षण अधिक त्रासदायक असते. यामुळे मैथुनासहिष्णुता येते. सदाह मूत्रप्रवृत्ती आणि आत्यधिक औष्ण्य यामुळे स्त्रीला बेचैनी येते. योनिभागी दाह होत राहतो, गर्भाशयमुखाशी आत्यधिक औष्ण्य व संरंभ असल्यामुळे शुक्राणू मरतात व अनपत्यता संभवते.

अपत्यपथात पिच्छिलता आढळणे, शोथ असणे व त्यामानाने वेदना कमी, तीव्र योनिकंडू असणे यावरून दुष्टीची कफप्रधानता स्पष्ट होते. योनिवीक्षण यंत्रातून पाहिल्यास मुखावर शोथ, श्‍वेतता, अपत्यपथाच्या भित्ती व गर्भाशयमुख संपूर्णपणे श्‍वेतस्रावाने लडबडलेले आढळते. या प्रकारची लक्षणे आढळल्यास कफप्रधानता लक्षात घेऊन आमपायक, शोथघ्न चिकित्सा करावी.

गर्भाशय परीक्षण करत असताना अपत्यपथ लहान, त्याची लांबी कमी, गर्भाशयमुख लहान असून गर्भाशयाचा आकार अत्यंत लहान असू शकतो. यामुळे वंध्यत्व संभवते.
गर्भाशयमुख हे प्राकृत अवस्थेत नसेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही. कित्येक वेळेला गर्भाशयमुखाला वक्रता आलेली असल्यास म्हणजेच पुरःप्रवर्तित किंवा पश्‍चात्‌प्रवर्तित असल्यास गर्भधारणा होऊ शकत नाही. यावरही आयुर्वेद पद्धतीने चिकित्सा करता येते.

गर्भाशयमुखाच्या आतील बाजूस ग्रंथी निर्माण होऊन त्याचा कोंबासारखा भाग मुखातून बाहेर येतो त्याला पॉलिप म्हणतात. अशा ग्रंथीमुळे वंध्यत्व संभवते. वास्तविक अशा ग्रंथी शस्त्रसाध्य असतात.
अशाप्रकारे याठिकाणी परिक्षण करून दोषाचा विचार करून लाक्षणिक चिकित्सा करणे आवश्यक ठरते. ज्यामुळे वंध्यत्व येते. ही लक्षणे नाहिशी झाल्याखेरीज अपत्यसंभव होत नाही.
वंध्यत्वामध्ये कृमींचा विचार करून कृमिघ्न चिकित्सा देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.